हिमालयाची शिखरे 6
लोकमान्य टिळक
“ यदा यदा हि धर्मस्य ” हा श्लोक उच्चारीत लो. टिळक एक ऑगस्ट १९२० रोजीं देवाघरीं गेले.
लोकमान्य, आज अधिकच तीव्रतेनें तुमची आठवण होत आहे. तुमच्या थोर चारित्र्याची आज राष्ट्राला अतिशय आवश्यकता आहे. तुमचें जीवन अनंत गुणांची खाण. परंतु त्यांतील सत्याची उपासना आज अधिकच डोळयांसमोर येते. दत्तक बाळ जगन्नाथ महाराजांच्या इस्टेटीचे तुम्ही एक विश्वस्त. एकदां त्यांच्या मळयांतील भाजी तुमच्या घरीं आली. तुम्ही विचारलेंत, “ ही भाजी कोठली ?” कोणीतरी सांगितलें कीं त्या मळयांतील. तुम्हीं म्हणालांत, “ ही भाजी परत करा. स्वर्गीय मित्रानें या इस्टेटीसाठीं मला विश्वस्त नेमलें. तेथील भाजी मी कशी घेऊं ?”
लोकमान्य ही सचोटी, ही दानत तुमच्या या प्रियतम देशाजवळ आज राहिली नाही. हिंदुस्थानभर गेली सात-आठ वर्षें काळाबाजार शब्द रुढ झाला आहे. तो जणूं राष्ट्राचा धर्मं बनत आहे. एकमेकांना फसवणें यांत पुरुषार्थ वाटत आहे. परदेशांतहि वाईट माला पाठवून व्यापारी तुमच्या या महान् राष्ट्राचें नांव कलंकित करीत आहेत. महापुरुषा, तुझ्या आत्म्याला क्लेश होत असतील. भ्रष्ट जनता बघून तुला वेदना होत असतील. तुझ्या स्मरणानें ही भ्रष्टता जावो. श्रीमंत वा गरीब, लहान वा थोर, सर्वांच्या जीवनांत सार्वजनिक नीति येवो, सत्य येवो.
लोकमान्य, या राष्ट्राला राष्ट्रीयता तुम्ही शिकवलीत. बंगालच्या फाळणीच्या वेळेस कांहीं पुढारी म्हणत होते कीं बंगालचें दु:ख; बंगालनें बहिष्कार पुकारावा, स्वदेशी व्रत घ्यावें. परंतु तुमची अमोघ वाणी बोलली, “ बंगालचे दु:ख तें का आपलें नाही ? हें सारें राष्ट्र एक आहे. एकाचें दु:ख तें सर्वांचें. सर्वांचे एक हृदय.” सारा देश तुम्ही वंगभंगाच्या अन्यायाविरुध्द उभा केलात. ही तुमची शिकवण.
परंतु आज आम्ही प्रांतीय वाद माजवीत आहोंत. त्याच्यासाठी सत्याग्रहाची भाषा बोलत आहोत. वाटींतील सांडलें तरी ताटांतच ना ? एक ना देश ? सामोपचारानें नाहीं का सीमा ठरवतां येणार ?
लोकमान्य, तुमची स्मृति आम्हाला सन्मार्ग दाखवो, सद्व्यवहार शिकवो.
स्वराज्यासाठीं तुम्ही जीवनाचा होम पेटवला. सारे बौध्दिक आनंद दूर ठेवलेत. वेद, गीता, उपनिषदे, सारे वाचावयाला तुरुंगांत वेळ. बाहेर स्वातंत्र्याचा ध्यास.