Get it on Google Play
Download on the App Store

२२-सोमनाथ १ (गिरनार)

सोमनाथ असे म्हटले की अनेक आठवणींची गर्दी मनामध्ये होते .  इतिहासामध्ये वाचलेल्या गझनीच्या महमूदाच्या सात स्वाऱ्या आठवतात .पहिल्या स्वारी पूर्वीचे अतिभव्य व खूप खूप श्रीमंत मंदिर आठवते .ब्राह्मणांचा मंत्रघोष कानांमध्ये गुंजारव करू लागतो .प्रत्येक स्वारीमध्ये उंटाच्या पाठीवरून लादून नेलेले सोनेनाणे जडजवाहीर  डोळ्यासमोर दिसू लागते .परकी आक्रमक तोही परधर्मीय इतक्या लांबून येतो. त्याला कोणीही प्रतिबंध करीत नाही. तर उलट त्याला मार्ग दाखवितात ,मदत करतात .हे सर्व आठवून वाचून मन खिन्न होते .पूर्वीच्या छोट्या छोट्या राज्यांची आपसातील भांडणे व त्यासाठी परकियांची बिनदिक्कत घेतली जाणारी मदत हे सर्व आठवू लागते .इतिहास काळामध्ये व वर्तमान काळामध्येहि, घरभेदीपणामुळे सर्वत्र धुमाकूळ घालून, जेवढे अहित व नुकसान परकीयांनी केले नाही ,तेवढे आपण परस्परातील भांडणातून केले आहे व करीत आहोत असे दिसते.आपण पारतंत्र्यातही त्यामुळेच गेलो.अजुनही ही आपली परंपरा चालूच आहे .मनुष्य स्वार्थी आहे ही वस्तुस्थिती आहे .तरीही आपल्या निष्ठा सहजासहजी मनुष्य इतक्या  कसा बदलू शकतो ,हे मात्र माझ्या आकलनाच्या बाहेर आहे .तरीही ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही .मनुष्याच्या मनामध्ये तात्विक बदल घडू शकतो. तात्विक बदल झाल्यामुळे एखादा एका पक्षाऐवजी दुसर्‍या  पक्षात गेला ,तर मी समजू शकतो .परंतु खुर्चीसाठी पैश्यासाठी पक्षबदलू बघितले म्हणजे मला इतिहासातून आपण काहीही शिकलो नाही असे आढळून येते . इतिहासामधून कोणीही काहीही शिकत नाही असा इतिहासाचा अनुभव आहे .आपण तांत्रिक प्रगती खूप केली असेलही परंतु स्वभाव परिवर्तन विशेष झालेले नाही असे म्हणावेसे वाटते .आपला मानसिक स्तर दोन चार हजार वर्षांपूर्वी जसा होता तसाच आहे असे वाटते .वस्तुस्थितीचा जशी आहे तसा स्वीकार करणे हेच योग्य होय .

नंतर आठवतो तो फाळणीच्या वेळचा व त्यानंतरचा काळ. जुनागड एक संस्थान होते त्याचा राजा मुस्लिम होता .प्रजा सर्वत्र दिसून येते त्याप्रमाणे बहुतांशी हिंदू व काही मुसलमान अशी होती.पाकिस्तानला जुनागड संस्थान हवे होते .ब्रिटिशांनी भारत सोडून जाताना भारताची जेवढी वाट लावता येईल तेवढी लावण्याचा प्रयत्न केला होता .देशाचे दोन खरं म्हणजे तीन (बांगलादेश )तुकडे केले .संस्थानिकांना तुम्ही स्वतंत्र आहात, भारतात विलीन व्हायचे कि पाकिस्तानात विलीन  व्हायचे की स्वतंत्र राहायचे ते तुमचे तुम्ही ठरवा म्हणून सांगितले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण इतके आतुर झालो होतो की ब्रिटिशांच्या जाचक व घातक अटी आपण मान्य केल्या .   एकेकाळी सौराष्ट्रामध्ये सुमारे शंभर संस्थाने होती .त्याचे काही राजे हिंदू व काही मुस्लिम होते .कच्छला लागूनच पाकिस्तानची सीमा होती .सोमनाथ, द्वारका ,गिरनार पर्वतावरील दत्त गुरूंचे स्थान, प्रभास तीर्थ, ही सर्व तीर्थस्थाने पाकिस्तानमध्ये जाण्याचा धोका होता.

