कलंकी अवतार
द्वापार युगात भगवंतांनी वसुदेव-देवकीच्या पोटी श्रीकृष्णावतार व नंतर सावित्री आणि वसुतर यांच्या पोटी बौद्धावतार घेतला. हा अवतार गुप्त असून, गयासुर इ. राक्षसांचा गुप्तपणे वध या अवतारात झाला आहे. यापुढे कलियुगात त्रिवेणीसंगमावर भगवान कलंकी अवतार हीन कुळात घेतील, त्याची कथा ही अशी -
पूर्वी जाबाली नावाचा महान तपस्वी ऋषी होऊन गेला. ब्रह्मदेवांच्या वरामुळे त्याला दोन पुत्र व एक कन्या झाली. एकदा अचानक त्याची तब्येत अत्यवस्थ होऊन आपला मरणकाळ जवळ आला, असे त्याला वाटू लागले. जवळ असलेल्या कन्येस त्याने सांगितले, की माझ्या मृत्यूनंतर लगेच माझ्या हातातील मौल्यवान अंगठी काढून घे व तुझे भाऊ वनातून परत आल्यावर ताबडतोब त्यांना दे. जाबालीच्या कन्येने पित्याच्या मृत्यूनंतर अंगठी काढली, पण भावांना दिली नाही. शोकमग्न अवस्थेत दोघा भावांनी प्रेत स्मशानात नेल्यावर त्यांना पित्याच्या बोटातील अंगठीची आठवण झाली. त्यांनी बहिणीला विचारले असता, तिने कानावर हात ठेवले. बहीण खोटे बोलत आहे, हे ओळखून भावांनी तिला ’तू नीच कुळात जन्म घेशील' असा शाप दिला. तिने पश्चात्ताप पावून उःशाप मागितला असता, तुझे लग्न उच्च कुळातील पुरुषाशी होऊन, कलियुग संपता संपता भगवान तुझ्या पोटी कलंकी अवतार घेतील व तुझा उद्धार होईल, असे सांगितले. याने समाधान न होऊन बहिणीनेही भावांना शाप दिला, की तुम्ही पक्षियोनीत जन्माला याल व त्या वेळी तुम्ही एकमेकांचे वैरी असाल. या शापांप्रमाणे जाबालपुत्र कावळा व पिंगळा या पक्षियोनीत जन्माला आले. त्यांचे प्रेम नाहीसे होऊन हाडवैर निर्माण झाले. कावळा झालेला मुलगा पुढे मानव योनीत दैत्यगुरू शुक्राचार्य झाले तर पिंगळा झालेला पुत्र देवगुरू बृहस्पती झाले. बृहस्पतीना त्रिकाल ज्ञान व शुक्राचार्याना संजीवनी विद्या प्राप्त झाली, तरी त्यांचे वैर तसेच राहिले.
हा सर्व वृत्तांत जनमेजयाला कथन करून पुढे वैशंपायन ऋषी म्हणाले,"कलियुग हे अत्यंत तापदायक युग असून, माणसे अधर्माने वागतील. पापांचा अतिरेक झाल्यावर भगवंताला कलंकी अवतार घ्यावा लागेल. ते दुष्टांचा संहार करतील, नंतर पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल व पृथ्वीवर सुखसमृद्धी येईल."