Get it on Google Play
Download on the App Store

२-नैनिताल १९९८

जिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा पुन्हा जावे असे मला वाटते अशी जी काही भारतातील पर्यटनस्थळे आहेत त्यातील नैनिताल हे एक आहे . आम्ही गेलो त्यावेळी हल्ली सारखी ऑनलाइन बुकिंग करण्याची व्यवस्था नव्हती .साल बहुधा एकोणीसशे अठ्ठयाण्णव असावे.एका प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीकडे आम्ही बुकिंग केले .सर्व पैसे आगाऊ भरले होते.आयत्या वेळी आम्हाला असे सांगण्यात आले की पुरेसे बुकिंग न झाल्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आमचा माणूस पाठवू शकत नाही .ही तिकिटे व हे हॉटेलचे बुकिंग आम्ही केले आहे .तुमचे तुम्ही जा. तिथे एक आमचा माणूस आहे तो तुमची सर्व व्यवस्था करील .

आमचे आम्ही गेलो .तिथे जो कर्मचारी होता त्याची आम्हाला बसचे टॅक्सीचे बुकिंग करून देण्याशिवाय  काहीच मदत झाली नाही .बसचे टॅक्सीचे पैसे आम्हीच द्यायचे होते .कारण त्यांच्या पॅकेजमध्ये ते अंतर्भूत नव्हते. आम्ही त्यांची मदत घेतली नाही .आमचे आम्ही स्वतंत्र टॅक्सी घेऊन फिरलो. त्यामुळे काय फिरावे कुठे जावे याचे योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळू शकले नाही .

हल्ली कुठेही प्रवास करायचा म्हटला की इतक्या सुविधा इतकी माहिती उपलब्ध असते की  तुमचे तुम्ही काय पाहावे काय पाहू नये किती दिवस राहावे कुठे राहावे कोणत्या पद्धतीने फिरावे, (रेल्वे बस टॅक्सी विमान इत्यादी) ठरवू शकता.स्मार्टफोन नेट गुगल इत्यादींनी माहितीचा एक मोठा खजिना उपलब्ध करून दिला आहे .

वर म्हटल्याप्रमाणे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आम्ही जे फिरलो ते फिरलो पाहिले ते पाहिले!जर नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल कंपनीचा आपला माणूस आमच्या बरोबर असता तर जास्त व्यवस्थित पर्यटन झाले असते .

त्या वेळी दूरसंवाद संपर्काची परिस्थिती इतकी खराब होती की आम्ही नैनितालला असताना त्या चार  दिवसांत रोज दोन तीनदा एसटीडी बूथवर प्रयत्न करूनही आमच्या घरच्यांशी  संवाद साधू शकलो नाही .पूर्वी गावातल्या गावातही संपर्क करण्याचे काही साधन नव्हते .गेला म्हणजे गेला आणि आला म्हणजे आला अशी परिस्थिती होती .

आम्ही नाशिक ते दिल्ली व दिल्ली ते काठगोदाम रेल्वेने गेलो.न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवरून आम्हाला जुन्या दिल्ली स्टेशनवर गाडीसाठी जावे लागले .तिथे मी जे प्लॅटफॉर्म पाहिले तसा पॅटर्न तशी पद्धत मी तरी आणखी कुठे पाहिली नाही.एकाच प्लॅटफॉर्मवर दोन नंबर असतात आणि एकाच वेळी त्या प्लॅटफॉर्मवरून दोन रेल्वे गाड्या दोन दिशांनी जातात .जर प्लॅटफॉर्म नंबर आणि गाडी नीट पाहिली नाही तर घाई घाईत पूर्वेला जाण्याऐवजी आपण पश्चिमेला जाऊ. देवाच्या आळंदीला जाण्याऐवजी चोराच्या आळंदीला जाऊ किंवा त्याच्या उलट.असो. 

काठगोदाम हे उत्तरांचल प्रदेशात (उत्तराखंड प्रदेशात) नैनिताल जिल्ह्यात आहे.कुमाँऊ  प्रदेशात विविध प्रकारचे लाकूड विपुल प्रमाणात आहे .ते सर्व लाकूड रेल्वेने जाण्यासाठी या रेल्वे स्टेशनवर येते .म्हणून या शहराचे नाव काष्ठगोदाम लाकडाचे गोदाम असे आहे.

काठगोदाम ते नैनिताल आम्ही टॅक्सीने गेलो .हे अंतर फक्त तेहतीस किलोमीटर आहे परंतु टॅक्सीने जाण्यासाठी जवळजवळ सव्वा ते दीड तास लागतो.रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे स्वाभाविकच जास्त वेळ लागतो.हिमालयातील विशेषत: आणि कोणत्याही मोठ्या पर्वतावरील डोंगरावरील रस्ते सरळ कधी नसतातच वळणा वळणाचे असतात .प्रवासासाठी त्यामुळे खूप वेळ लागतो .   

