ध्रुवाची कथा
बृहस्पती नगराच्या उत्तानचरण राजाचा मुलगा ध्रुव. लहानपणी सावत्र आई सुरुची हिने केलेल्या अपमानामुळे या मनुष्यद्वेषी जगाचा संपर्क नको म्हणून तो मधुबन अरण्यात जाऊन तप करू लागला. त्याचे वाढलेले तपसामर्थ्य पाहून नारदाने इंद्राला सावध केले. सर्व देवांसह इंद्र विष्णू भगवानांकडे गेला व विष्णू-लक्ष्मीसह मधुबनात गेले. तेथे ध्रुवबाळाने त्यांच्याकडे मोक्षपद मागितले. यावर भगवंत म्हणाले, "तुला मोक्षपद मी दिलेच आहे; पण घरी जाऊन तू आधी आपल्या वडिलांच्या राज्याचा स्वीकार कर, उत्तम पद्धतीने राज्य कर. नंतर तू इच्छा करशील तेव्हा तुला मोक्षपद प्राप्त होईल." विष्णूंच्या आज्ञेनुसार ध्रुव परत येताच राजाने शुभमुहूर्त पाहून वायुकन्या विडा व कोंडा यांच्याबरोबर ध्रुवाचे लग्न लावून दिले व आपले राज्य त्याला दिले. सुरुचीलाही एक पुत्र असून, त्याचे नाव उत्तम होते. एके दिवशी उत्तम सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला होता. ते अरण्य यक्षपतीचे होते. दोघांचे युद्ध होऊन उत्तम त्यात मारला गेला. पुत्रशोकामुळे सुरुची वेडीपिशी झाली. "यक्षाची खोड मोडतो," असे म्हणून ध्रुव सैन्य घेऊन यक्षावर चालून गेला. दोन्ही सैन्यांत तुंबळ युद्ध झाले. ध्रुवाचे युद्धकौशल्य पाहून यक्षाने मायावी युद्ध सुरू केले. ध्रुवाच्या सैन्यात त्याने साप, विंचू सोडले. ध्रुवाचे सैन्य भयभीत होऊन पळू लागले. वसिष्ठ गुरुंच्या सांगण्यावरून त्याने श्रीविष्णूचे स्मरण केले. विष्णूंनी प्रकट होऊन ध्रुवाला आत्म्याविषयक उपदेश केला. त्यामुळे ध्रुवाच्या मनातील यक्षाविषयीचा वैरभाव मिटला. त्याने युद्ध बंद केले; तसेच सुरुचीची समजूत घातली. विष्णूच्या आज्ञेप्रमाणे ध्रुवाने आपला मुलगा उत्कल याला राजा बनवले व तो अढळपदाकडे निघून गेला.