गोड निबंध-भाग ३ 23
एक दिवस रात्रींच्या वेळी एक मजूर लॉरेन्सकडे आला व म्हणला, टेम्सनदीवरील पुलाजवळ कांही लोखंड आम्हांस सांपडलें आहे. तें आमच्या खोलींत आम्ही जमवून ठेवले आहे. लगेच रात्र झाली होती तरी लॉरेन्स त्या मजुराच्या घरीं गेला. तों तें लोखंड म्हणजे अत्यंत प्राचीन काळीं लढाईत ज्या कुर्हाडी वापरीत त्यांचा तो सांठा होता असें आढळलें. असो; अशा प्रकारें एकाच गोष्टीचा नाद ठेवून एकट्या लॉरेन्सनें केवढें काम केलें ?
कोणतेहि काम हातीं घ्या, निष्ठापूर्वक तें करा म्हणजे कामाचे डोंगर उठतील. कोणताहि नाद हव्यास पाहिजे. दोन जर्मन गृहस्थांनीं दहा वर्षे सर्व जर्मनीभर हिंड हिंड हिंडून लोकांत प्रचलित असलेल्या सर्व कथा (Folk Tales) जमा केल्या. केवढें प्रचंड काम ! अशा प्रकारचीं कामें आपल्याकडे अजून करावयाचीं आहेत. आपल्या महाराष्ट्रांत खेडोपाडीं किती गोष्टी कुणब्यामाळ्यांस बायामाणसास येत असतात. जुनीं कागद-पत्रें गोळा करावीं. परन्तु आपल्या लोकांत नादच नाहीं. गप्पा मारण्याचा व नोकरी करण्याचा दोनच नाद आम्हांस लागलेले आहेत. बाकी बाबतींत शंखनाद !
देशभक्ति
‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’
जननी व जन्मभूमि ही स्वर्गापेक्षां थोर आहेत. जननीपेक्षांहि जन्मभूमि थोर आहे. माता जन्म देते; संगोपन करिते; शरिराचें पालनपोषण करते. परंतु या पोषणासाठीं लागणारें धनधान्य, दुग्ध कोण देतें ? जन्मभूमीच देते. हवापाणी, धनधान्य, फळेंफुलें हें सर्व जन्मभूमि आपणांस देते. जन्मभूमि आपणांस धर्म, कर्म, प्राचीन परंपरा प्राचीन इतिहास शिकविते. अशा जन्मभूमीबद्दल कोणाला अभिमान वाटणार नाहीं ? जेथें आपले पूर्वज राहिले, जेथें आपले शूर वीर चमकले, जेथे आपल्या कवींनी अमर काव्यें लिहिलीं, जेथे विशाल बुध्दीचे तत्वज्ञ गंभीर व गहन तत्वें सांगते झाले व आचारांत दाखविते झाले. अशी ही वरदा जन्मभूमि कोणास प्रिय वाटणार नाहीं ? जन्मभूमीच्या गौरवानें कोणास आनंद व धन्यता वाटणार नाहीं ? जन्मभूमीची विपन्नावस्था पाहून कोण खिन्न होणार नाहीं ? जन्मभूमीचें सुख तें माझें सुख, तिचें दु:ख तें माझें दु:ख असें कोणा सत्पुत्रास वाटणार नाहीं ? जन्मभूमि सहस्त्रावधि बंधनांनीं निगडित झाली असतां केवळ खाण्यापिण्यांत कोण गुंग होऊन राहील ? जन्मभूमि शरपंजरीं पडली असतां कोणा सहृदय व्यक्तीस सुखाची लालसा, विलासांची आसक्ति, भोगांची रुचि सुचेल ?
इंग्लंडचा धाकडा पिट मरतेवेळी म्हणाला, "Oh, My country, My country" ध्यानी, मनीं, स्वप्नी त्याला देशाची आठवण होती. त्या वेळची देशाची विपन्नावस्था त्याच्या मिटल्या दृष्टीसमोर उभी होती. जन्मभूमीची कष्टमूर्ति त्याच्या प्राणांस कष्ट देत होती. खरा देशभक्त.