वल्लभभाई पटेलांच्या कठोर व  मुत्सद्दगिरीपूर्ण  अशा धोरणामुळे, उरलेला भारत ,सर्व संस्थाने एकामागून एक विलिन होऊन संघटित झाला (काश्मिरचा अपवाद तो एक स्वतंत्र इतिहास आहे ) व एक उभारती आशियातील शक्ती म्हणून पुढे येऊ शकला .

वल्लभभाई पटेलांमुळे सोमनाथचे पुनर्निर्माण होऊ शकले. जवाहरलाल नेहरूंचा विरोध असूनही तत्कालीन राष्ट्रपती  डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मंदिराच्या उद्घाटनाला आले होते .

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आमची सोमनाथ यात्रा होय .सौराष्ट्रामध्ये जातच आहे तर दत्तजन्मस्थान अर्थातच जुनागड गिरनार ,गिरनार पर्वतांमधील सिंहांचे अभयारण्य, सोमनाथ, प्रभास तीर्थ ,कृष्ण निजधामाला गेले ती जागा (भल्लाक तीर्थ ,देहोत्सर्ग)द्वारका ,द्वारका बेट, महात्मा गांधींचे जन्मस्थान पोरबंदर व जामनगर पाहून परत अहमदाबादला यावे असे निश्चित केले .स्वाभाविकच सर्व इतिहास व भूगोल डोळ्यासमोर उभा राहिला .

जुनागडमधील एकच महत्त्वाची आठवण आहे .किल्ला म्युझिअम देउळ इ. पाहिल्यानंतर आम्ही गिरनार पर्वतावर जी  घाटी जाते त्याच्या पायथ्याशी आलो .दुसर्‍या  दिवशी सकाळी उठून आम्हाला गिरनार पर्वतावर श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी जायचे होते .वर जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत. डोल्या मिळतात का वगैरे  वगैरे चौकशी करायची होती .आम्ही कार्तिक नहिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये गेलो होतो .कार्तिक पौर्णिमेपर्यंत  तीर्थयात्रेसाठी यात्रेकरूंची ठिकठिकाणी गर्दी असते .शाळा कॉलेजेस यांना या काळामध्ये सुट्ट्या असल्यामुळे त्यांच्या ट्रीप्सचीही गर्दी असते. डोली मिळत असल्यास ती अगोदरच बुक करून ठेवावी असा विचार होता .केव्हा यावे लागते, वर जाउन येण्यासाठी किती वेळ लागतो ,कोणत्या सोयी आहेत ,वगैरे चौकशी करायची होती .त्या वेळेलाहि सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप दुकाने हॉटेल होती.वर जाण्यासाठी डोल्या विशिष्ट प्रकारच्या वापरल्या जात होत्या .आमच्या  डोळ्यासमोर आमच्या माहितीची नेहमीची डोली होती. ज्यामध्ये मांडी घालून किंवा पाय लांब करून व्यवस्थित बसता येईल .ज्या डोलीला खाली कुशनिंगहि असेल.नवारीच्या पट्ट्या जर डोलीला असतील आणि त्या असतातच तर स्वाभाविक कुशनिंग मिळते  .येथील डोल्या पाटासारख्या होत्या. त्याला चार बाजूला दौऱ्या अडकवलेल्या होत्या.त्यावर मांडी घालून व्यवस्थित बसणे कठीण होते .पाटाला गादी किंवा तत्सम काही कुशनिंग नव्हते .बाजूच्या दोर्‍या धरून ,पाय खाली सोडून, पाटावर बसावयाचे.लवकर पहाटे चार वाजता आले पाहिजे .बुकिंग सिस्टीम नाही .वजनावर ,येऊन जाऊन डोलीचे भाडे  होते .वजनाचे एकूण तीन गट केलेले होते .योग्य, मध्यम व जास्त .वरपर्यंत एकूण दहा हजार पायऱ्या आहेत वगैरे  माहिती मिळाली .(मधून मधून निरनिराळी देउळे व मठ लागतात इ.)त्या पाटावर बसून वर जात असताना पायावर ,कंबरेवर,हातावर,ताण येईल असे लक्षात आले .खडतर तपश्चर्येशिवाय श्री दत्तगुरूंचे दर्शन होणार नाही याची कल्पना आली. आपल्या प्रकृतीला झेपणारा हा प्रकार नाही असे लक्षात आले. 

