Get it on Google Play
Download on the App Store

भृगुपुत्र शुक्राची कथा

श्रीरामांनी वसिष्ठाला विचारले,"हा बाहेरील संसार मनामध्येच कसा विस्तारला जातो, हे आपण मला दृष्टांताने समजावून सांगावे." यावर वसिष्ठांनी शुक्राची कथा सांगितली. भृगुऋषी मंदार पर्वतावर तप करीत असता, त्यांचा बुद्धिमान पुत्र शुक्र त्यांची सेवा करीत असे. ज्ञान व अज्ञानाच्या सीमारेषेवर असलेला तरुण शुक्र वेगवेगळ्या कल्पना करीत आपला वेळ घालवीत असे. एकदा भृगुऋषी समाधिस्थ असता शुक्राची नजर आकाशमार्गे चाललेल्या एका अप्सरेकडे गेली. शुक्र देहाने जरी तिच्या मागून गेला नाही, तरी तो मनाने तिच्यात गुंतला. डोळे मिटून तो मनोराज्यात गढून गेला. तिच्या मागून तो स्वर्गात पोचला, नंदनवनात हिंडला, कल्पवृक्षाखाली बसला, एवढेच काय त्याने इंद्राला जवळून वंदन केले. इंद्रानेही त्याला सन्मानाने वागवून तेथे ठेवून घेतले. तिथे ती अप्सरा त्याला भेटली व दोघांनी अनेक वर्षे तेथे सुखाने वास्तव्य केले. पुढे त्याला आपले पुण्य क्षीण झालेसे वाटले व आता आपण पृथ्वीवर पडणार, या भीतीने त्याचे दिव्य शरीर नष्ट होऊन तो खरेच खाली पडला.
शुक्राचा स्थूल देह नष्ट झाला; पण मरतेसमयीच्या नाना प्रकारच्या वासनांनी अनेक जन्म, अनेक वेगवेगळी शरीरे यांचा अनुभव घेत घेत शेवटी समंगा ऊर्फ महानदीच्या काठी तो मोठ्या समाधानाने तप करीत बसला. भृगूच्याजवळ असलेला शुक्राचा देह आता क्षीण, जर्जर झाला व जमिनीवर कोसळला. समाधीतून जागे झाल्यावर पुत्राचा देह पाहातच भृगू कालावर संतापले. आपल्या पुत्राचे त्या कालाने हरण केले म्हणून ते त्याला शाप देणार, एवढ्यात भगवान कालच प्रकट होऊन म्हणाले,"नेमून दिलेले काम आम्ही केले. शाप देऊन तू आपल्या तपाचा नाश कशाला करतोस? तू समाधीत असता शुक्राचे मन अनेक ठिकाणी आसक्त झाले, अनेक जन्म उपभोगून आता तो समंगातीरावर तप करीत आहे." मग भृगूने योगदृष्टीने आपल्या पुत्राच्या चरित्राचा विचार केला. कालाची क्षमा मागितली. भूतमात्रांना स्थूल व सूक्ष्म अशी दोन शरीरे असून, ती दोन्ही वस्तुतः मनच होत, हा सिद्धांत त्याला पटला.
भगवान काल व भृगू शुक्राकडे गेले. काळाच्या आज्ञेनुसार शुक्र भानावर येऊन ते तिघेही मंदार पर्वतावर परत आले. मग शुक्राने आपल्या पूर्वीच्या शरीरात प्रवेश केला. प्रथम जन्मातच ज्ञानसंपन्न झालेल्या या तुझ्या तनूला दैत्यांचे गुरुत्व करायचे आहे, महाप्रलयाचे वेळी तू ही तनू कायमची सोड व या प्राक्तनरूपी तनूने तू जीवन्मुक्त होऊन दैत्यगुरू बनून राहा, अशी काळाने शुक्राला आज्ञा केली. जो पुरुष चित्तरहित झाला त्याला इष्ट, अनिष्ट भेदाभेद राहत नाही, हे समजून घेत तो शुक्र परमपदापासून पूर्वकल्पातील आपल्या संकल्पामुळे उत्पन्न झाला.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
कर्णपुत्र वृषकेतूची कथा हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र कर्णपुत्र वृषकेतूची कथा पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा