शिवभक्त वीरमणी
श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञाच्या अश्वाबरोबर शत्रुघ्न, भरताचा पुत्र पुष्कल, हनुमान व इतर वीरांची योजना केली. नर्मदेच्या तटावर फिरत फिरत तो अश्व देवपूरनगरीत पोचला. तेथे वीरमणी राजा राज्य करीत होता. त्याचा मुलगा रुक्मांगद याने अश्वाला पकडले. आपला पिता वीरमणी यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असू शकतो, असे म्हणून याने अश्वाला राजधानीत आणले. राजा शिवभक्त होता. त्याने शिवांना हे सांगितले. शिव त्याला म्हणाले,"मी श्रीरामांना दैवत मानतो. तुझ्या मुलाने हे अद्भुत काम केले आहे, तर आता अश्वाचे नीट रक्षण कर. तसेच क्षत्रिय धर्माला जागून शत्रुघ्नाशी लढायला तयार हो. मी तुझ्या पाठीशी आहे."
इकडे नारदांकडून अश्वाचा तपास शत्रुघ्नास लागला. वीरमणी, रुक्मांगद, त्याचा भाऊ शुभांगद इ. सर्व जण सेनेसह युद्धाला सज्ज झाले. घनघोर युद्ध झाले. पुष्कलाच्या एका बाणाने राजा मूर्च्छित पडला. हनुमानानीही बराच पराक्रम गाजवला. आपल्या भक्ताचा असा पराभव होताना पाहून भगवान शंकर युद्धासाठी सिद्ध झाले. नंदी, वीरभद्र यांच्या साह्याने त्यांनी शत्रुघ्नाच्या सेनेची दाणादाण उडवली. हनुमानाचा पराक्रम पाहून शंकर संतुष्ट झाले. त्यांनी हनुमानाकडून दिव्य औषधी आणवून घेऊन मृत वीरांना जिवंत केले. पुन्हा युद्धाला सुरवात झाली. शेवटी शत्रुघ्नांनी रामाचे स्मरण करताच समोर यज्ञासाठी तयार झालेल्या पुरुषाच्या वेशात रामचंद्र उभे राहिले. हे पाहताच भगवान शिवाने त्यांचे पाय धरले व म्हटले,"माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी हे युद्ध केले. पूर्वी मी त्याला वर दिला होता, की देवपुरात तुझे राज्य येईल व श्रीरामांचा अश्व तिथे येईपर्यंत मी तुझे रक्षण करीन." यावर श्रीराम म्हणाले,"भक्तांचे पालन करणे हा देवांचा धर्मच आहे. माझ्या हृदयात शिव आहे व शिवाच्या हृदयात मी आहे. आपण दोघे एकरूप आहोत. जो आपला भक्त, तो माझाही भक्त."
रामचंद्राचे वचन ऐकून राजा वीरमणीने त्यांचे दर्शन घेतले, त्यांचा अश्व परत देऊन आपले राज्यही त्यांना अर्पण केले. राम रथात बसून परत गेले. राजा वीरमणी शत्रुघ्नाबरोबर आपली सेना घेऊन निघाला.