Get it on Google Play
Download on the App Store

१८-कुलू

आमची बस सिमल्याहून जाताना कुलूवरून मनालीला गेली.मनालीहून परतीच्या प्रवासाला निघाल्यावर आम्ही कुलूला एक रात्र थांबणार होतो .मनालीहून निघाल्यावर कुलू शहरावरून बस मनकर्णिका उष्ण झऱ्यांकडे जाणार होती.पार्वती नदीच्या खोऱ्यात  नदी किनारी हे  उष्ण झरे आहेत.आम्ही वशिष्ट झरे पाहिलेले असल्यामुळे हे झरे पाहण्यासाठी न जाता कुलुलाच थांबण्याचे ठरविले .बस परत कुलूला संध्याकाळी येणार होती .दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दिल्लीला जाण्यासाठी निघणार होतो .दिल्लीहून लगेच नाशिकला रेल्वेने यायचे होते .सिमला मनालीला आमचे (अत्यंत व्यस्त ) हेक्टिक फिरणे झाले होते .थोडी विश्रांतीची गरज वाटत होती.त्यामुळे आम्ही कुलुलाच हॉटेलमध्ये उतरलो.

मनकर्णिका येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत .पार्वती नदीच्या काठी, खोऱ्यांमध्ये ते झरे आहेत .त्यांचे अौषधी गुणधर्म जगप्रसिद्ध आहेत.स्नायूदुखी सांधेदुखी इत्यादीवर  या पाण्याचे स्नान उपयोगी पडते.  हे झरे जवळजवळ दीड किलोमीटर परिसरात पसरलेले आहेत.झरे कुलूपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहेत.  उष्ण पाण्याच्या कुंडात भात बटाटे पाच मिनिटांत शिजतात .कुंडातून येणाऱ्या वाफेवर चपात्या भाजता येतात .वीस मिनिटात डाळी इ.अन्न शिजून तयार होते .  मनकर्णिका कुंडाबद्दल पुढील आख्यायिका सांगितली जाते .एकदा माता पार्वती या कुंडामध्ये स्नान करीत होती .स्नान करताना कुंडले पाण्यामध्ये पडली .ती पार्वतीला सापडत नव्हती .शिवप्रभू अतिशय रागावले आणि त्यांनी रागाने कुंडातील पाण्याकडे पाहिले .त्यामुळे पाणी उकळू लागले आणि ते अजूनही उकळतच आहे.कुंडातील पाण्यातून सहस्र कुंडले बाहेर आली. तिथेच गुरुद्वारा आहे.गुरुद्वारांमध्ये राहण्याची व भोजनाची सोय आहे . ही सर्व माहिती आमच्या बरोबरचे ट्रॅव्हलिंग कंपनीचे गाइड व जे आमचे स्नेही मनकर्णिकेला गेले त्यांनी सांगितली .

कुलूमध्ये गरम कपड्यांचे मोठे मार्केट आहे .त्या मार्केटमध्ये आम्ही एक फेरी मारली काही खरेदीही केली .कुलूच्या दक्षिणेला दहा किलोमीटरवर पार्वती नदी व्यास नदीला मिळते .संध्याकाळी आम्ही रिक्षा करून संगमावर गेलो.संगमावर जवळजवळ तासभर आम्ही संगम,दोन्ही नद्या ,पर्वत, खोरे ,गर्द झाडी, वगैरे  सर्व नजारा पाहत होतो. तिथे प्रचंड शांतता होती .केवळ वाहत्या पाण्याचा वाऱ्याचा व पक्षांचा आवाज येत होता .व्यास नदीचे खोरे जास्त रुंद आहे .ही नदी रोहतांग पास जवळ उगम पावते .  पुरातन काळी महाभारतातील काळात व्यास मुनींचा आश्रम मनाली येथे असल्यामुळे या नदीला व्यास असे नाव पडले .व्यासचा अपभ्रंश बिआस झाला .संगमावर आम्ही स्तब्धपणे जवळजवळ तासभर बसलेले होतो .कुलू खोरे अप्रतिम सौंदर्याने नटलेले आहे .हिमालयाच्या एका मागून एक उंच अश्या, एका पाठोपाठ एक असलेल्या ,दाट झाडीने आवृत्त व शिखरावर बर्फ असलेल्या, बर्फाच्छादित रांगा पाहताना समाधिस्थ  व्हायला होते .डोंगरावर सुरुवातीला तळाशी सफरचंद प्लम पीच अशा फळांच्या बागा आहेत .या झाडांची उंची अर्थातच कमी असते .त्यांच्यावर पाईन व पाम वृक्षांची दाट झाडी आहे .त्याच्यावर 

देवदार वृक्षांची दाट झाडी असते .हे सर्व दृश्य विलोभनीय दिसते .