नैनितालला तसे केव्हाही जावे निरनिराळ्या ऋतूतील निरनिराळा नजारा अनुभवायला मिळेल .हिमालयातील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मार्च ते जून किंवा सप्टेंबर हा काळ चांगला असतो .हवा तुलनात्मक थंड आणि आपल्याला सुखावणारी उत्साह वाढवणारी आनंददायी असते .नैनितालची हिमवृष्टी गारठा इत्यादी जर अनुभवायचे असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा अर्थातच उत्तम काळ होय .

हिमालयात केव्हाही पाऊस येऊ शकतो .नैनितालला आम्ही गेलो त्यावेळी चक्क ऊन होते किंचित उकडत होते.रात्री एवढा जोरदार पाऊस झाला कि त्यामुळे आम्हाला जाग आली.थंडीही प्रचंड वाजत होती. सकाळी चक्क ऊन पडले होते . पावसाचा कुठेही वासवारा दिसत नव्हता . आम्ही एकूण चार दिवस नैनीतालला होतो.त्याकाळात नंतर केव्हाही पाऊस पडला नाही .

नैनातलावाचा आकार उंचावरून पाहिले तर डोळ्यासारखा दिसतो. म्हणूनच त्याला नैनिताल असे नाव पडलेले असावे .तलावाच्या सभोवती फिरण्यासाठी  अर्धवर्तुळाकार रस्ता आहे .दुसऱ्या अर्धवर्तुळ बाजूला सार्वजनिक रस्ता त्यावेळी नव्हता .तिथे बरीच रेसिडेन्शियल स्कूल्स व कॉलेजेस आहेत असे समजले .अर्धवर्तुळाच्या एका कोपऱ्यात नयना देवीचे मंदिर आहे.(हा काली मातेचा अवतार आहे .)शंकराची पत्नी सती हिने  ती अपमानित झाल्यामुळे रागाने यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिले . श्री शिव क्रोधित होऊन सतीचे जळते शरीर घेऊन त्रिभुवनात हिंडले . जळते शरीर घेऊन श्री शिव जात असताना विष्णूनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे एकावन्न तुकडे केले .तिचे निरनिराळे अवयव जिथे पडले ती शक्तीपीठे झाली .सतीचे डोळे इथे पडले असे मानले जाते.सत्ययुगात नैनादेवी मंदिर निर्माण केले गेले असे समजले जाते . सतीचे डोळे इथे पडले म्हणूनही कदाचित नैनिताल असे नाव तलावाला व शहराला  पडले असावे. एकूण शक्तिपीठे किती आहेत याबद्दल मतभेद आहेत. एक्कावन , एकशेआठ ,एकशेदहा नावे सांगितली जातात .लंका ,पाकिस्तान, बांगलादेश,नेपाळ, यांमध्येही शक्तीपीठे आहेत .त्यावरून एके काळी हा सर्व प्रदेश एकच असावा असे वाटते .

होडीतून काठावरून हॉटेलमधून डोंगरावरून कुठूनही तलावाकडे पाहताना तलावाची निरनिराळी रूपें आकार दृष्टीला पडतात .तो पाहताना होणारा आनंद समाधान  उल्हासित वृत्ती प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे .तलावामध्ये बोटिंग  हा एक आगळाच आनंद आहे .शिडाची होडी, स्पीड बोट ,वल्हवण्याची होडी,पायडल बोट, प्रत्येक बोटीतून जाण्याचा आनंद आगळाच .शेवटच्या दोन प्रकारातील आनंद आम्ही अनुभवला .काठावरून तलावाकडे किंवा तलावातून काठाकडे पाहण्याचा आनंद  आगळाच.

कोणतेही हिलस्टेशन डोंगरावर पायऱ्या पायऱ्यांनी  वसलेले असते .रस्ता दुकाने हॉटेल्स त्यामागे बंगले घरे अशी चढती शिडी किंवा शिखराकडून पायथ्याकडे उतरंड पाहताना मजा वाटते.

हातांनी बनविलेल्या मेणबत्यांसाठी नैनिताल सुप्रसिद्ध आहे .लहान मोठ्या आकाराच्या, निरनिराळ्या डिझाइन्सच्या,कमीजास्त किमतीच्या,निरनिराळ्या रंगांच्या,कमी जास्त उंचीच्या मेणबत्त्या पाहताना मन हरखून जाते .याशिवाय निरनिराळी सरबते जाम स्क्वॅशेस् हेही येथे चांगली व स्वस्त, (खात्रीशीर दुकानातून घेतल्यास) मिळतात.याशिवाय निरनिराळी फळेही  स्ट्रॉबेरी ब्लूबेरी अॅपल चेरी पीच इत्यादी मिळतात .मुख्य दुकाने माल रोडवर आहेत . बारा बाजार वगैरे इतरही काही बाजार आहेत .