अाम्ही सुमारे शंभर दीडशे पायर्‍या  प्रतिकात्मक चढून दिव्यांच्या उजेडात वर गेलो .असे दिवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रभर असतात असे कळले .रात्री पहाटे दिवसा केव्हाही लोक वरती जात व येत असतात असे कळले.घोड्यांची व्यवस्था नव्हती .आम्ही तिथूनच श्रीदत्तगुरूंना नमस्कार करून  हॉटेलवर परत आलो .

(हल्ली काय सुधारणा झाल्या आहेत रोप वे  आहे का काही माहिती नाही किंवा वाचनातहि आलेेले नाही )देवाचे देवीचे दर्शन कष्टाशिवाय घेणे होणे योग्य नाही असेही काही जणांचे म्हणणे आहे .

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही संरक्षित सिंह अभयारण्याकडे गेलो .तिथे एक म्युझियमही होते .सिंह पाहण्यासाठी सफारी होती .गर्दी खूप होती. सफारीसाठी बुकिंग केल्यावर दुपारी दीड दोनच्या सुमाराला आपला नंबर येईल असे कळले.तिथे कोणीही नीट उत्तर देत नव्हते .एकूण अव्यवस्था वाटली .एवढे करूनही सिंह दिसतील असे नाही असेही सांगण्यात आले .केवळ जीपमधून रानातून गवतातून फेरफटका होईल असे कळले.

म्युझियम पाहून, सिंहांचे भिंतीवर लावलेले निरनिराळे फोटो पाहुन,त्या फोटोला नमस्कार करून  चहा घेऊन, आम्ही पुढे सोमनाथसाठी मार्गक्रमण सुरू केले.

नेहमी प्रवास करताना माझा दृष्टिकोन इतराहुन वेगळा असतो असा माझा समज अाहे.लोकांची दृष्टी अंतिम ध्येय, साध्य, यावरती असते .मला नेहमी अंतिम साध्य,ध्येय याऐवजी त्या प्रवासामध्ये आनंद वाटतो .अंतिम साध्यापर्यंत पोचलो तर अर्थातच समाधान वाटते परंतु  नाही पोचलो तरी काही हरकत नाही ,अशी माझी धारणा असते .साध्यापर्यंतच्या प्रवासामध्येहि  खूप आनंद असतो असे मला वाटते.असो.जीवनात ज्याप्रमाणे हव्या असलेल्या सर्वच गोष्टी मिळतात असे नाही त्याप्रमाणेच प्रवासामध्येही सर्व  मनासारखे होतेच असे नाही .जीवन प्रवास जसा रमत गमत इकडे तिकडे पाहात करायचा असतो त्या प्रमाणेच स्थळ प्रवासही करावा, केला पाहिजे, मी करतो . गिरनार अभयारण्यातून निघून आम्ही सोमनाथकडे प्रस्थान केले.

१०/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com