हिमालयाची शिखरे 13
महर्षि दादाभाई नौरोजी
चार सप्टेंबर हा दादाभाईंच्या जयन्तीचा दिवस. ‘ स्वराज्य ’ शब्दाचा मंत्र देणा-या महर्षीचा दिवस. ९२ वर्षांचे ते महान् जीवन. १८२५ मध्यें मुंबईतील मांडवी भागात ते जन्मले. ११ व्या वर्षीच दादाभाईंचे लग्न झाले. पत्नी गुलाबाई सात वर्षांची.
दादाभाई अतिबुध्दिमान. इंग्रजी शाळा सुरु झालेली. तिच्यांत गेले. आणि नुकत्याच सुरु झालेल्या कॉलेजांत सहा मुलें घ्यायचीं होतीं. बाळशास्त्री जांभेकर निवड करायला गेले. शिक्षकाने श्रीमंत मुलांना पुढे केले. दादाभाई गरीब. परंतु बाळशास्त्र्यांनी त्यालाही निवडले.
कॉलेजमध्ये उत्तम अभ्यास केला. ते खेळाडूहि होते. विटी-दांडू त्यांना फार आवडे. हिंदी क्रिकेट असे ते या खेळाला म्हणत. त्यांची स्मरणशक्ति अपूर्व. एकदां वाचले की म्हणून दाखवीत. गोष्टींचा ते कोष होते. गणित, विज्ञान, वाड;मय यांत ते प्रवीण झाले आणि पहिले प्राध्यापक झाले.
त्यावेळचे न्यायमूर्ति म्हणाले, “ मी निम्मे पैसे देतो. पारशी समाजाने निम्मे जमवावे. या बुध्दिवान तरुणाला बॅरिस्टर व्हायला जाऊ दे.” परंतु पारशी समाजाला मिशन-यांची भीति वाटे. दोन पारशी तरुण ख्रिस्ती झाले होते. म्हणून प्रश्न तसाच राहिला.
स्टुडंट्स लिटररी ऍंड सायंटिफिक सोसायटी त्यांनी प्राणमय केली. तेथे निबंध वाचले जात, चर्चा होई. गुजराती ज्ञानप्रकाश सुरु झाला. दादाभाई लिहीत. १८४९ मध्ये ऑगस्ट ४ ला स्त्रीशिक्षणाचा पाया घातला गेला. स्टू. लि. सा. सोसायटीच्या सभासदांनी मुली गोळा करायचे ठरविले. दादाभाई पारशी समाजात हिंडू लागले.
व्हरांडयात मुली बसतील. तेथें आम्ही सकाळीं येऊन शिकवू असे हे मित्र म्हणत. ४४ पारशी मुली आल्या. २४ हिंदु मुली. श्री. जगन्नाथ शंकरशेट यांनी शाळेला सुंदर इमारत दिली. त्यावेळेस चाबूक मराठी पत्र निघे. त्याने स्त्री शिक्षणावर खूप टीका केली. बायका नव-यांना गुलाम करतील, त्यांना कोर्टात खेचतील वगैरे म्हटले. दादाभाईंनी पारशी मुलींना इंग्रजीही शिकवायला प्रारंभ केला. पारशी-मुसलमान यांचा दंगा ५७ च्या आधी एकदा झाला. दादाभाईंनी त्या दंग्याच्या काळात रास्त गोपतार पत्र सुरु केले. ‘ खरे सांगणारा ’ असा या नावाचा अर्थ.
मित्रांच्या व्यापारी कंपनीत त्यांनी सामील व्हायचे ठरविले. १८५५ मध्यें ते २७ जूनला विलयतला जायला निघाले. प्रोफेसरी सोडून गेले. इंग्लंडमध्ये स्थापन झालेली पहिली हिन्दी फर्म. लंडनमध्ये गुजरातीचे प्राध्यापक झाले. लंडन कॉलेजच्या सीनेटवरही होते. मध्यंतरी ५७ चा इतिहास घडला. पुढे अमेरिकेतील युध्द आले. कंपनीचे दिवाळे निघाले. दादाभाईंनी बहुतेकांचे देणें दिले. अपूर्व गोष्ट असे तिकडील लोकांस वाटले.
त्यांची पत्नी अशिक्षित. त्यांनीं शिकवायचा खूप प्रयत्न केला. अपयश आले. आई म्हणाली दुसरे लग्न कर. ते म्हणाले, “ तुझा मुलगा पत्नीस न आवडता तर तिला दुसरे लग्न कर सांगतीस का ?” आई पुन्हा या बाबतीत बोलली नाही. लंडनमध्ये असता एका मित्राकडे जात. त्याला तीन मुली.