वाहणाऱ्या नदीचा आवाज,गुंजन करणारे पक्षी , दाट झाडीतून वाहणार्‍या  वाऱ्याची सळसळ ,हे निसर्ग संगीत आपल्या बोलण्यामुळे बिघडवू नये असे आम्हाला वाटत होते. हे सर्व सृष्टी सौंदर्य पाहताना आम्ही नि:स्तब्ध झालो होतो .

कुलू शहर व्यास नदीच्या काठी आहे .ते सुमारे चार हजार फूट उंचीवर आहे.ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येथील हवा आल्हाददायक असते .डिसेंबर जानेवारीमध्ये किमान उष्णतामान उणे चार डिग्री पर्यंत जाते .

येथील जैव विविधता टिकविण्यासाठी  शेकडो चौरस किलोमीटर  पसरलेला नॅशनल पार्क आहे.तिथे अनेक अभयारण्य (सँक्चुअरी)आहेत .ज्याप्रमाणे येथे अनेक प्रकारची वृक्षसंपदा आहे. त्याचप्रमाणे जीव संपदाही आहे.अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणीही येथे आहेत .

कुलूपासून जवळच भुंतुर येथे विमानतळ आहे .याला कुलू मनाली विमानतळ असेही संबोधले जाते .येथे फक्त आठ सीटर विमाने येतात. दिवसातून तीनचार ट्रिप्स होतात.जवळचा विमानतळ चंदीगड येथे आहे . 

कुलू खोरे हे देवभूमी म्हणून ओळखले जाते .हिंदू बौद्ध व शीख यांची अनेक तीर्थस्थाने या कुलू खोऱ्यांमध्ये आहेत . असंख्य लांबलचक मोकळी कुरणे, हिमालय पर्वताच्या असंख्य रांगांचे विलोभनीय सौंदर्य,यासाठी कुलू खोरे प्रसिद्ध आहे .

असंख्य नैसर्गिक धाग्यापासून बनविलेल्या शालींसाठी व गरम कपडय़ांच्या उत्पादनासाठी  कुलू प्रसिद्ध  आहे .

रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा दसरा उत्सव सात दिवस येथे साजरा केला जातो.हिंदू पंचांगाप्रमाणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा उत्सव होतो .संपूर्ण देशामध्ये दसऱ्याचा उत्सव जेव्हा संपतो तेव्हा इथे दसऱ्याचा उत्सव सुरू होतो.

राज्य सरकारने कुलू दसरा उत्सवाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे या कालखंडात परदेशातून असंख्य पर्यटक उत्सव पाहण्यासाठी येतात .येथील रघुनाथांचे मंदिर प्रसिद्ध आहे.आम्ही त्याला भेट दिली .स्थानिक दोनशेहून अधिक देव देवता रघुनाथाच्या दर्शनाला या काळात कुलूला येतात .या काळात खोरे आनंदाने गजबजलेले असते .

इथला होलिका उत्सवही प्रसिद्ध आहे .तो दोन दिवस चालतो .शहरातील लोक मंदिरांमध्ये जमा होतात व नंतर गाणी गात  घरोघरी जाऊन तेथे लोकांनी दिलेली  गोड पदार्थ ,भजी ,खातात व पेय प्राशन करतात .पुरुषांबरोबर स्त्रियाही तेवढ्याच उत्साहाने या समारंभात भाग घेतात. 

येथेही मासे पकडणे राफ्टिंग ट्रेकिंग असे अनेक साहसी खेळ चालतात .

येथील अर्थव्यवस्था मुख्यतः  पर्यटक व विविध प्रकारच्या बागांमधून मिळणारे उत्पन्न यावर अवलंबून आहे .पीच,प्लम,सफरचंद या फळांच्या बागा आहेत .त्याचप्रमाणे शाली,लोकरी कपडे, हेही उत्पन्नाचे साधन आहे .

पर्यटकांना विविध प्रकारच्या सेवा देणे हे तरुणाई उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

पर्यटन कंपनीतर्फे आमचे कुलूला वास्तव्य हे दिल्लीला जातानच्या स्टेपिंग स्टोन सारखे होते .

दुसऱ्या दिवशी दुपारी अकरा वाजता आम्ही दिल्लीला जाण्यासाठी निघालो.

९/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com