Get it on Google Play
Download on the App Store

११-भगीरथ प्रयत्न

गंगावतरण

गौरीकुंडापासून आमचा प्रवास गंगोत्रीच्या दिशेने सुरू झाला.केदारनाथ ते गंगोत्री हे जर सरळ रेषेत अंतर पाहिले (आकाशमार्गे) तर ते तीस पस्तीस किलोमीटर असेल .परंतु रस्त्याने हे अंतर जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे. गौरीकुंड ते उत्तर काशी हे अंतर सुमारे दोनशे वीस किलोमीटर आहे .मोटारीने याला सुमारे आठ ते दहा तास लागतात .केदारनाथहून सकाळी डोलीने निघाल्यानंतर किंवा चालत किंवा घोड्यावरून एक दोन तास  गौरीकुंडपर्यंत यायला लागतात.गौरीकुंडहून रुद्रप्रयाग पर्यंत येऊन नंतर पुढे गंगोत्री च्या दिशेने जावे लागते.हिमालयातील रस्ते अत्यंत वळणावळणाचे आणि प्रचंड खोल दर्‍या  असलेले धोकादायक आहेत.भूकंप व भूस्खलन केव्हाही होऊ शकते .भूस्खलन झाल्यावर रस्ता बंद होतो .सर्व माती दगड वगैरे काढून रस्ता मोकळा करीपर्यंत एक दोन दिवस सहज जातात .तोपर्यंत दोन्ही बाजूची वाहने त्या त्या बाजूला अडकून पडतात .अगोदरच परतीची रिझर्वेशन्स विमान रेल्वे इत्यादी झालेली असल्यामुळे यात्रा अर्धवट सोडून परत फिरावे लागते .आम्हाला ऋषिकेशला असताना यमुनोत्रीच्या वाटेवर भूस्खलन झाल्याचे कळल्यामुळे तिकडून न जाता आम्ही प्रथम बद्रीनाथला गेलो . सर्वसाधारणपणे यात्रा पश्चिम ते पूर्व यमुनोत्री ते बद्रीनाथ अशी केली जाते.आम्ही भूस्खलनामुळे उलट दिशेने यात्रा केली .सप्टेंबरमध्ये भूस्खलन कमी असते.जून जुलैमध्ये पावसाच्या काळात भूस्खलन जास्त असते .तरीही आम्ही प्रवास केला त्या आठवडय़ांमध्ये दोन ठिकाणी (यमनोत्री वाटेवर व  बद्रीनाथ वाटेवर )भूस्खलन झाले .तरीही सुदैवाने आमची उत्तरांचल चारधाम यात्रा पूर्ण झाली .

बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री व यमुनोत्री ही चारधाम पूर्व पश्चिम अशी उत्तरांचलमध्ये आहेत .कुठच्याही दिशेने अापण आलो तरी उत्तर काशीला वस्ती केली जाते.उत्तरकाशी हे नावाप्रमाणेच उत्तरेकडील काशी म्हणजे वाराणसी होय .काशी विश्वेश्वराच्या वाराणसी येथील मंदिराप्रमाणे येथेही काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे .अत्यंत पवित्र तीर्थस्थानापैकी एक असे उत्तर काशी समजले जाते .येथे अनेक मंदिरे व घाट आहेत .येथे अनेक आश्रम धर्मशाळा व आधुनिक हॉटेल्स आहेत .प्रसिद्ध नेहरू माउंटनिअरिंग इन्स्टिट्युटही येथे आहे .वाराणसी प्रमाणे येथेही यात्रेकरूंची चांगलीच गर्दी असते .साधू मंडळीही बऱ्याच प्रमाणात आढळतात.भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर उत्तरकाशी वसलेले आहे .ही उत्तरेकडील काशी आणि येथे काशी (वाराणशी )येथील सर्व गोष्टी आढळतात. वरुणावत पर्वताच्या पायथ्याला उत्तरकाशी आहे .वरूणा व असी अशा दोन नद्या पर्वताला वळसा घालून  दोन बाजूंनी येतात त्यांच्या संगमावर मणिकर्णिका घाट आहे .तेथेच मणिकर्णिका कुंड आहे. वरुणा,असी आणि भागीरथी एकत्र मिळतात म्हणजे एकप्रकारे त्रिवेणी संगम येथे होतो.

उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी म्हणजे  काशी येथील मणिकर्णिका घाट प्रसिद्ध आहे.काशी येथे त्याच नावाचे कुंडही आहे .या कुंडात अस्थीविसर्जन केल्यास मोक्ष मिळतो अशी श्रद्धा  आहे.वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावर प्रेतदहनही पवित्र मानले जाते .

उत्पत्ती स्थिती लय अशा सृष्टीच्या तीन अवस्था असतात .ब्रह्मा विष्णू महेश या तीन त्या त्या अवस्थांच्या देवता मानल्या आहेत .शिव,सृष्टीचा लय करील त्यावेळी त्याने काशी स्थान नष्ट करू नये म्हणून विष्णूने हजारो वर्षे तपश्चर्या केली . प्रसन्न झाल्यामुळे दर्शन देण्यासाठी शिवपार्वती दोघेही काशी येथे आली .त्यांच्या स्नानासाठी साक्षात विष्णूने हे कुंड पवित्र गंगा नदीमध्ये खोदले .ते खोदताना त्याच्या कानातील मणी येथे पडला म्हणून या कुंडाचे नाव मणिकर्णिका कुंड व येथील घाट मणिकर्णिका घाट होय . विष्णूच्या विनंतीवरून शंकरानी येथे कायमची वस्ती केली .तोच काशी विश्वेश्वर होय.सृष्टी लय पावेल परंतु काशी लय पावणार नाही अशी समज आहे. उत्तरकाशीमध्ये वाराणसी प्रमाणे काशी विश्वेश्वर मंदिर, मणिकर्णिका घाट, मणिकर्णिका कुंड, इत्यादी आहेत .

उत्तरकाशीला येताना जवळच वाटेत प्रसिद्ध टिहरी धरण आहे . या धरणाचे आराखडे जवळजवळ एकोणीसशे सहासष्ट पासून तयार केले जात होते .धरणाला धार्मिक व राजकीय कारणास्तव विरोध, पैशांचा अभाव, राजकीय दुर्लक्ष,इत्यादी अनेक कारणांमुळे काम वेळोवेळी पुढे ढकलले गेले .एकोणीसशे सत्याण्णवमध्ये आम्ही गेलो त्यावेळी धरणाचे काम सुरू झालेले होते. आता धरण पूर्ण झालेले आहे .या पाण्यावर मोठ्या उताराचा फायदा घेऊन फार मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते .त्याचप्रमाणे याचे पाणी दिल्ली व राजस्थान पर्यंत जाते असे ऐकतो .

पवित्र भागीरथी नदीचा प्रवाह यामुळे आटेल.गंगा नदीचे पावित्र्य नष्ट होईल .यासाठी हे धरण करू नये म्हणून विरोध होता .धरण पूर्ण भरल्यानंतर हा प्रवाह सतत चालू राहील असा सरकारचा दावा होता .भागीरथीचा प्रवाह काही प्रमाणात आटला आहे ही गोष्ट खरी आहे . भागीरथी व अलकनंदा एकत्र झाल्यानंतर तिला गंगा असे नाव आहे.धरतीवर येताना गंगेच्या प्रवाहाचा वेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून ती दोन धारांनी पृथ्वीवर आली.एक भागीरथी दोन अलकनंदा . अलकनंदेचा प्रवाह भागीरथीच्या प्रवाहापेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे .त्यामुळे गंगेच्या प्रवाहावर  कोणत्याही दृष्टीने परिणाम झालेला नाही असे माझे मत आहे .

उत्तरकाशीहून गंगोत्री येथे जाऊन परत उत्तरकाशी येथे येण्याला  एक दिवस लागतो.अंतर जरी केवळ शंभर किलोमीटर असले तरी  घाट ,वळणा वळणाचा रस्ता यामुळे जाण्यासाठी चार पाच तास लागतात .

