१३-बनारस (वाराणशी) (१९६९)
इकॉनॉमिक कॉन्फरन्ससाठी पाटणा येथे आम्ही(मी व पत्नी ) एकोणीसशे एकूणसत्तर साली गेलो होतो.त्यावेळी प्रयागराज, बनारस व खजुराहो अश्या तीन महत्त्वाच्या पर्यटनस्थळी आम्ही गेलो .त्यातील प्रयागराजबद्दल "संगमावरील डुबकी" या लेखात मी लिहिले आहे.पाटण्याहून परत येताना आम्ही बनारसला थांबलो होतो .आमच्याजवळ बनारसला थांबण्यासाठी जास्त वेळ नव्हता.दोन दिवसांत जेवढे पाहता येतील तेवढेच आम्ही फिरलो .बनारसला इतकी प्रेक्षणीय स्थळे आहेत की आठ दहा दिवस तिथे सहज राहता येईल.
बनारस म्हटले की अनेक ऐकलेल्या वाचलेल्या व सिनेमात पाहिलेल्या गोष्टींची आठवण येते .पांडवापासून ते मोदींपर्यंत अनेक व्यक्ती व प्रसंग आठवतात. आम्ही सायकल रिक्षाने सर्वत्र फिरलो .दीड दिवस बनारस व अर्धा दिवस सारनाथ अशी वाटणी केलेली होती .
बनारस हा इंग्रजी उच्चार आहे .मूळ नाव वाराणसी परंतु साहेबाला कदाचित याचा उच्चार करता येत नसल्यामुळे बनारस नाव रूढ झाले असावे .बनारस, वाराणशी,काशी,या नावांप्रमाणेच याला अविमुक्ता, आनंदवन, रुद्रवास, या नावानेही ओळखले जाते .ही तीन नावे विशेष प्रचलित नाहीत .बनारस गंगेच्या काठी आहे . वरुणा व असी अशा दोन नद्या गंगेला येथे मिळतात त्यामुळेही कदाचित वाराणसी असे नाव पडले असावे .याचे दुसरे नाव काशी होय .हिंदू पुराणानुसार सप्तपुरी मोक्षदायीनी समजल्या जातात .त्यापैकी एक काशी आहे.सप्तपुरी:अयोध्या (विष्णू /राम)मथुरा (विष्णू /कृष्ण) ,हरिद्वार (शिव /गंगाधर) , वाराणसी (शिव/ विश्वनाथ),कांचीपुरम् (दुर्गा/ कामाक्षी), उज्जैन (शिव/महाकालेश्वर), द्वारका (विष्णू /कृष्ण), प्रयागराजच्या पूर्वेला सुमारे सव्वाशे किलोमीटरवर बनारस आहे .येथे गंगेचा थोडा प्रवास उत्तर दिशेने होतो .जिथे जिथे गंगा उत्तरवाहिनी झालेली आहे त्या त्या स्थळांना हिंदूंच्या दृष्टीने महत्त्व आहे .तिथे जाणे तिथे स्नान करणे तिथे वास करणे हे सर्व पुण्यप्रद समजले जाते .त्या त्या जागा तीर्थस्थान समजल्या जातात .उत्तराखंडमध्ये हरिद्वार, उत्तर प्रदेशमध्ये बनारस व भृगुधरा, या ठिकाणी ती उत्तर वाहिनी आहे.बिहारमध्येही गंगा तीन चार ठिकाणी उत्तर वाहिनी आहे .ती सर्व ठिकाणे तीर्थस्थाने समजली जातात
हिंदू पुराणानुसार शिव व ब्रह्मदेव यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले त्यामध्ये शंकराने ब्रह्मदेवाच्या पांच शिरापैकी एक शिर कापले.ते शिर हातात घेऊन शंकर बनारसला आले .ब्रह्मदेवाच्या शिराच्या तोंडात विजयपताका म्हणून शंकराने त्रिशूल टोचून तो त्रिशूल हातात धरून शंकर बनारसला आले .ते शिर शिवशंकर बनारसला आल्यावर जमिनीवर पडले आणि भूमीमध्ये गुप्त झाले.म्हणून ही भूमी अत्यंत पवित्र समजली जाते .
