गोड निबंध-भाग ३ 37
प्रभु रामचंद्रांचा महिमा कोठवर वर्णावा ? भगवान् आदिकवि वाल्मीकी यांनीं आपल्या गंगौघाप्रमाणें प्रसन्न, शारदीय कमळाप्रमाणें रमणीय अशा वाणीनें रामचंद्रांचा महिमा गायिला आहे; वाल्मीकीचेच अवतार जे महामुनि तुलसीदास त्यांनीं पण रामचंद्रजींची कथा गाऊन त्या रामचरित-मानसग्रंथानें सर्व विश्वास वेड लाविलें आहे; कविमुकुटमणि जो कालिदास त्यानेंहि रामचंद्रांचें वर्णन करुन आपली वाणी पावन करुन घेतली आहे. बंगालमध्यें कृत्तिदास, महाराष्ट्रांत श्रीधर, रामदास, वामन, मोरोपंत वगैरे थोर वागीश्वरांनी रामचंद्रांचा महिमा वर्णन केलेला आहे. मोरोपंतास तर रामकथा इतकी आवडे कीं, त्यांनी १०८ निरनिराळ्या वृत्तांत रामायणें लिहिलीं. तरी त्यांचे हृदय अतृप्तच राहिलें. अशा थोरामोठ्यांनी रामचंद्रांचा महिमा वर्णिला, तरी मी वर्णू नये असें नाहीं. गरुड उंच उड्डाण करितो. म्हणून चिमणीनें उडूंच नये असें कोठें आहे ?
रामचंद्रांच्या महिम्यास सीमा नाहीं, अंत नाहीं. सागरास जशी सागराचीच उपमा, गगनास जशी गगनाची उपमा शोभते, त्याप्रमाणें रामचंद्राचा महिमा रामचंद्राच्या महिम्याप्रमाणेंच; त्याला अन्य तोड नाहीं, जोड नाहीं. ज्या रामचंद्रांच्या पदकमलाच्या स्पर्शानें शिळा होऊन सहस्त्र वर्षे पडलेली अहिल्या मुक्त होऊन गेली, ज्या रामचंद्राच्या नांवानें अंकित अशा शिळा सागरावर तरल्या, भगवान् शंकर जगाचा संहार होऊं नये म्हणून हलाहल विष प्राशन करते झाल्यावर, त्यांच्या अंगाची लाही होऊं लागली तेव्हां सर्पाचीं शीतल भूषणें, गंगेचा शीतल प्रवाह, सुधाकर शीतल चंद्र यांस धरुनहि जेव्हां आग थांबेना तेव्हां ज्या रामचंद्रांच्या नामोच्चारानेंच त्या जहाल विषाची विषयवेदना विलयास गेली व शंकर शांत झाले. त्या रामचंद्रांचा महिमा कसा वर्णन करावा ? तो अतुल आहे; अगाध आहे.
पित्याच्या एका शब्दासरशी, आपल्या सापत्न मातेच्या संतोषार्थ वैभवानें समृध्द असें राज्य ज्यानें तृणसमान तुच्छ लेखून दूर सारिलें, बारा वर्षे घोरतर कांतारांत निवास करण्याचें ज्यानें आनंदानें अंगावर घेतलें, भरतासारखा प्रेमळ बंधु ‘परत या’ असें अश्रुपूर्ण नयनांनी शतश: प्रार्थनांनी सांगत असतां, ज्याचा निश्चय अभंग राहिला, त्या रामचंद्रांचें वर्णन मी कोठवर करणार ? प्रजेच्या हितार्थ रात्रंदिवस जागणारा, प्रजेच्या आनंदांतच आपला आनंद मानणारा जो प्रभु रामचंद्र प्रजेच्या सुखार्थ स्वपत्नीचाहि त्याग करणारा, असा जो रामचंद्र तत्सम या भूतलावर अन्य कोण झाला ? कोण होणार ?
शबरी ही तर भिल्लीण; परंतु भक्तिप्रेमानें आणलेलीं, किडक्या दातांनीं चावून पाहिलेलीं तीं बोरें रामचंद्रांनी मिटक्या मारमारुन खाल्लीं. केवढा हा मनाचा मोठेपणा ! मुनिजनांचा आधार, भक्तांचा कल्पद्रुम, दु:खितांचें दैन्य दूर करणारा, छळकांस शासन करणारा असा हा रामचंद्र आहे. ज्याचे राज्यांत ‘चिंतेसि चिंता असे’ असें कवींनीं मोठ्या सहृदयतेनें वर्णिलें असा हा राजा रामचंद्र आहे. अनेक पत्नी करुन घेण्याच्या त्या काळांत श्रीरामचंद्र एकपत्नीव्रतानें राहिले म्हणून त्यांचा मोठेपणा आहे. एकपत्नी, एकबाणी, एकवचनी असें वर्णन रामचंद्राशिवाय कोणाचें करतां येईल ?