हिमालयाची शिखरे 32
हुतात्मा कोतवाल
आज देश स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा लाभ घरोघर अजून जावयाचा आहे. परंतु परसत्ता दवडून सर्वांचे संसार सुखाचे करण्यासाठीं जो स्वातंत्र्यसंग्राम कारावा लागला त्यांत ज्ञात अज्ञात अनेकजणांचे त्याग आहेत. अनेकांचे हाल, अनेंकांची बलिदानें आहेत. त्यांतील कांहीं डोळयांसमोर सदैव राहतात. त्यांना प्रणाम करुन आपण सर्वांच्याच त्यागाला प्रणाम करित असतों.
भाई कोतवाल गरिबींत जन्मले, गरिबींत वाढले. मोठया कष्टानें त्यांनीं शिक्षण घेतले. ते वकील झाले. परंतु पैसा त्यांच्या डोळयासमोर नव्हता. दरिद्री जनता त्यांच्या डोळयासमोर होती. कुलाबा जिल्हयांतील कर्जत तालुका हे त्यांचे कार्यक्षेत्र. ते समाजवादी पक्षांत सामील. महाराष्ट्र शाखेचे ते चिटणीस होते. त्यांनी संघटना आरंभिली. जंगलचे कंत्राटदार कातकरी वगैरेंना कोळसा पाडतांना कसे छळतात, तें आतां लोकांस माहीत झालें आहे. भाई कोतवाल यांनी त्यांचीं संघटना केली. शेतक-यांचीही संघटना सुरु केली. शेतक-याला बीबियाणेंहि महाग घ्यावें लागतें. जवळचें थोडे फार भात संपलें कीं महाग विकत घ्यावें लागतें. भाई कोतवालांनीं धान्यकोठया सुरु केल्या. त्यांतून शेतक-यांस धान्य मिळे. शेतक-यांचे खटले ते चालवित. जनतेचे ते प्राण होऊं लागले.
अशावेळेस ४२ चा लढा आला. ९ ऑगस्टची अमर तारीख उजाडली. ‘चलेजाव’ शब्द आधीच उच्चारला गेला होता. त्याच्या जोडीला ‘करेंगे या मरेंगे’ मंत्र आला. महात्माजींनीं दिलेले हे दोन महान मंत्र आहेत. जें जें मानवतेला मारक आहे, आत्ममिकासाच्या आड येणारें आहे त्याला ‘चले जाव’ म्हणायचें आणि तोंडानें केवळ न म्हणतां त्यासाठीं ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धारानें धडपडायचें, सर्वस्व अर्पावयाचे. महात्माजींचें हे दोन मंत्र घेऊन भाई कोतवाल आपल्या तालुक्यांत गेले.
त्यावेळेस लढा लढणारे बाहेरचे मंडळ होतें. ठायीं ठायीं टापू अहिंसक रीतींने म्हणजे कोणाचे प्राण न घेतां स्वतंत्र करायचे आणि अशा रीतीनें स्वतंत्र टापू वाढवीत जायचे. या स्वतंत्र प्रदेशाला मग मात्र परसत्तेशी सशस्त्र लढा करायला काँग्रेसच्या धोरणानुसार प्रतिबंध नाहीं असेंहि ठरलें होतें. कारण काँग्रेसहि स्वातंत्र्य मिळाल्यावर हाती शस्त्र घेऊन लढणारच होती. भाई कोतवालांनीं कर्जत तालुका स्वतंत्र म्हणून जाहीर केला. माझ्या स्वतंत्र तालुक्यांत ब्रिटिश सत्तेचे पोलीस नकोत. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी पोलिसांचीं हत्यारें लांबविली. पोलिसांना हात नाहीं लावला. परंतु ब्रिटिश सत्ता हें थोडेंच सहन करणार ? लष्कर धुमाकळ करीत आलें. भाई कोतवाल हे सिध्दगड किल्ल्यावर होते. पुणें, कुलाबा, ठाणे. तिन्ही जिल्हयांचा हा किल्ला म्हणजे किल्ली. परंतु फितुर माणसानें पत्ता दिला. रात्री बॅट-यांचा प्रकाश पाडीत हॉल साहेब व सैनिक, पोलीस निघाले. भाई कोतवाल निजलेले होते. पहारेकरी होता. गोमा पाटील यांचा तो मुलगा. हिराजी त्याचें नांव. नांवाप्रमाणें तळपता हिरा होता. त्याला गोळी लागली. भाई कोतवाल उठले. त्यांनी बंदुक घेतली. परंतु त्यांनाहि गोळी लागली. तरीहि ते निसटून जाऊं पहात होते. परंतु अशक्य झालें. इतरांना म्हणाले, ‘तुम्ही शक्य तर निसटा. जा.” कांहीं पकडले गेले.
कांहीं निसटले. भाई कोतवालांनी स्वातंत्र्याच्या सिध्दीसाठीं सिध्दगडावर प्राण ठेवले.
गोमा पाटील वगैरेंना पुढें शिक्षा झाल्या. पुढें सारे सुटले तेव्हां गोमा पाटील सुटले.
सिध्दगड हें तीर्थक्षेत्र आहे. जनतेनें तेथें स्तंभ उभारला आहे. परंतु हुतात्मा कोतवाल यांचे स्मारक हृदय-हृदयांत हवें. गरीब जनता जोंवर सुखी नाहीं तोवर विसांवा नाहीं घेता कामा, सुखानें राहतां नाही कामा.