१९-यमनोत्री
उत्तरांचल चारी धाम पैकी आमची तीन धाम झाली होती. उत्तरकाशी पासून आमचा यमुनोत्रीकडे चौथ्या धामकडे प्रवास सुरू झाला .याला जमनोत्री असेही म्हटले जाते .पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तरांचलमधील यमनोत्री गंगोत्री केदारनाथ व बद्रीनाथ ही चार धाम आहेत .पश्चिमेकडून पूर्वेकडे धाम सांगण्याचे कारण यात्रा या क्रमाने केली जाते.(आम्ही उलट्या क्रमाने येण्याचे कारण यमनोत्रीला निघाल्यावर तिथे भूस्खलन झाल्याचे कळले आणि त्यामुळे उलट्या क्रमाने आम्हाला यावे लागले) शेवटी बद्रीनाथ करण्याचे कारण म्हणजे येथे शिव व विष्णू एकत्र नांदतात असा समज आहे .यांना उत्तरांचल चार धाम किंवा छोटा चार धाम असेही म्हटले जाते. बद्रीनाथचा अंतर्भाव मोठ्या चार धाम यात्रेमध्येही होतो. मोठा चार धाम म्हणजे पूर्वेकडे जगन्नाथपुरी,उत्तरेकडे बद्रीनाथ, पश्चिमेकडे द्वारका, व दक्षिणेकडे रामेश्वर, होय.
यमुनोत्री उत्तरकाशी पासून सुमारे तीस किलोमीटरवर (सरळ रेषेत)उत्तरेकडे आहे .रस्त्याने हे अंतर सुमारे एकशेपंचवीस किलोमीटर आहे .बसने यमनोत्रीला जाता येत नाही .बस पायथ्याला जानकीचट्टीपर्यंत जाते.हिमालयातील वळणावळणाचा दर्याखोऱ्यांचा रस्ता असल्यामुळे सुमारे पाच तास या प्रवासाला लागतात .
रस्त्याने जानकीचट्टी पर्यंतच जाता येते .येथून पुढे साडेसहा किलोमीटर चालत, घोड्यावरून, किंवा डोलीने जावे लागते.आम्ही उत्तरकाशीहून बसने जानकीचट्टीपर्यंत गेलो.तिथे वस्ती करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही यमनोत्रीला जाऊन परत जानकी चट्टीला आलो.
आम्ही जानकी चट्टीला जिथे थांबलो होतो तिथे हॉटेलच्या मागच्या बाजूने यमुना वाहात होती.हॉटेलच्या पाठीमागे व्हरांड्यात खुर्च्या टाकून यमुनेच्या काठी बसल्यावर शांत व का कोण जाणे पवित्र वाटत होते.इथे यमुना ओढ्या सारखी लहान आहे .निसर्ग,शांतता ,पाणी, केवळ पाण्याचा आवाज,आणि पूर्व संस्कार यांमुळे पवित्र वाटत असावे .यमुना म्हटली की गोकुळ वृंदावन मथुरा हे सर्व आठवते.पूर्णपुरुष कृष्णाचे बालपण या नदीकाठी गेले.कुठेही यमुना पाहताना एवढेच काय यमुना हा शब्द कानावर पडला तरी कृष्णचरित्र आठवते. जानकी चट्टीला उष्ण पाण्याचे झरे आहेत . जानकीचट्टी पासून हनुमान चट्टी पर्यंत गेल्यानंतर चढाला सुरुवात होते. येथेही डोल्या वाहण्यासाठी जे श्रमिक भोई होते ते केदारनाथ प्रमाणेच नेपाळमधून आलेले होते .
