Get it on Google Play
Download on the App Store

हिमालयाची शिखरे 5

सेवेच्याद्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निरहंकारी सेवा. एकदा एक मुमुक्षु त्यांच्याकडे येऊन म्हणाला, “ मी दारें खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही.”  तेव्हा म्हणाले, “ दारें खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकी खालून रोज शेकडों प्रेतें जात आहेत बघ. शहरांत साथी आहेत. त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्ते, गटारें स्वच्छ कर.”  स्वत: स्वामी प्लेगच्या नि कॉल-याच्या दिवसांत कलकत्त्यांत मित्रांसह सेवा करीत होते. कोणी  विचारलें, “ पैसे खुंटले तर ?”  स्वामी म्हणाले, “बेंलूरचा मठ विकीन. तेथील जमीन विकीन.”  त्यांना आसक्ति कसलीच नसे. महात्माजींनी हरिजन आश्रम नाहीं देऊन टाकला ? महापुरुष वृत्तीनें मुक्त असतात, अनासक्त असतात.

दरिद्री नारायण हा महान् शब्द प्रथम विवेकानंदांनी उच्चारला. “ नारायण हवा असेल तर दरिद्र बांधवांची सेवा कर. आज नारायण दरिद्र आहे. जा त्याला सुखी कर.” महात्माजींनी हा शब्द सर्वत्र नेला. ते जेव्हां दानार्थ हात पसरीत तेव्हां, “ दरिद्र नारायणके वास्ते ” असें म्हणत.

विवेकानंदांना रडगाणें माहित नव्हतें. ज्ञान-वैराग्याचा, अगाध ब्रम्हचर्याचा तो अद्भुत पुतळा ! सामर्थ्याचे ते सिंधु होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, “ मला एक हजार माणसे द्या. ती सिंहाच्या छातीचीं मात्र असूं देत. मग भारताचा कायापालट मी करीन.”  “ वेदांत तुम्हाला सांगतो कीं तुमच्यांत तो परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यांत आहे. मग तुम्ही खालीं मान घालून कां बसतां ? उठा नि पराक्रम करां  हिंदुधर्मांत नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी  पापी म्हणत बसलो. हिंदुधर्मानें हें दुबळेपणाचें तुणतुणें कोठून आणलें ? तें मोडून तोडून फेका. चिदानंदरुप शिवोsहम ही तुमची घोषणा असूं दे. नायमात्मा बलहीनेन लभ्य:- दुबळयाला कोठला आत्मा ? उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो, नेभळट नाहीं बनवित. तुमचा स्वत:वर विश्वास आहे कीं नाही बोला. ज्याचा स्वत:वर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून असणार ? रडक्या दुबळया आस्तिकापेक्षां स्वत:च्या कर्मशक्तीवर जगणारा नास्तिक बरा ! ”

स्वामींची अशी जळजळीत वाणी आहे. ते एकदा बंगाली तरुणांस म्हणाले, “ तूम्हाला देव पहिजे ? जा फुटबॉल खेळा. हंसू नका. बलवान बना, उत्साही बना. लाथ मारीन तेथें पाणी काढीन ही शक्ति हवी.”  स्वामीजींनी मृतवत् पडलेल्या राष्ट्राला वीरवाणी ऐकवली.

त्यांची किर्ति जगभर गेली. कलकत्त्यांत त्यांचे अपार स्वागत झालें. हत्तीवरुन मिरवणूक. ती गर्दीत त्यांना बालपणाचा लंगाटी मित्र दिसला. त्यांनी एकदम खाली उडी मारली नि त्या मित्राला कडकडून भेटले.

भारताचा मोठेपणा कशांत आहे यासंबंधी ते म्हणतात, “ या देशानें कधीं कोणावर आक्रमण केलें नाहीं हा या देशाचा मोठेपणा असें मला विचार करतां वाटूं लागतें.”  सर्व धर्मांचा, संस्कृतींचा मेळ घालणें, जगाला प्रेमधर्मानें रहायला शिकवणें हें भारताचे कर्तव्य आहे. ते म्हणतात, “समता उत्पन्न करायची असेल तर विशेष हक्क नाहीसे व्हायला हवेत. हे विशेष हक्क नष्ट व्हावेत म्हणून व्यक्तीनेच नव्हे, एखाद्या राष्ट्रानेंच नव्हे तर सा-या जगानें खटपट केली पाहिजे. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल एखाद्याच्या अंगी उपजत असणें स्वाभाविक आहे. परंतु तेवढयानें गोरगरिबांस खुशाल तुडवण्याचा हक्क त्याला प्राप्त होतो कीं काय ? श्रीमंत आणि गरीब यांच्यांतील तेढ विकोपास जाऊं पहात आहे. आपल्या अंगांतील विशेष गुणांचा उपयोग दुस-याला नाडण्याकडे करणें हयालाच विशिष्ट हक्क म्हणतात. हे राक्षसी नष्ट करण्याकडे त्या त्या काळांतील लोक लढत असतात. नीतिशास्त्राचा हाच रोख असतो. आपणहि हे विशेष हक्क नष्ट करु तर विविधता राहूनहि, त्या त्या विशेष गुणांना वाव राहूनहि ऐक्य प्रवृत्ति वाढेल, साम्यावस्था वाढेल.”

हिमालयाची शिखरें

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
हिमालयाची शिखरे 1 हिमालयाची शिखरे 2 हिमालयाची शिखरे 3 हिमालयाची शिखरे 4 हिमालयाची शिखरे 5 हिमालयाची शिखरे 6 हिमालयाची शिखरे 7 हिमालयाची शिखरे 8 हिमालयाची शिखरे 9 हिमालयाची शिखरे 10 हिमालयाची शिखरे 11 हिमालयाची शिखरे 12 हिमालयाची शिखरे 13 हिमालयाची शिखरे 14 हिमालयाची शिखरे 16 हिमालयाची शिखरे 17 हिमालयाची शिखरे 18 हिमालयाची शिखरे 19 हिमालयाची शिखरे 20 हिमालयाची शिखरे 21 हिमालयाची शिखरे 22 हिमालयाची शिखरे 23 हिमालयाची शिखरे 24 हिमालयाची शिखरे 25 हिमालयाची शिखरे 26 हिमालयाची शिखरे 27 हिमालयाची शिखरे 28 हिमालयाची शिखरे 29 हिमालयाची शिखरे 30 हिमालयाची शिखरे 31 हिमालयाची शिखरे 32 हिमालयाची शिखरे 33 हिमालयाची शिखरे 34 हिमालयाची शिखरे 35