भारताची अध्यात्मिक राजधानी म्हणून बनारस प्रसिद्ध आहे .येथे सुमारे दोन हजार मंदिरे आहेत .इथे असंख्य घाट आहेत .प्रत्येक घाटाला काहीना काही पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे .गेली हजारो वर्षे भारताचे सांस्कृतिक केंद्र म्हणून बनारसचे स्थान आहे.त्याचप्रमाणे धार्मिक केंद्र म्हणूनही बनारसचे महत्त्व आहे . सांस्कृतिक व धार्मिक केंद्र याचा गंगेशी निकट संबंध आहे. गंगेच्या काठावर शवाचे दहन केल्यास,गंगेमध्ये अस्थी विसर्जन केल्यास ,जन्म मृत्यूचे चक्र लय पावते व मुक्ती मिळते असा विश्चास आहे .
ब्रह्महत्या , भ्रातृहत्या व जवळच्या नातेवाईकांची हत्या, यामुळे लागलेले पाप शंकरांच्या वराने नाहीसे होईल असे समजल्यामुळे शंकराच्या शोधात पांडव बनारसला आले होते .
या सर्व गोष्टींमुळे हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे .जगात घाटांचे शहर म्हणून हे ओळखले जाते .दशाश्वमेध घाट,पंचगंगा घाट ,मनकर्णिका घाट, हरिश्चंद्र घाट, (डोंब व राजा हरिश्चंद्र यांची कथा सर्वांनाच माहीत आहे) .हे त्यातील महत्त्वाचे घाट होय .यातील शेवटच्या दोन घाटावर प्रेताचे दहन केले जाते .प्राचीन पूर्वजांपासून येथे येऊन गेलेल्या हिंदूंची नोंद येथील ब्राह्मण मंडळींकडे असते.
शंकराचे शिवशंभूचे काशी विश्वनाथ मंदिर ,संकट मोचन हनुमान मंदिर ,दुर्गा मंदिर ,काशी नरेश स्थान ही सर्व बनारसची वैशिष्ट्ये तर आहेतच परंतु महत्त्वाची सांस्कृतीक केंद्रे आहेत .बनारस शिक्षणाचे व सांस्कृतिक केंद्र आहे.बनारस हिंदू विश्वविद्यालय हे आशियातील प्रसिद्ध निवास(residential) विश्वविद्यालयांपैकी एक आहे . वाराणसी येथे असंख्य तत्वज्ञ कवी लेखक व संगीतकारांचा जन्म झाला किंवा त्यांनी येथे दीर्घकाळ निवास केला.शास्त्रीय संगीतातील बनारस घराण्याचा उगम व विस्तार येथेच झाला. राष्ट्रीय विचारसरणीचे हिंदी भाषेतील पहिले वर्तमानपत्र "आज " एकोणीशेवीस मध्ये येथे प्रसिद्ध झाले .बनारस भारताची अध्यात्मिक राजधानी होती व आहे.
येथून जवळच सारनाथ आहे .बुद्धांना आत्मज्ञान झाल्यानंतर त्यानी त्यांचे पहिले प्रवचन येथे दिले असे समजले जाते. बुद्धानी धर्मचक्राला गती येथे दिली.बुद्ध धर्माची स्थापना येथे झाली असे मानले जाते.ख्रिस्तपूर्व सुमारे पाचशे वर्षे ही घटना घडली असे म्हणतात .
आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी बनारसची शिवाचे प्रमुख महत्त्वाचे स्थान म्हणून स्थापना केली . सर्व सृष्टी नष्ट होईल परंतु वाराणसी नष्ट होणार नाही अशी समज आहे.
