Get it on Google Play
Download on the App Store

हिमालयाची शिखरे 19

सेवामृर्ति राजेन्द्रबाबू

ज्या बिहारमध्यें भगवान् बुध्दांनी राजगृह येथें प्रथम त्या कोंकराला बळी देण्याऐवजी मला द्या म्हणून प्रेममयी वाणी राजाच्या यज्ञांत उच्चारली आणि मानवाच्या इतिहासांत एक अमर नवीन पान लिहिले, त्या बिहारांतच राजेंद्रबाबूंचा पुण्य जन्म झाला. तिथीप्रमाणें मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्तजयंती हा त्यांचा वाढदिवस. इंग्रजी तारीख ३ डिसेंबर.

राजेंद्रबाबूंना ६४ पुरीं होऊन पासष्टावें लागलें. महान् सेवकांचे महान जीवन. अतिबुध्दिवान. बहुतेक सर्व परीक्षांत ते पहिले आलें. त्यांच्या परीक्षेच्या वेळेस नेहमी अडचणी यायच्या. कधीं नांवच नसावें. कधी घोंटाळा व्हावा. आणि शेवटीं व्यवस्थित होऊन पहिले यायचे.

शिक्षण संपल्यावर कांहीं दिवस प्राध्यापकी केली. नंतर वकिली. परंतु चंपारण्यांत महात्माजी आले. राजेंद्रबाबूंच्या जीवनांत पुनर्जन्म झाला.

राजेंद्रबाबूंनीं त्या वेळेस वडील बंधूंना पत्रांत लिहिलें, “मी २० दिवस सारखा विचार करीत आहे. मी माझें नशीब देशाच्या भवितव्याशी जोडलें तर किती छान होईल !  माझ्यावर तुम्हां सर्वांच्या आशा. तुमच्या हृदयाला धक्का बसेल. परंतु माझ्या हृदयांत एक महान् ध्येय मला पुकारीत आहे. तीस कोटींच्यासाठीं मला जाऊं दे. मला साधेपणानें राहण्याची संवय आहे. जड नाही जाणार. मी मनांत आणीन तर पैसे मिळवीन. परंतु मनांत ती महत्वाकांक्षा नसून देशसेवेची एकच इच्छा आतां आहे.”

अशा रीतीनें हा थोर पुरुष तीस वर्षें सारखी सेवेची गंगा ओतीत आहे. बिहारमध्ये खादीची संघटना त्यांनी केली. बिहारमध्ये भूकंप झाला. तेव्हां सरकारनें त्यांना सोडलें. तुरुंगांत ते आजारी होते . परंतु लोकांची दैना पाहून त्यांचे आजारीपण पळाले. त्यांनीं जनतेजवळ मदत मागितली. सरकार व जनता यांच्यांत अधिक मदत कोण करते याची चढाओढ लागली. राजेंद्रबाबूंनी पत्रक काढून जनतेला म्हटले  “पैसे आतां पुरे. अधिक लागले तर सांगेन.”

४२ च्या आंदोलनांत बिहारमध्येंच सरकारनें अति जुलूम केला. किती ठिकाणी गोळीबार. सुटल्यावर राजेंद्रबाबूंनी सर्व प्रान्ताचा दौरा आरंभिला. गोळीबारांत अपंग झालेले लोक भेटत. त्यांची ते व्यवस्था लावीत. चार जिल्हे अजून हिंडायचे होते. अंगांत ताप होता तरी जातच होते. एके दिवशी १०० ताप होता. मग कार्यक्रम थांबवला.