नैनादेवी मंदिर,नैना तलाव,माल रोड याशिवाय एरियल रोपवे,ऑब्झर्व्हेशन पॉइंट, टिफिन टॉप ,नैनिताल झू ,इ. पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.(एरियल रोप वे) सरकत्या पाळण्यातून आपण  ऑब्जर्वेशन पॉइंटला जातो.तेथून दुर्बिणीतून अनेक हिमशिखरांचे दर्शन होते.  त्याचप्रमाणे नैना तलाव तिथून सुरेख दिसतो .कोरलेल्या रेखीव डोळ्यासारखा दिसतो.आणि बाजूची झाडी व घरे दुकाने इत्यादी पापण्यांसारखी वाटतात .

थंडीमध्ये येथे मधूनमधून बर्फवृष्टीही होत असते .थंडीमुळे तलाव गोठल्याचे  कधी ऐकले नाही .

येथे अनेक नामांकित हायस्कूल व कॉलेज आहेत .यातील बरीच रेसिडेंशियल स्वरूपाची आहेत. अमिताभ बच्चन,कबीर बेदी हे शेरवूड कॉलेजमधून उत्तीर्ण झाले .निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे येथील विविध कॉलेजमधून उत्तीर्ण झालेली आहेत .जिम कार्बेट,एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळचे सेनापती सॅम माणेकशॉ हे त्यातील कांही होय.

शंभर दीडशे किलोमीटरच्या परिसरात आणखी काही पर्यटन स्थळे आहेत .सप्त ताल (सात तलाव ) भीम ताल हे तलाव प्रेक्षणीय आहेत.येथे गर्दी कमी, शांतता जास्त ,पक्षी बिनधास्तपणे फिरत असतात .तलावातील बोटिंगचा आनंद घेता येतो .येथे गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे निवासासाठी, ट्रेकिंगसाठी, जलविहार, वनविहारासाठी, हे आदर्श  पर्यटनस्थळ आहे .भीमताल तलावात एक लहान बेट आहे होडीतून त्या बेटावर जाता येते.तिथे एक चांगल्यापैकी रेस्टॉरंटही आहे .आम्ही तिथेच भोजन घेतले . भीमताल हे नैनीतालपासून  केवळ बावीस किलोमीटरवर असलेले सर्वात जवळचे प्रेक्षणीय स्थळ आहे. 

रानीखेत हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे .येथून हिमालयाच्या अनेक शिखरांचे मनोरम दर्शन होते.थंडीमध्ये इथे अनेकदा बर्फवृष्टी होते. मिलिटरीच्या कुँमाऊ रेजिमेंटचे येथे प्रमुख ठाणे व मिलिटरी  हॉस्पिटल आहे.आम्ही रानीखेतमधून टॅक्सीतून एक धावती चक्कर मारली . रानीखेत सुमारे सहा हजार फूट उंचीवर आहे.तर नैनीताल सुमारे सात हजार फूट उंचीवर आहे. रानीखेत म्हणजे राणीचे कुरण(सुरेख हिरवळ असलेला विस्तीर्ण लांबी रुंदीचा प्रदेश ) होय.सुधारदेव राजाने राणी पद्मिनीचे ह्रदय  येथे जिंकले .विवाहानंतर तिने येथेच राहण्याचे ठरविले .त्यामुळे राणीखेत नाव पडले असे सांगितले जाते .परंतु येथे राजवाडा मात्र नाही !

नैनीतालपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर जिम कार्बेट  नॅशनल पार्क आहे. हे अभयारण्य आहे. त्यात अभयारण्याच्या जीपमधून आम्ही चक्कर मारली. जवळजवळ तीन तास अंतर्गत भागात फिरूनही आम्हाला हरणाशिवाय आणखी काहीही दिसले नाही .येथील बंगाली वाघ प्रसिद्ध आहेत.बंगाली वाघ  बंगालमधून आणून येथे सोडण्यात आले .मोकळा वाघ आम्ही मध्यप्रदेशमध्ये कान्हा अभयारण्यात पाहिला तर मोकळे सिंह व पांढरे वाघ हे ओडिसामध्ये पाहिले .

नैनिताल रानीखेत ही सिनेमा शूटिंगसाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

एक दिवस जिम कार्बेट नॅशनल पार्क, एक दिवस भीमताल सप्त ताल रानीखेत इ.दोन दिवस नैनिताल असे फिरून आम्ही परत फिरलो .

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे काय बघावे त्यासंबंधी योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे जेवढे फिरता आले व पाहता आले तेवढे आम्ही पाहिले .

१४/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com