मुस्लिम काळांमध्ये व मध्ययुगामध्ये येथे सांस्कृतिक विकास फार मोठ्या प्रमाणात झाला .बुद्धिवादी, गूढवादी, धर्म व शिक्षण या सर्वांचे बनारस हे केंद्र होते .त्यामुळे बनारसच्या प्रसिद्धीमध्ये भर पडली . प्रतिभासंपन्न कवी येथे होऊन गेले . हिंदूचे तीर्थस्थान, पूजास्थान ,वैदिक शिक्षणाचे स्थान, धर्मशिक्षणाचे स्थान, म्हणून बनारसचा विकास होत गेला .रामचरित मानस हा भगवान रामाच्या जीवनावरील काव्यग्रंथ तुलसीदासांनी येथे लिहिला.कबीर रविदास यासारख्या भक्तीपंथ पुढे नेणाऱ्या महान विभूती येथे होऊन गेल्या .
इसवीसन पंधराशे सातमध्ये गुरू नानक यांनी बनारसला महाशिवरात्रीला भेट दिली होती .शीख धर्माची स्थापना होण्यावर या भेटीचा दूरगामी परिणाम झाला असे म्हणतात.
सोळाव्या शतकात येथे हिंदू धर्माचे पुनरुत्थान झाले .मोगल बादशहा अकबर याने येथे शिव व विष्णू यांची दोन भव्य मंदिरे बांधली.पेशव्यांनी येथे अन्नपूर्णा मंदिर बांधले .
औरंगजेबाच्या काळात बनारसला अनेक मंदिरे नष्ट करण्यात आली अनेक मशिदी बांधण्यात आल्या.औरंगजेबानंतर येथे पुन्हा धर्म व संस्कृती यांचा विकास झाला . हिंदू राजे व पेशवे यांच्यामुळे बनारसचे पुन्हा सर्वक्षेत्रात सर्वदृष्टीने पुनरुत्थान झाले. आधुनिक बनारसचा विकास अठराव्या शतकात झाला.मन मंदिर घाटाला लागून वेधशाळेची स्थापना करण्यात आली .कलकत्त्याला जोडणारा रस्ता तयार करण्यात आला .ब्रिटिश काळात हाच पुढे ग्रॅन्ड ट्रंक रोड म्हणून पेशावरपर्यंत वाढविण्यात आला .
सत्राशे सदतीसमध्ये मोगल बादशहाकडून, काशीला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्य मिळेपर्यंत बनारसला हे विशेष स्थान होते .
मलमलचे कापड, रेशमी कापड ,हस्तिदंतावर कोरीव काम आणि हस्तिदंतापासून निरनिराळ्या वस्तूंची निर्मिती, शिल्पकला,अत्तर निर्मिती , असे अनेक उद्योग येथे निर्माण झाले व विस्तार पावले .बनारसी रेशमी साड्या तर सर्वत्र प्रसिद्धच आहेत .रेशमी विणकामाप्रमाणेच गालीचे निर्मिती व पर्यटन हेही येथील मोठे उद्योग आहेत .एकोणीसशे चौसष्टमध्ये डिझेलची रेल्वे एंजिन व भेल(bharat heavy electricals )यांचे कारखाने येथे सुरू झाले .
हिंदी उर्दू भोजपुरी तिन्ही भाषा येथे बोलल्या जातात .भोजपुरी ही हिंदीचीच एक बोलीभाषा आहे .
दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे येथून प्रचंड बहुमताने निवडून आले.
गंगेच्या पूर्व किनाऱ्यावर रामनगर किल्ला प्रसिद्ध आहे .हा किल्ला मुघल शैलीमध्ये बांधलेला आहे.हा किल्ला प्रेक्षणीय आहे .मोकळ्या विस्तीर्ण जागा, विस्तीर्ण बागा, निरनिराळी दालने, कोरीवकाम,सर्व काही प्रेक्षणीय आहे. काशी राज्याचा राजा काशी नरेश यांचे हे निवासस्थान होते .वेळेच्या अभावी आम्ही तो किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकलो नाही .
