हिमालयाची शिखरे 27
महान् सुधारक आगरकर
गोपाळरावांचा जन्म १८६६ मध्यें झाला. ते मोठे हूड होते. खेळाडू वृत्तीचे. क-हाड जवळच्या टेंभू गावीं बाळपण गेलें. कृष्णेच्या पाण्यांत तासन्तास डुंबायचे. पुढें व-हाडांत अकोल्यास शिकायला गेले. घरी स्वयंपाकाचें कामहि पडे. गरिबींतून शिकत होते. दोन वर्षे मराठीची शिष्यवृत्ति मिळाली. भाषांतर करण्यांत पटाईत. श्लोक पाठ करायचे. त्यांना इतिहास, संस्कृत काव्यें, नाटकें यांची अत्यंत आवड. घरकामांमुळे एकदा शाळेंत जायला उशीर झाला तर हेडमास्तर महाजनी म्हणाले, “तुमच्या हातून काय अभ्यास होणार ? तुम्ही असेच रखडणार.” तेव्हा तेजस्वी गोपाळ उभा राहून म्हणाला, “तुमच्या सारखा एम्. ए. होईन तरच नांवाचा आगरकर.”
अकोल्यास व-हाड समाचार निघे. “तुम्ही लेख लिहित जा. पांच रुपये महिना पाठवीन, ” असें संपादकांनी आगरकरास कळविलें. गॅदरिंगमध्यें निबंधांत बक्षीस. पुढें पुण्यास आले. डेक्कन कॉलेजांत जाऊ लागले. एकच सदरा. रात्रीं धुवून ठेवायचे. सकाळीं तो घालयचे. परीक्षेच्या वेळीं फी नव्हती. एक नाटक लिहूं लागले. तेव्हां प्रा. केरुनाना छत्रे यांना कळले. त्यांनी फी दिली. लो. टिळकहि त्याच वेळचे. दोघांनी पुढें शिक्षणास वाहून घ्यायचें ठरविले. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनीं सरकारी नोकरी सोडून न्यू इंग्लिश स्कून सुरु केलें होते. निबंधमाला, केसरी, मराठापत्रें सुरु केली होतीं. आगरकर, टिळक येऊन मिळाले.
गोपाळरावांनी मुन्सफ वगैरे व्हावे अशी घरच्यांची इच्छा. शिक्षणखातें रडकें खातें असें त्यांचें आप्तेष्ट म्हणाले. परंतु त्यांनी स्वच्छ सांगितलें, “मी शिक्षक होऊ इच्छितो. लोकांत स्वतंत्र विचार उत्पन्न होऊन सोन्नतीचे मार्ग लोकांना दिसूं लागतील अशा प्रकारच्या शिक्षकाचें काम करायचें आहे.” त्यांनी आईला लिहिलें, “मी शिकून मोठी नोकरी करीन अशी आशा नको खेळवूं.”
पुढे त्यांना एका संस्थानांत मोठी नोकरी मिळत होती. परंतु त्यांनी ढुंकूनहि पाहिलें नाही. १८८० मध्यें एम्. ए. झाले. विष्णुशास्त्री मरण पावले. लोकमान्य व आगरकर यांना शिक्षा झाली. मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगांत दोघे १०१ दिवस होते. दोघांच्या दिवसरात्र चर्चां होत. दोघांतील मतभेद स्पष्ट झाले. दोघे स्वातंत्र्यभक्त. परंतु आगरकर म्हणत, “हा देश सडलेला. ना बुध्दि ना विवेक. रुढी नि अज्ञान. अशांना कोठले स्वराज्य ! श्रेष्ठकनिष्ठपणाचीं थोतांडे. शिवूं नको धर्म. स्त्रियांची दुर्दशा.” लोकमान्य म्हणत, “हें सारें सुधारुं तोवर देश आर्थिक शोषणानें मृतप्राय होईल. आधीं परके चोर घालवूं, मग घर सुधारुं.”
हे दोन थोर पुरुष सुटल्यावर अलग झाले. आगरकरांनी सुधारक पत्र सुरु केलें. “इष्ट असेल तें बोलणार व शक्य असेल तें करणार” हा त्यांचा बाणा. आणि त्यांनी चौफेर हल्ला चढवला, तीं श्राध्दें, ती तर्पणें, तीं पिंडदानें, ती वपनें, ती सोवळीं ओवळीं, शेंडया, जानव्यांचे, गंध-भस्माचें धर्म, ती थोतांडे, आगरकर विजेप्रमाणें आघात करुं लागले. सनातनी संतापले. आगरकर जिवंत असतांना त्यांची प्रेतयात्रा काढून त्यांच्या घरांवरुन नेली. त्यांच्या पत्नीस काय वाटलें असेल. आगरकरांची पत्नी तुळशीबागेंत जायची. एकदा एका विद्यार्थ्यानें विचारलें, “ तुमच्या पत्नी तर देव मानतात.” ते म्हणाले “ मी तिला सांगतो कीं देव वगैरे सारे झूट आहे. परंतु तिची श्रध्दा आहे. मला माझी मतें बनवण्याचा हक्क तसा तिलाहि.”