नाव गंगोत्री असे असले तरी प्रत्यक्षात नदीचे नाव भागीरथी आहे.भागीरथी देवप्रयाग येथे अलकनंदाला मिळते  नंतर पुढे एकत्रित प्रवाहाला गंगा असे नाव प्राप्त होते . गंगोत्रीवरून या गावाचे नावही गंगोत्री आहे .टॅक्सी बस इत्यादींची खूप गर्दी असते .रस्त्याच्या बाजूला गाड्या लावलेल्या असतात .आपल्या गाडीला जागा मिळेल त्याप्रमाणे आपल्याला गंगामंदिर व भगीरथ मंदिर येथपर्यंत जाण्यासाठी कमी जास्त  चालावे लागते .ही मंदिरे जिथे आहेत तिथे भागीरथीला, त्या ठिकाणाला गंगोत्री असे नाव आहे 

भगीरथाने ज्या शिळेवर उभे राहून घोर तपस्या केली त्या शिळेवर भगीरथाची मूर्ती आहे आणि त्यावर  मंदिर बांधलेले आहे.ज्या सागर बेटावर, सगर राजाच्या  साठ हजार मुलांचा, कपिल मुनींच्या क्रोधामुळे जळून मृत्यू झाला,ते सागर बेट कलकत्त्याच्या दक्षिणेला शंभर किलोमीटरवर आहे .गंगा नदीला तेथपर्यंत नेऊन आपल्या पूर्वजांना  मोक्ष मिळण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने गंगोत्रीपर्यंत एवढे लांब अंतर येऊन घोर तपश्चर्या केली व गंगेला स्वर्गातून भूतलावर आणली .

भगीरथाने काय काय प्रयत्न केले ते वाचून थक्क आयला होते .

अगोदर (विष्णूची)कपिल मुनींची प्रार्थना करून पूर्वजाना मोक्ष मिळण्यासाठी काय करावे लागेल  ते निश्चित केले.

घोर तपस्या करून गंगेला भूतलावर येण्यासाठी वश करून घेतले.

तिचा आवेग भूतलाला सहन होणार नाही यासाठी शंकरांना आपल्या जटामध्ये गंगेला उतरू देण्यासाठी तप करून प्रसन्न करून घेतले.

गंगेचे गर्वहरण करण्यासाठी शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये  नाहींशी केल्यावर त्यांची स्तुती,प्रार्थना व तपस्या करून पुन्हा गंगेला प्रवाहित केले.

जन्हू ऋषीचा यज्ञ गंगेने उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांनी गंगेला पिवून टाकले .त्या ऋषींची प्रार्थना व स्तुती करून पुन्हा गंगेला प्रवाहित केले.

दक्षिणगामिनी गंगेला वाराणसी येथे पूर्वगामिनी केले

नंतर तिला पुन्हा दक्षिणगामिनी केले.

केवढा प्रयास! केवढे तप !केवढी चिकाटी !

आपले पूर्वज मुक्त व्हावेत. त्यांना मोक्ष मिळावा।म्हणून एका वंशजाची केवढी धडपड !!

पंचविसशे किलोमीटरचा गंगेचा प्रवास योग्य दिशेने करून शेवटी तिला सागर पुत्रांच्या अस्थी व रक्षा  यांवरून नेले. (या प्रयत्नांना सुरुवात अगोदरच झाली होती .सगर राजाचा नातू अंशुमन व त्याचा मुलगा दिलीप यांनी खूप प्रयत्न केले .परंतु  ते यशस्वी झाले नाहीत. भगीरथाचे प्रयत्न यशस्वी झाले .)

म्हणूनच भीष्म प्रतिज्ञा हा शब्द वाकप्रचार जसा रूढ झाला आहे तसाच  प्रचंड चिकाटी प्रयत्न याला,भगीरथप्रयत्न असा वाक्प्रचार रूढ झाला आहे .

भागीरथीचा उगम गंगोत्री येथे नसून गंगोत्रीपासून सुमारे तीस किलोमीटरवर गंगोत्री ग्लेशियर येथे आहे.गंगोत्री येथे प्रचंड वेगाने भागाीरथी वहात असते. तिच्या पात्रात, पात्रात काय कडेला सुद्धा उभे राहणे शक्य नाही.नुसता हात बुडविला तरीसुद्धा तो वेगाने उताराकडे खेचला जातो .

गंगोत्री येथे कडेला उभे राहिल्यावर जी एक सात्विक पवित्र अनुभूती आली ती तिथे जावून प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे .

गंगासागर ते गंगोत्री विविध ठिकाणी गंगेचे घेतलेले दर्शन रूप डोळ्यासमोर उभे होते .

अश्या एक प्रकारच्या भावावस्थेत  असताना बसमध्ये बसून आम्ही परतीच्या(उत्तरकाशी) प्रवासाला सुरुवात केली .

१७/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com