अनेक पाश्चात्य पौर्वात्य लेखक कवी तत्वज्ञ, गेल्या अनेक शतकांमध्ये बनारसला येवून गेले.या सर्व जणानी बनारसच्या संस्कृतीचे वर्णन केलेले आहे त्या संस्कृतीचा गुणगौरव केलेला आहे.
एकोणीसशे दहांमध्ये प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन लिहितो .हे शहर तर जुन्यात जुने आहे जुन्यापेक्षा जुने आहे इतिहासाच्या अगोदरचे आहे.परंपरा व इतिहास यापेक्षा जुने आहे .
दोन हजार चौदामध्ये पुराणवस्तू संशोधन खात्याने रामनगर व अख्त या बनारसच्या जवळच्या दोन ठिकाणी उत्खनन केले .ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपर्यंत इथे मानवी संस्कृतीचे अस्तित्व व ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांपासून सांस्कृतिक विकास झालेला आढळून आला.
आम्ही दोन दिवस सायकल रिक्षाने सर्वत्र फिरलो .आम्ही दशाश्वमेध घाट व्यवस्थित पाहिला .त्या वेळी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी काशी विश्वनाथ मंदिराजवळ रिक्षा जाऊ शकली नाही .बाहेर रस्त्यावर रिक्षावाला थांबला. त्याने आम्हाला एका गल्लीत सरळ जा म्हणजे तुम्हाला काशी विश्वेश्वराचे मंदिर मिळेल असे सांगितले .घाटाच्या सुरुवातीलाच मंदिर आहे .त्याला लागूनच औरंगजेबाने बांधलेली मशीद आहे .घाट रुंद भव्य व्यवस्थित व प्रेक्षणीय आहे.घाटावर स्नान किंवा इतर धर्मकृत्ये चाललेली होती .गल्लीमध्ये दोन्ही बाजूला मधूनच दुकाने निवासस्थाने होती.गल्लीमध्ये गुरांपासून गाईंपासून सर्वप्रकारची रहदारी होती.गल्ली अत्यंत अरुंद होती.हा घाट ब्रह्मदेवाने शंकराच्या स्वागतासाठी बांधला असे म्हटले जाते . दुसरी एक कथा या घाटावर यज्ञात दहा अश्व मारले गेले म्हणून दशाश्वमेध घाट .आम्ही आणखीही काही घाट पाहिले सर्व घाटाची रचना साधारणपणे एकाच पद्धतीची होती.प्रत्येक ठिकाणी घाटावर गल्लीबोळातून जावे लागत होते .
मनकर्णिका घाटावर अनेक प्रेते जळत होती .हा घाट बनारसमधील सर्व घाटांमध्ये अत्यंत पवित्र समजला जातो.येथे प्रेताचे दहन झाल्यास जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते असा विश्वास आहे.
पंचगंगा घाटावर पाच नद्या एकत्र मिळतात असा समज आहे .त्यामुळे येथील स्नान जास्त पवित्र समजले जाते.
गावाबाहेर बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या परिसरात नया विश्वनाथजीका मंदिर आहे .हे मंदिर बिर्लांनी बांधलेले आहे .मंदिर भव्य अत्यंत स्वच्छ व छानच आहे .तिथेही विशेष गर्दी नव्हती .शांतपणे देऊळ बघता आले .मूळ मंदिरापेक्षा याचा प्रभाव आमच्यावर जास्त पडला .अर्थात मूळ मंदिराला जे भावनिक महत्त्व आहे ते याला नाही .हे मंदिर विश्वविद्यालय परिसरात असल्यामुळे सायकलरिक्षातून येता जाताना विश्वविद्यालयाचे रिक्षातून दर्शन झाले .बनारस हिंदू विश्वविद्यालय पाहात असताना डॉक्टर अॅनी बेझंट,पंडित मदनमोहन मालवीय व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आठवण येणे स्वाभाविक होते.पंडित मदनमोहन मालवीय यांनी ते निवृत्त होण्याअगोदर ऑक्सफर्डहून राधाकृष्णनना मुद्दाम उपकुलगुरूपदासाठी बोलावून घेतले होते.
