हिमालयाची शिखरे 21
आणि महिन्याच्या ५० हजारांच्या प्राप्तीवर पाणी सोडून यज्ञमूर्ति उभी राहिली. घोंगडीवर निजूं लागले. पाठ दुखे. मित्र म्हणाला, “गादी देऊ ?” तर रागावून म्हणाले, “देशसेवकाला गादी शोभत नाही.” देशबंधु तुरुंगात. बार्डोलीचा लढा थांबला. गांधीजींना शिक्षा. पुढे देशबंधु सुटले. त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापला. बंगालभर वणवण हिंडून निधि जमवला. देशभर दौरे. तिकडे चांदपूरच्या मजुरांवर अत्याचार तर तुफान पद्मानदींत नाव लोटून गले. “वादळांत मेलो तरी चालेल परंतु गेले पाहिजे.” म्हणाले. परंतु आजारी पडले.
मरतांना शांत. महात्माजी भेटायला गेले. गांधीजी म्हणाले, “देशबंधूंचा अंतरात्मा आता कळला.”
देशबंधु एकदा म्हणाले “स्वातंत्र्य मिळवता मिळवता मी मेलो तर या भूमींत मी पुन्हां काम करीन. माझ्या जीवनांतील सारी आशा, सारा उत्साह या ध्येयासाठीं आहे. त्या ध्येयाची पूर्णता होईपर्यंत मी पुन: पुन्हां येथें जन्मेन नि धडपडेन.”
भारतभूमीवर त्यांचें अपार प्रेम. ते म्हणतात, “बाल्यापासून प्रेम करीत आलो मी या भूमीवर. तरुणपणांत मी चुकलो असेन, पडलो असेन तरी मातृभूमीवर प्रेम करीतच होतो. आणि आज उतारवयांतहि ती मूर्ति मी हृदयांत ठेवली आहे. भारतमातेची ती मूर्ति आज अधिकच सत्यतेनें अंतरंगांत मला दिसत आहे.” दहशतवादी तरुणांच्या त्यागाचें ते कौतुक करीत. म्हणतात, “कोणत्याहि स्वरुपांतील राजकीय खून वा अत्याचार यांचा मी कट्टा विरोधक आहे. मला त्याची शिसारी आहे. या देशांतील राजकारणांत खून, अत्याचार शिरतील तर स्वराज्याचें सुंदर स्वप्न भंगेल.”
दहशतवादी प्रवृत्तीला विरोध करुन ते म्हणतात, “परंतु स्वातंत्र्यप्रेमांत मी त्यांना हार जाणार नाही. मी त्यांच्याबरोबर आहे. माझे कष्ट, माझी धडपड, माझ्या रक्ताचा बिंदुनबिंदु मी स्वातंत्र्यार्थ देईन. या देशांतील प्रत्येकानें म्हटलेंच पाहिजे की माझ्या मातृभूमीवर माझें प्रेम आहे. असे म्हणणे गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. कर्तव्यचुकार होऊन असें न म्हणण्यापेक्षां मी फांशी जाणें पत्करीन.” स्वराज्याची कल्पना मांडतांना ते म्हणाले, “वसाहतीचे स्वराज्य म्हणजे बंधन नव्हे. दास्य नव्हे. तुम्ही एकत्र रहा वा फुटून निघा. महायुध्दापूर्वी फुटून निघण्याची वृत्ति होती. परंतु एकत्र राहणें बरें, कॉमनवेल्थमध्यें राहणे बरे असे आता वाटत आहे.”
भारताविषयींची कल्पना साकार करतांना ते म्हणाले, “प्रांतांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य असावें. त्या प्रांतानें आपल्या विशिष्ट संस्कृतीनुसार वाढावें हेंच योग्य. परंतु भारताच्या बंधनानें, भारताच्या सेवाभावाने एकत्र सारे सांधलेले, एकजीव झालेले. असे हे हिंदी संघराज्य. जगांतील सर्व राष्ट्रांचें जें जागतिक संघराज्य होईल त्यांतील हिंदी संघराज्य हा भाग. जागतिक संघराज्य मानवतेच्या सेवा भावनेवर अवलंबून आहे. ज्या मानाने सर्वांची सेवा नि सर्वांना स्वातंत्र्य देऊं त्या मानानें जागतिक संघराज्य मानवांमध्यें ऐक्य नि शांति ठेवूं शकेल.”
अशा रीतीनें प्रांतिक स्वायत्तता, भारतीय संघराज्य, जागतिक संघराज्य या कल्पनेपर्यंत ते भरारी मारीत. आशियाई राष्ट्रांची परिषद बोलवूं इच्छित होते. मरणाआधीं एका मित्राला म्हणाले, “मी रविंद्रांवर त्यांच्या विश्व प्रेमासाठीं टीका केली. भांडलो. परंतु ते थोर आहेत. त्यांना माझा प्रणाम सांगा. गीतांजलीच्या रविंद्रांना आशियाई राष्ट्रांचे संमेलन बोलवायला सांगा. त्यांच्याहून कोण अधिक पात्र ?”
अनेक देशभक्तांना, क्रांतिकारकांना, त्यांच्या कुटुंबांना पोसायचे. कलकत्त्याच्या तुरुंगांत घरुन डबा आला कीं सर्वांस द्यायचे. तुरुंगांत असतां तिकडे बाहेर बारिसालच्या सभेंत वासंतीदेवी अध्यक्ष असता वंदेमातरम् म्हणायला बंदी. ऐकून सिंहाप्रमाणे फे-या घालीत राहिले. हिनें सहन कसे केले म्हणत ! हा मनुष्य फसवील असे त्यांना वाटले तरी त्याला मदत देत व म्हणत “चक्षुर्लज्जा, तुझें केविलवाणे तोंड बघवत नाही.”
सभा परिषद संपली की स्वयंसेवकांना स्वत: वाढायचे. महात्माजींना एकदा म्हणाले “हे तरुण ही माझी शक्ति.” नेताजी सुभाष हे तरुणांमधील तळपते बालतरुण. देशबंधूंनाच ते आपला राजकीय गुरु मानीत. देशबंधुचें जीवन म्हणजे स्फूर्तिचा अनंत ठेवा. विश्रांतिहीन कर्तव्य, असीम त्याग !
१६-६-१९२५ मध्यें दार्जिलिंगला हिमालयाच्या धवल शिखरांच्या सान्निध्यांत हा महापुरुष अनंतांत विलीन झाला.