Get it on Google Play
Download on the App Store

हिमालयाची शिखरे 17

राजाजी शतायु होवोत

८ डिसेंबरलाराजाजींचा वाढदिवस होता. आज हिंदुस्थानचे ते गव्हर्नर जनरल आहेत. महात्माजींनीं हिंदुस्थानच्या राजकारणांत नवयुग आणलें. जसे पंडित मोतीलाल, दे. दास त्यांना मिळाले, त्याचप्रमाणें राजाजी. परंतु देशबंधु व मोतीलाल यांनी पुढें स्वराज्य पक्ष काढला तसें राजाजींनीं केले नाहीं. गांधीजी त्या वेळेस तुरुंगात होते. राजाजी विधायक कार्यावर भर देत राहिले. गांधीजींचा शब्द त्यांना प्रमाण वाटे. खादीच्या कार्यात त्यांनीं चैतन्य ओतलें. त्यांनीं आश्रम काढला. संघटनेचें जाळें विणलें. १९३४ नंतर कायदेमंडळाचें युग येऊं लागले. ३४ च्या मुंबईच्या काँग्रेसमध्यें महात्माजी अधिकृतपणें काँग्रेसपासून दूर झालें. त्यावेळीं राजाजी म्हणाले, “महात्माजींचा काँग्रेसमधील प्रवेश जेवढा भव्य, तितकेंच त्यांचे आज दूर होणेंहि भव्य आहे.”  प्रथम मंत्रिमंडळें आलीं. राजाजी मुख्य मंत्री झाले. ते लेपेचेपे नव्हते. एकदां काँग्रेसच्या आमदारांना जमवून म्हणाले, “मी असें कर्जबिल आणणार आहे. तुम्हांला संमत नसेल तर हा माझा राजीनामा घ्या” असें निर्भयपणे आमदारांना सांगणारे ते होते.
मद्रासभर त्यांनी हिंदीप्रचारास कायद्यानें जोर दिला. शाळांतून हिंदी ठेवण्यांत आली. त्यांना विरोध झाला. त्यांनी जुमानला नाहीं. दारुबंदीसही केवढी चालना त्यांनीं दिली !  स्वत: प्रचारार्थ जात. गावोगांवच्या मायबहिणी त्यांना ओवाळीत. कारण दारुबंदी झाली तर मायबहिणींचे संसार सुखाचे होणार होते.
राजाजी सुंदर सोपें बोलतात. ते वादविवादपटु आहेत. प्रतिपक्षाची उपहासगर्भ टिंगल करतात. त्रिपुरी काँग्रेसच्या वेळेस प्रदर्शन मंडपातील भाषणांत म्हणाले, “गांधीजींचें नेतृत्व तुम्हाला तारील. ही नौका सुरक्षित नेईल. भोंकें पडलेल्या दुस-या नौकांत नका बसूं. फसाल.”

मद्रासकडील निवडणुकीच्या दौ-यांत ते नेहमीं हनुमानाचा आदर्श ठेवा म्हणायचे. निवडणुकीच्या फलकांवर हनुमानाचें चित्र असायचें. हनुमान म्हणजे निर्धार नि निष्ठा. रामाला हनुमान तसे तुम्ही महांत्माजींना व्हा, काँग्रेसला व्हा असें ते सांगत.

परंतु महात्माजींचे एकनिष्ठ अनुयायी असले तरी आंधळे भक्त नव्हते. चलेजावचा लढा त्यांना पसंत नव्हता, ते त्या लढयात सामील झाले नाहींत. जिनांजवळ तडजोड व्हावी म्हणून खटपट करीतच होते. कांहीं तरी करुन शांततेनें देशाचा प्रश्न सुटावा असें त्यांना वाटे. त्यांची टिंगल झाली. मुंबईंत त्यांच्यावर डांबर उडवण्यांत आलें. सिमल्याला जोडे फेकण्यांत आले. परंतु अशानें भिणारे ते नव्हतें. सर्वांचा विरोध सहन करुन ते स्वत:ची मतें प्रतिपादित राहिले.

त्यावेळेस महात्माजींचा येरवडयास हरिजनांसाठीं उपवास सुरु होता. मसुदा तयार होईना. राजाजी एकदां सरदारांना म्हणाले, “तुम्ही तरी गांधीजींना उपवास सोडयला सांगा.”  सरदार म्हणाले, “त्यांच्याहून अधिक पवित्र नि विशुध्द आत्मा मी पाहिला नाहीं. मी त्यांना काय सांगणार ?”

राजाजी अति साधे आहेत. मद्रासचे गव्हर्नर होते. तरी स्वत: हातानें धोतर धुवायचे ! आजहि धूत असतील. तोच वेष, तीच राहणी-तुरुंगांत एका बादलीभर पाण्यांत सारें आटपायचे. ते पहाटे ५ ला उठत.

उठतात, प्रार्थना म्हणतात. गीता, उपनिषदें यांचे भक्त. तुरुंगांत गीतेवर प्रवचनें द्यावयाचे. त्यांनी तामीळ भाषेंत गोष्टी लिहिल्या आहेत. हिंदीत त्यांचा अनुवाद झाला आहे. साधे सुंदर लिहिणें. जेलमध्यें स्वत:चे फाटके कपडे शिवायचे. इतर राजबंदीहि त्यांच्याजवळ स्वत:चे फाटलेले कपडे आणायचे आणि राजाजी शांतपणें शिवायचे.

हिमालयाची शिखरें

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
हिमालयाची शिखरे 1 हिमालयाची शिखरे 2 हिमालयाची शिखरे 3 हिमालयाची शिखरे 4 हिमालयाची शिखरे 5 हिमालयाची शिखरे 6 हिमालयाची शिखरे 7 हिमालयाची शिखरे 8 हिमालयाची शिखरे 9 हिमालयाची शिखरे 10 हिमालयाची शिखरे 11 हिमालयाची शिखरे 12 हिमालयाची शिखरे 13 हिमालयाची शिखरे 14 हिमालयाची शिखरे 16 हिमालयाची शिखरे 17 हिमालयाची शिखरे 18 हिमालयाची शिखरे 19 हिमालयाची शिखरे 20 हिमालयाची शिखरे 21 हिमालयाची शिखरे 22 हिमालयाची शिखरे 23 हिमालयाची शिखरे 24 हिमालयाची शिखरे 25 हिमालयाची शिखरे 26 हिमालयाची शिखरे 27 हिमालयाची शिखरे 28 हिमालयाची शिखरे 29 हिमालयाची शिखरे 30 हिमालयाची शिखरे 31 हिमालयाची शिखरे 32 हिमालयाची शिखरे 33 हिमालयाची शिखरे 34 हिमालयाची शिखरे 35