संकट मोचन हनुमान मंदिर सोळाव्या शतकामध्ये संत गोस्वामी तुलसीदासानी बांधले. आणखी काही मंदिरे पाहिली परंतु धावपळीत त्यांची विशेष आठवण नाही .बनारस शहर विशेष प्रभाव पाडणारे वाटले नाही.त्या वेळचे नाशिक जसे धार्मिक क्षेत्र मंदिरांचे गाव भट भिक्षुकांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते त्याच्या कित्येक पट परंतु तसेच बनारस शहर वाटले.आम्ही रिक्षावाल्याला रिक्षा निरनिराळ्या रस्त्यानी गल्लीबोळातून नेण्याला सांगितली त्यातून गावाचे सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले .ऐतिहासिक पौराणिक सांस्कृतिक संबंध लक्षात घेऊन एखाद्या मार्गदर्शकाबरोबर शहरात फिरण्या इतका आम्हाला वेळ नव्हता.
दुसऱ्या दिवशी आम्ही सारनाथला त्याच सायकलरिक्षाने गेलो .सारनाथ पर्यंत रेल्वे गेली आहे. सारनाथला रेल्वे जाऊन त्या वेळी दोन तीन वर्षेच झाली होती .वाराणसीपासून दहा किलोमीटरवर सारनाथ आहे.वरुणा व गंगा यांचा संगम तिथे आहे . गौतमबुद्धानी आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले.येथे हरीणांची बाग आहे .तेथे हरिणे मुक्तपणे फिरत असतात. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन त्या ठिकाणी दिले असे सांगतात . येथील स्तूप प्रसिद्ध आहे . सारनाथ मधील सर्वात आकाराने मोठी अशी ती वास्तू आहे.अशोकाने उभारणी केली त्यावेळी त्याची उंची ऐशी फूट होती असे म्हणतात .हल्ली ती सुमारे चाळीस पंचेचाळीस फूट असावी .
ऐशी फूट उंचीचा बुद्धाचा उभा पुतळा हल्ली उभारण्यात आला आहे.अशोकाने बुद्धधर्माचा स्वीकार केल्यावर येथे एक उंच खांब उभारला.त्यावर प्रसिद्ध सिंहमुद्रा होती. जवळच सारनाथ संग्रहालय आहे संग्रहालयामध्ये मूळ सिंह मुद्रा व अशोक चक्र पाहाता आले .
येथून जवळच एक किलोमीटरवर सिंघपूर आहे येथे जैनांचे अकरावे तीर्थंकर श्रेयसनाथ यांचा जन्म झाला.त्यांच्या स्मरणार्थ तिथे निर्माण केलेले जैन मंदिरही पाहण्यासारखे आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांनी जिथे गेलेच पाहिजे अशा चार स्थळांचा उल्लेख केला आहे .त्यातील एक हे आहे .
पुलावरून गंगामैय्या कशी दिसते ते पाहण्यासाठी आम्ही पुलावरही गेलो होतो .गंगेच्या पश्चिम बाजूलाच सर्व बनारस शहर पसरलेले त्यावेळी होते.
अशा प्रकारे दोन दिवसांत धावपळ करीत बनारस व सारनाथ पाहून आम्ही परतलो.
आणखी एक स्मरणीय आठवण म्हणजे दोन दिवस आम्हाला सतत फिरविण्याचे केवळ पंधरा रुपये सायकल रिक्षावाल्यांने घेतले.आम्हीच त्याला वीस रुपये दिले .
अलाहाबादला टांग्याचा तोच अनुभव आला.संपूर्ण दिवस त्याने केवळ पंधरा रुपयांत आम्हाला फिरविले .
महाराष्ट्राशी तुलना करता, येथील टांग्याचे दर लक्षात घेता, (त्या वेळी येथे ऑटोरिक्षा नव्हत्या.)येथे सायकल रिक्षा कधीच नव्हत्या .हे दर फारच कमी वाटले.
उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या मानाने फारच गरिबी व व स्वस्ताई आहे असे वाटले.
४/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com