हिमालयाची शिखरे 24
क्रांतिवीर
सरदार भगतसिंग
सरदार भगतसिंगांचा जन्म १९०७ च्या ऑक्टोबरमध्यें झाला. ज्या दिवशीं ते जन्मले त्याच दिवशीं तुरुंगांत त्यांचे एक चुलते वयाच्या केवळ २८ व्या वर्षी मरण पावले. सरदारांचे दुसरे चुलते अजितसिंह हयांना २० वर्षांची हद्दपारी होती. त्यांची हद्दपारी नेहरु सरकारने रद्द केली आणि ते मायभूमीला परत आले. सरदारांच्या वडिलांचें नांव किसनसिंग. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग व आजी जयकुंवर फार देशाभिमानी होतीं. भगतसिंगांचा खटला चालला होता तेव्हां ८० वर्षांचे वृध्द आजोबा अभिमानानें खटला ऐकायला येऊन बसत. आजीनें एकदां सुफी अंबाप्रसाद या अज्ञात देशभक्ताला घरांत थारा दिला होता. पोलीस आले परंतु तिनें दाद दिली नाही. त्यावेळेस लाहोरला खालसा हायस्कूल होतें. परंतु ही शिक्षणसंस्था शीखांची असूनहि ती राजनिष्ठ म्हणून वडिलांनीं आपल्या मुलास दयानंद अँग्लोवैदिक हायस्कुलांतच घातलें. त्यांना देशावर प्रेम करणारा धर्म हवा होता.
परंतु असहकार आला. जालियानवाला बागेंत हत्याकांड झालें पंजाबभर लष्करी कायद्याचा धिंगाणा होता. काँग्रेसनें बहिष्कार पुकारला. भगतसिंग शाळा सोडून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांचें जेमतेम १४ वर्षांचें वय. लाहोरच्या नॅशनल कॉलेजांत ते दाखल झाले. तेथेंच सुखदेव, यशपाल, वगैरेंशीं मैत्री झाली. पहिल्या महायुध्दांत अनेक शीखांवर बंडाचे खटले झाले होते. त्यांच्या त्यागाच्या कथा भगतसिंग ऐके. ‘बाबर अकाली’ पक्ष पंजाबांत होता. त्यांच्याहि गोष्टी कानांवर येत. वडिलांनीं त्या क्रांतिकारकांना हजारो रुपयांची मदत केलेली. भगतसिंग लाहोर सोडून कानपूरला आले. तेथें हुतात्मा गणेश शंकर विद्यार्थी यांची नि त्यांची मैत्री जमली. १७-१८ वर्षांचें वय. परंतु क्रांतिकारक संघटना करण्याचें ठरलें. कारण महात्माजींचा सत्याग्रह थांबला होता. आणि त्यांना तुरुंगांतून सोडण्यांत आलें तेव्हां त्यांनी विधायक कामाला वाहून घेतले. पंडित मोतीलाल नेहरु, देशबंधु दास यांनी स्वराज्य पक्ष काढला. देशाच्या अशा परिस्थितींत तरुणांनीं पुन्हां क्रांतिकारक संघटना आरंभिली. ‘हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन’ स्थापण्यांत आली. शचिंद्रनाथ संन्याल, जोगेशचंद्र, पंडित रामप्रसाद बिस्मिल इत्यादी तरुण यांत होते. भगतसिंगहि सामील झाले. त्यांनी बलवंत नांव घेतलें. १९२६ मध्यें काकोरीला खजिना लुटला गेला. पुढें धरपकडी सुरु झाल्या. भगतसिंग लाहोरला गेलें. इकडे काकोरी कटातील आरोपी लखनौच्या जिल्हा तुरुंगात प्रथम होते. त्यांना पळवून नेण्याचा एक धाडसी कट सरदार भगतसिंगांनी केला. परंतु जमलें नाहीं. काकोरी कटांतील वीर फांशी गेलें. अनेकांना दीर्घकालीन सजा. भगतसिंगांच्या मनावर या गोष्टींचा अपार परिणाम झाला. ते लाहोरला खूप अभ्यास करु लागले. लाला लजपतराय यांनी तेथें “सर्व्हंटस् ऑफ पीपल” नावाची संस्था सुरु केली होती. तेथें ग्रंथालय होतें. भगतसिंगांनी शेकडों पुस्तकें वाचलीं. आयर्लंड, इटली, रशिया इत्यादि देशांच्या स्वातंत्र्याचे क्रांतीचे इतिहास वाचले. त्या ग्रंथालयाची जी नोंद-वही आहे ती बघितली तर इतकीं पुस्तकें वाचणारा त्या ग्रंथालयास कोणी मिळाला नव्हता असें दिसेल. नसलेलीं पुस्तकें ते मागवायला लावीत. लालाजीचें तर भगतसिंगवर पुत्रवत प्रेम जडलें.
१९२६ मध्यें लाहोरला रामलीलेची मिरवणूक होती. कोणी तरी बाँब फेकला. पोलिसांनीं भगतसिंगांनाच अटक केली. ते म्हणाले, “मी बाँब फेकला नाहीं. रामलीलेच्या मिरवणुकीवर का मी बाँब टाकीन ?” त्यांना ६० हजारांच्या जामीनावर मोकळे करण्यांत आलें. हायकोर्टानें पुढें जामीन रद्द केला.
आईवडिलांनी एका सुंदर मुलीजवळ लग्न ठरविलें. भगतसिंग म्हणाले, “माझा विवाह ध्येयाशीं लागलेला आहे. मातृभूमि दास्यमुक्त होईपर्यंत कोणत्याहि मोहांत न गुंतण्याचा मी निश्चय केला आहे.”