गोड निबंध-भाग ३ 47
असा हा सूत यज्ञ वाटत गेला तर केवढी क्रांति होईल. त्यांतून प्रचंड संघटना होईल. एक भावना, एक विचार, एक ध्येय समोर उभें येऊन राहील. खरा स्वदेशी कपडा गांवोगांव जाईल. पैसा खेड्यांतच राहूं लागेल. विणकर विणूं लागतील, धोबी धुवूं लागतील, सुतार चरके करील. सारे ग्रामोद्योग चालूं होतील. म्हणून खादी हा सूर्य व इतर खंदे त्याच्या भोंवतीं फिरणारे ग्रहोपग्रह असें महात्माजी म्हणतात.
लढा येईल तेव्हां येवो. आपण ही लढाई सुरु करुं या. देशाचें वस्त्र देशांत बनवण्याचें हें ध्येय धरुं या. आई बाप, शिक्षक विद्यार्थी, किसान कामगार सर्व कांतावयास लागूं देत. अर्थात् रिकाम्या वेळीं हें करा, गाणें गुणगुणत करा; हंसत खेळत करा. रामनाम म्हणत करा. इतर सारें सांभाळून करा. ही देवपूजा आहे. देवाच्या पूजेसाठीं धूपदीप नैवेद्य लागतो, फुलें चंदन लागतें. तशी ही देशाची पूजा. देशाच्या चरणीं दररोज ४०-४५ तार वहावयाचे. पाहूं या करुन. यात काय, त्यांत काय, म्हणूं नका. आतां हा मंत्र घेऊं या. व्रत घेऊं या. “बोलणेंचि नाहीं आतां देवावीण कांही” असे तुकाराम महाराज म्हणाले. आपणहि म्हणूं या कीं : “बोलणेंचि नाहीं आतां, कांतण्याविण कांही.”
पुढें पाहा
पूर्व खानदेशांतील शेतकर्यांना तहशिलाच्या बाबतींत मिळावी तेवढी सूट मिळावी नाहीं. ज्या कांही तालुक्यांना त्यांच्या नशिबानें २ आणे सूट मिळाली तेवढीच; बाकी कांही नाहीं. शेंकडों सभा झाल्या. त्या सर्व सभांचे पर्यवसान जळगांवच्या विराट सभेंत झालें. ठराव झाले. परंतु फळ शून्य. तहशील सर्व ठिकाणीं बहुतेक वसूल करण्यांत आले; एदलाबाद पेटा, ज्यांत अतिवृष्टि व जंगली जनावरांचे कळप त्यांत ज्यांची पिकें सर्वस्वी गेलीं, तेथें दोन आणेहि सूट दुर्दैवानें मिळाली नव्हती. तेथील तहशील बहुतेक तिजोरींत गेला. आणि आतां असें कळतें कीं ज्या शेतकर्यांची घरीं जमीन करणारांची कांही बाकी उरली असेल, ती वसूल करुं नये. उशीरा का होईना, थोडा आधार एदलाबादला मिळाला. बुडत्याला काडीचाहि आधार मोलाचा; तहानलेल्या चातकास पावसाच्या एका थेंबानेंहि समाधान होतें.
खानदेशांत इतकी आम्ही चळवळ किंवा वळवळ केली, तींत यश कां आलें नाहीं ? मुख्य कारण हें आहे कीं खानदेशांत खरोखर वाईट स्थिति आहे, या गोष्टीवर वरिष्ठांचा विश्वासच बसला नाहीं. चौकशी मंडळ नेमा म्हटलें तर म्हणत, आतां कशाची चौकशी करायची ? पिकें आलीं, विकलीं गेली. शेतकर्यांची स्थिती कशी आहे या बाबतींत आम्हां कार्यकर्त्यांतहि एकमत नव्हतें.
परन्तु तें झालें नाहीं. मागील रडगाणें हें माणसांना शोभत नाहीं. मनुष्यानें पुढें पाहिलें पाहिजे. सृष्टि मागचें कधीं पहात नाहीं. नदी पुढें पहाते, पुढें जात असते. क्षणभर ती थबकते. परन्तु पुन्हां चालूं लागते. हिवाळ्यामध्यें झाडांचीं पानें गळतात. ना फुलें ना फळें; परंतु सृष्टि रडत नाहीं. तिचें लक्ष पुढें फुलणार्या वसंतॠतूकडे असतें. मरणाचीं रडगाणीं गावयास सृष्टीस वेळ नाहीं. कोमेजून गेलेल्या फुलांची रडकथा गात ती बसत नाहीं. उमलणार्या कळ्यांची ती काळजी करीत असते. सृष्टीपासून हा संदेश माणसानें घेतला पाहिजे.