आगरकर बुध्दीला प्रमाण मानणारे. एकदा त्यांनी सुधारकांत, महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र लिहिलें तें प्रत्येकानें वाचलें पाहिजे . “कां मी हें सारे लिहितो ? इतक्या टीका होतात तरी कां ? दारिद्रय स्वीकारुन हा वेडा पीर कां हें सारें प्रतिपादित आहे ? सुखाची नोकरी झुगारुन, रोगाशीं झगडत, सर्वांचा विरोध सहन करुन हा मनुष्य कां हे विचार मांडतो याचा जरा विचार तरी करा मनांत ” अशा आशयाचे ते उद्गार आहेत. परंतु शेवटीं म्हणतात, “ माझ्या विचाराचा समानधर्मी कोण्ी उत्पन्न होईल. पृथ्वी विपुल आहे, काळ अनंत आहे.”
असे हे ध्यैर्याचे मेरु ! आणि किती साधे. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणांत एकदां सकाळी धाबळीची बाराबंदी घालून, एक पंचा नेसून, एक डोक्याला गुंडाळून ते चिलीम ओढीत होते. दम्यासाठीं तंबाकूत औषधी मिसळून ते ओढीत. एक गृहस्थ भेटायला आले. “ आगरकर कोठे राहतात ?” “ मीच तो.” “थट्टा नका करु.” “अहो खरोखरच मी आगरकर.” “स्त्रियांनी जाकिटें घालावी सांगणारे तुम्हीच ना ? मला वाटले तुम्ही अपटुडेट साहेब असाल.”
एकदा ज्ञानप्रकाशांत आगरकर वाटेल तें खातात, वाटेल ते पितात असें कोणी लिहिलें. आगरकर म्हणाले, “मी जर एक गोष्ट प्रतिपादणारा व दुसरी आचरणारा असेन तर शिक्षक व वर्तमानकार होण्यास नालायक आहे. तेव्हा माझ्यावरच्या आरोपाला अणुरेणु इतका पुरावा असेल तर दाखवा. नाहींतर आरोप परत घ्या.” तो आरोप करणारा ज्ञानप्रकाशांत म्हणाला, “या साधुपुरुषाची काय हो मी विटंबना केली ! अरेरे.”
असला धुतल्या तांदळासारखा महापुरुष होता. लोकमान्यांची व त्यांची भेट होत नसे. हे बालगोपाळ एकमेकांजवळ पुण्याच्या लकडी पुलावर दोघांची गांठ पडणार असें वाटलें परंतु एकमेकांकडे न पाहतां दोघे गेले ! बेळगांवला लोकमान्य गेले होते, थिएटरांत त्यांची कोणी नक्कल केली. टिळक म्हणाले, “माझी नक्कल मला काय दाखवता ? त्याची दाखवा त्या गोपाळाची.” लोकांना वाटलें गोखल्यांची. तेव्हा टिळक म्हणाले, “तो दुसरा गोपाळ, निदान नकलेंत तरी त्याला पाहून समाधान मानीन ! ” टिळकांना आगरकरांविषयी किती प्रेम. आगरकर वारले तेव्हा रडत रडत अग्रलेख त्यांनी सांगितला.
गोपाळराव दम्यानें आजारी असतच. ते म्हणाले, “आतां मी मरणाला तयार आहे. मला लोकांना जें सांगायचें होतें ते मी सांगून टाकले आहे.” १५-६-१८९५ शनिवारीं जुलाब झाला. रविवारीं जरा बरें होतें. रात्रीं शौचास स्वत: जाऊन आले. हातपाय धुवून झाल्यावर पत्नीस म्हणाले, “आतां ला बरें वाटतें. मी निजतो. आणि तुम्हीहि निजा.” परंतु ती शेवटची झोप. पहाटेस त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या उशाशीं एक पुरचुंडी होती. तिच्यावर एक चिठ्ठी होती. “माझ्या प्रेतदहनार्थ मूठमातीची पत्नीस पंचाईत पडूं नये म्हणून व्यवस्था.”
असा हा धगधगित ज्ञानाचा नि त्यागाचा पुतळा होता. शतश: प्रणाम !