श्रीरामांची सतीकडून परीक्षा
भगवान शंकर व दक्षकन्या सती यांचा विवाह थाटात पार पडला. नंतर सर्वांचा निरोप घेऊन ते दोघे हिमालयाच्या शिखरावर विहार करू लागले. फिरत फिरत ते बैलावर बसून दंडकारण्यात आले. तेथे त्यांनी राम व लक्ष्मणाना पाहिले. रावणाने सीतेचे अपहरण केले होते. रामचंद्र अत्यंत व्यथित अंतःकरणाने तिचा शोध घेत होते. भगवान शंकरांनी प्रकट न होता प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. ते पाहून सती आश्चर्याने म्हणाली, "सर्व देव आपणास प्रणाम करतात. आपणच सर्व शक्तिमान आहात. मग आपण कुणाला नमस्कार केलात?" यावर शंकर म्हणाले, "हे श्रीराम म्हणजे साक्षात विष्णूच आहेत. साधूंच्या रक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला आहे." पण सतीचा विश्वास बसला नाही. तेव्हा ते म्हणाले, "तू स्वतः श्रीरामाची परीक्षा घे, तोवर मी या झाडाखाली थांबतो." मग सतीने सीतेचे रूप घेतले व ती रामापुढे येऊन उभी राहिली. राम जर खरेच विष्णूचे रूप असेल तर तो सर्व समजेलच असा तिने विचार केला. सतीचे हे रूप पाहून रामांनी "शिवशिव' असा जप केला व नमस्कार करून म्हटले, "आपण शिवाला सोडून कशा आलात? आपण हे नवे रूप कशासाठी घेतलेत?" हे ऐकून सती आश्चर्यचकित झाली. शिवाचे बोलणे आठवून तिला स्वतःची लाजही वाटली. मग तिने घडलेली हकिगत श्रीरामांना सांगितली.
श्रीरामांनीही मनात शिवाचे स्मरण केले. मग आपण भगवान शिवांनाही वंदनीय कसे झालो याचा थोडा पूर्वेतिहास त्यांनी सतीस सांगितला. ते म्हणाले, "एकदा शिवांनी विश्वकर्म्यांकडून एक सुंदर भवन बनवल व भगवान विष्णूंना मोठ्या प्रेमाने तेथे बोलावले. त्यांना स्वतःजवळील तीन शक्ती, अनेक सिद्धी दिल्या व इथे राहून जगाचे पालन करावे अशी आज्ञा केली. स्वतः आपल्या परिवारासह कैलासावर गेले. तेव्हापासून विष्णू निरनिराळे अवतार घेऊन जगाचे पालन करतात. सध्या ते चार भावांच्या स्वरूपात अवतीर्ण झाले असून मी सर्वांत मोठा आहे." हे एकून शिवांप्रमाणेच सतीही रामचंद्रांची भक्त झाली.