यमनोत्रीला ,उंच कड्यावरून यमुना धबधबा स्वरूपात कालिंद पर्वतावरून खाली पडते.कड्याच्या, कालिंद पर्वताच्या पायथ्याला यमुनामातेचे मंदिर आहे.मूळ उगम यमनोत्री ग्लेसियर येथे होतो.ते सुमारे एकवीस हजार फूट उंचीवर आहे. या पर्वतावरील चंपासरग्लेशियर सरोवरात यमुनेचा उगम होतो असेहि म्हणता येइल हा स्रोतहि. गोठलेला बर्फमय आहे .अंतर फक्त एक किलोमीटर आहे. परंतु उंची यमनोत्री मंदिरापासून सुमारे चार हजार फूट आहे. समुद्र सपाटीपासून एकूण उंची सुमारे चौदा पंधरा हजार आहे. तिथे जाणे फार कठीण आहे . यात्रिक यमुना मातेच्या मंदिरा पर्यंत जातात. कालिंदी (यमुना)हिचे मंदिर व यमुना नदीचा उगम अशी दोन पूजा स्थाने आहेत .पूजा तिथेच केली जाते . तिथेच उष्ण कुंडही आहे. या तप्त कुंडाला सूर्यकुंड असे नाव आहे .पातळ वस्त्रांमध्ये बटाटे व तांदूळ बांधून या कुंडात धरले असता पाच मिनिटात भात व बटाटे शिजतात आणि तो भात व बटाटे प्रसाद म्हणून घेतला जातो. येथेच एक यमुनाबाई कुंड आहे .यात्रिक या कुंडात स्नान करून यमुना मातेचे दर्शन घेतात. शेजारी शेजारी दोन कुंडे एक अत्यंत तप्त कुंड जिथे पाणी उकळत असते व शेजारीच यमुना कुंड जिथे बर्फासारखे पाणी गार असते .हाही निसर्गाचा एक चमत्कारच .यमुना नदीला यमुना किंवा यमी असेही म्हणतात . आणखी एक नाव कालिंदी.मातेची मूर्ती काळीभोर सुबक देखणी आहे.ही मूर्ती काळ्या संगमरवरापासून बनवलेली आहे. मंदिर सुमारे दहा हजार फूट उंचीवर आहे .इथे यमुना नदीत स्नान केल्यास सर्व पातके नाश पावतात व स्वर्गात जागा मिळते अशी समजूत आहे.बंदर पूँछ पर्वताच्या कडेला हे स्थान आहे .
त्यासंबंधी एक कथाही सांगितली जाते .दोन भाऊ होते. ते खूप श्रीमंत होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती विलासात घालविली . चोऱ्या दरोडे फसवाफसवी अश्या अनेक गोष्टी करून असंख्य पापाचे धनी झाले.रानात हिंडत असताना त्यांना वन्यपशूने ठार मारले .मृत्यूनंतर ते यम दरबारात गेले.थोरल्या भावाला यमलोकी ठेवण्यात आले .तर धाकट्या भावाला स्वर्ग लोक मिळाला.
दोघांनीही एकाच प्रकारचे आचरण वर्तन पाप केले असताना एकाला यमलोक व दुसऱ्याला स्वर्गलोक असा भेदभाव का असे थोरल्या भावाने विचारले.त्यावर यमराजाने उत्तर दिले. धाकटा भाऊ रोज यमुना मंदिर जवळील यमुनेच्या पाण्यात स्नान करीत होता. त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी झाली .आणि म्हणून तो स्वर्गात गेला .
यमुनेला लहान लहान असंख्य नद्या येऊन मिळतात .परंतू गढवाल मध्ये कोणतीही मोठी नदी येऊन मिळत नाही.त्यामुळे अलकनंदा वर जसे पंच प्रयाग आहेत तसे यमुनेवर प्रयाग नाहीत .
यमुना नदी अत्यंत प्रदूषित आहे .या नदीच्या काठी घनदाट लोकसंख्या आहे .औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे .माणसे व उद्योग यांचे टाकाऊ पदार्थ सर्व नदीत जातात.यापासून खतनिर्मिती व पाण्याचा पुनर्वापर अत्यल्प प्रमाणात होतो.सर्वात जास्त प्रदूषण दिल्ली येथे होते .दिल्लीतील अठावन्न टक्के टाकाऊ पदार्थ यमुनेमध्ये जातात.
छोटा चारधाम यात्रेमध्ये बद्रीनाथ गंगोत्री या दोन ठिकाणी बस टॅक्सी जाते.यमनोत्री केदारनाथ येथे चालत घोडा किंवा डोली यांच्या साहाय्याने जावे लागते .
यमुना नदीचा ,उगमापासून अनेक ठिकाणी दर्शन घेण्याचा योग आला .त्यातील महत्त्वाची स्थाने म्हणजे मथुरा आग्रा दिल्ली नंतर अर्थातच प्रयागराज जिथे यमुना गंगेला मिळते.प्रयागराज म्हणण्याचे कारण सर्व प्रयागतीर्थामध्ये हे प्रयागतीर्थ अत्यंत पवित्र समजले जाते.
यमुना व गंगा या दोन नद्या सर्वात पवित्र मानल्या जातात .भारतीय संस्कृतीचा हा स्रोत समजला जातो .या दोन नद्यांच्या काठी भारतीय संस्कृती व सभ्यता रुजली उमलली फुलली .
२७/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com