४२ च्या आंदोलनांत तुरुंगांत एकाच्या अंगावर फाटके कपडे होते. मित्राला म्हणाले “त्याला कपडे मागवून द्या.” सर्वांची त्यांना काळजी. लहान लहान कार्यकर्त्यांची नांवें लक्षांत. एकदा मोतीहारीला सभा होती. “अरे, बत्तख मियांहि आले आहेत ते बघा ” शेजा-याला म्हणाले. बत्तख मियांपर्यंत बात गेली. १७ सालीं चंपारण्यातील लढयात शेतकरी बत्तख मियां होता. राजेन्द्रबाबूंना १५र्र्ं२० वर्षे झाली तरी त्याची ओळख नि स्मृति. बेतियाला गेले तर लगेच म्हणाले “चंद्रिकाबाबू बरे आहेत ना ?”  रांचीला गेले तर म्हणाले “ कोहडा पांडे कोठे आहेत ?”

सर्व सामान्य कार्यकर्त्यांची अशी स्मृति ठेवणें हे मनाच्या मोठेपणाचें लक्षण आहे.

एकदां एका जिल्हयांतील कांहीं कामावर एका मोठया कार्यकर्त्याचें नांव घालण्यांत येणार होतें. श्री. चक्रधर राजेंद्रबाबूंना म्हणाले, “हे गृहस्थ प्रसिध्द असले तरी त्यांना संघटना जमणार नाही. या दुस-या कार्यकर्त्यांचें नांव घाला.” राजेंद्रबाबूंनीं तें ऐकलें.
३४ सालीं मुंबईच्या राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष होते. अधिवेशन संपलें. जातांना महात्माजींच्या चरणांची धूळि लावून निघाले. महात्माजीं हंसले व शेजारच्या मुलांची टोपी वल्लभभाईंच्या डोक्यावर चढवून भारावलेंलें वातावरण त्यांनी मोकळे केलें.

बिहारभूकंप असो, राष्ट्रसभेचें अध्यक्षपद कठीण प्रसंगी घेणें असो जबाबदारी घ्यायला राजेंद्रबाबूंनाच उभे रहावें लागतें. घटनासमितीचेहि तेच अध्यक्ष केले गेले. त्यांच्यासारखा निर्भय, निर्मल, निरहंकारी परंतु खंबीर, श्रध्दावान सेवक कोण?

ते महाराष्ट्राचें दौ-यावर आले होते. अंमळनेर तालुक्यांतील नांदेड गावी जायचे होतें. मोटारची कांहीं अडचण आली, सायंकाळ झालेली. आम्ही रस्त्याच्या कडेला झाडाखालीं खान्देशी धुळींत बसलों. मी पत्रांतील कांही कविता म्हटल्या. मला म्हणाले “छान आहेत.”  ती वृक्षाखालची सायंकाळ मी विसरणार नाही !

लहानाहून लहान नि महानहून महान्, अजात शत्रु, ज्ञानी असून निगर्वी, अशा या पुण्यपुरुषाला माझ्यासारख्याचें आयुष्य थोडे थोडें मिळून ते शतायु होवोत.

हिमालयाची शिखरें

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
हिमालयाची शिखरे 1 हिमालयाची शिखरे 2 हिमालयाची शिखरे 3 हिमालयाची शिखरे 4 हिमालयाची शिखरे 5 हिमालयाची शिखरे 6 हिमालयाची शिखरे 7 हिमालयाची शिखरे 8 हिमालयाची शिखरे 9 हिमालयाची शिखरे 10 हिमालयाची शिखरे 11 हिमालयाची शिखरे 12 हिमालयाची शिखरे 13 हिमालयाची शिखरे 14 हिमालयाची शिखरे 16 हिमालयाची शिखरे 17 हिमालयाची शिखरे 18 हिमालयाची शिखरे 19 हिमालयाची शिखरे 20 हिमालयाची शिखरे 21 हिमालयाची शिखरे 22 हिमालयाची शिखरे 23 हिमालयाची शिखरे 24 हिमालयाची शिखरे 25 हिमालयाची शिखरे 26 हिमालयाची शिखरे 27 हिमालयाची शिखरे 28 हिमालयाची शिखरे 29 हिमालयाची शिखरे 30 हिमालयाची शिखरे 31 हिमालयाची शिखरे 32 हिमालयाची शिखरे 33 हिमालयाची शिखरे 34 हिमालयाची शिखरे 35