१२-संगमावरील संस्मरणीय डुबकी
बहुधा एकोणीसशे एकूण सत्तर साल असावे .त्या वर्षी इकॉनॉमिक कॉन्फरन्स पाटणा येथे होती .माझे जाण्याचे अगोदर ठरले नसल्यामुळे मी रिझर्व्हेशन वगैरे काही केले नव्हते. दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला कॉन्फरन्स असावी .पंधरा डिसेंबरला मी जाण्याचे ठरविले.पंचवीस डिसेंबरला नाशिकहून निघावे लागणार होते. एकट्याने न जाता दोघांनीही जावे असे मनात आले .आमची मुलगी पाच वर्षांची होती .तिला तिच्या आजोबांबरोबर म्हणजे आईच्या वडिलांबरोबर आजोळी पाठवून दिली .आजोबा व नात यांच्यात चांगला संवाद असल्यामुळे मुलगी आजोबांबरोबर सहज हसत आनंदाने गेली. आम्ही दोघेही शिक्षण खात्यात नोकरी करीत होतो. नाताळची सुटी त्यावेळी असे .तू पुढे आजोबांबरोबर जा आम्ही पाठोपाठ सुटी लागताच येतो असे तिला सांगितले.थोडक्यात तिचा कात्रज करून आम्ही प्रवासाला गेलो .त्यावेळी पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी अशी नाताळची सुटी असे .
पाटण्याला जात आहोत तर शक्य झाल्यास वाटेवरील अलाहाबाद म्हणजेच प्रयाग राज, बनारस, व सातना येथून जवळ असलेली खजुराहो लेणी पाहावी असे मनात होते .त्या काळी हवाई प्रवास फार कमी होत असे.आमच्यासारखे मध्यमवर्गीय तर त्याचा विचारही करू शकत नसत.त्यामुळे अर्थातच सर्व प्रवास भारतीय रेल्वेने करण्याचे निश्चित होते.आयत्या वेळी रिझर्व्हेशन वगैरे मिळणे आणि करणे शक्य नव्हते .नेट डिजिटलायझेशन स्मार्ट फोन्स वगैरे नसल्यामुळे त्यावेळी ऑनलाइन रिझर्वेशन ही कल्पना कोणाच्या स्वप्नातही आली नव्हती.
जे फोन होते ते फक्त लॅण्डलाइन या स्वरूपात होते.फोन ही श्रीमंतांची वस्तू असा समज होता . बीएसएनएल ही स्वतंत्र सरकारी कंपनी निर्माण झालेली नव्हती.फोन हे पोस्ट अँड टेलिग्राफ यांचीच एक उपशाखा होती . व्यावसायिक, मोठे व्यापारी, श्रीमंत व्यक्ती वर्तमानपत्राचे संपादक ,वर्तमानपत्रे प्रिंटिंग प्रेस,अशांची ऑफिसेस यांमध्ये फोन असत.स्वतःच्या घरी फोन असणे ही कवी कल्पना होती .नंबर लावल्यावर फोन मिळण्यासाठी एखादी पिढी जावी लागे .पाच दहा हजार रुपये भरल्यास फोन लगेच मिळत असे परंतु तेवढे पैसे म्हणजे हल्लीच्या पैशांच्या स्वरूपात त्यावरती दोन किंवा तीन शून्ये दिली पाहिजेत.१९९२ साली आम्ही फोन घेण्यासाठी डिपॉझिट भरून नंबर लावला.जेव्हा बीएसएनएलचे विस्तारीकरण झाले त्यावेळी आम्हाला १९९८मध्ये फोन मिळाला. त्या काळी परस्पर संवादाचे साधन म्हणजे पोस्ट होते.कार्ड पाकीट तार ही परस्पर संवादाची साधने होती.परस्पर संवादासाठी पोस्टावर सर्वजण अवलंबून असत.पोस्ट त्या काळात अत्यंत कार्यक्षम होते.हल्ली नाही असे मला म्हणायचे नाही परंतु पोस्टाशी हल्ली विशेष संबंधच येत नाही.
पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर तार अॉफिस म्हणून एक वेगळा विभाग मोठ्या शहरांमध्ये असे .गावांमध्ये पोस्टमास्तरचा पुढ्यात तारयंत्र असे. कडकट् कडकट् कडकट् असे सारखे आवाज येत असत.सिग्नलद्वारे सांकेतिक भाषेत त्यावेळी मजकूर पाठविला जाई.तार येई त्यावेळी कागदावर सांकेतिक भाषेत ग्राफ येत असे.ती पाहून तार मास्तर त्याचे रूपांतर इंग्रजी भाषेमध्ये करीत असे. जर तार वेळेवर पोचली नाही तर एखादे वेळी विनोदनिर्मिती होई. तर एखादे वेळी हाहा:कार उडत असे.त्यासंबंधीच्या आठवणी व विनोद पुन्हा केव्हा तरी .दूरस्थ व्यक्तीना परस्पर संवाद साधणे किती मुश्किल होते ते हल्लीच्या पिढीला लक्षात यावे एवढाच या लिखाणाचा हेतू .
आता पुन्हा आपल्या प्रवासाकडे वळूया.रिझर्व्हेशन शिवाय आम्ही प्रवासाला निघालो .हल्ली अशा प्रवासाचा नाइलाज असल्याशिवाय कुणी सहसा विचारही करणार नाही .त्याकाळी रेल्वे गाड्या खूपच कमी होत्या . लोकसंख्याही हल्लीं पेक्षा बरीच कमी होती .त्यावेळी लोकसंख्या सुमारे पंचावन्न कोटी होती .आता ती सुमारे एकशे छत्तीस कोटी आहे .गरिबीही जास्त प्रमाणात होती. हल्ली प्रमाणे ऊठसूट प्रवास करण्याची पद्धत नव्हती .प्रवास बर्याच वेळा नाइलाजाने केला जाई .अप्रवास गमनम् सुख:असे संस्कृत वचन प्रसिद्ध आहे . पर्यटन संस्कृती जवळजवळ अजिबात नव्हती असे म्हणता येईल.
आम्ही सर्व प्रवास रिझर्वेशनशिवाय केला .नाशिक ते अलाहाबाद,अलाहाबाद ते पाटणा, पाटणा ते बनारस,बनारस ते सातना, (सातनापासून एकशे दहा किलोमीटरवर खजुराहो आहे)सातना ते नाशिक .हा सर्व प्रवास टप्प्या टप्प्याने रिझर्वेशन शिवाय रिझर्वड् बोगीमधून आम्ही केला.प्रत्येक ठिकाणी रिझर्वड् बोगीमध्ये आम्ही चढत असू. कंडक्टरला पाच रुपये जादा दिल्यावर रात्री झोपण्यासाठी बर्थ मिळे.शिवाय बसण्यासाठी सीटही उपलब्ध होई.रेल्वे गाड्या कमी असूनही रिझर्वड बोगींमध्ये कमी रिझर्वेशन्स असत.त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आरामशीर व्यवस्था थोडे जास्त पैसे देऊन होत असे .अर्थात त्या वेळचे पाच रुपये म्हणजे आजचे पाचशे हे लक्षात ठेवले पाहिजे.
आमचा पहिला टप्पा अलाहाबाद हा होता .स्टेशनवर आम्ही दिवसभर लागणारे सामान एका हँडबॅगेत काढून घेतले.उरलेले सामान क्लोकरूममध्ये टाकले.आम्ही दोघेही तसे फार भाविक त्यावेळी नव्हतो .संगमावर पाणी कसे असेल स्वच्छ की घाणेरडे? आसपास कोणकोण स्नान करीत असतील ?आपल्याला स्नान करावेसे वाटेल का ?आपण स्नान करायचे का ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते .आपण फक्त गंगा व यमुना यांचा प्रयाग येथे होणारा संगम पाहू . अलाहाबादमधील शक्य होतील तेवढी प्रेक्षणीय संस्मरणीय ठिकाणे पाहू.आणि संध्याकाळी पुन्हा स्टेशनवर येऊन पाटण्याला जाणारी गाडी पकडू असा बेत होता .आम्ही सकाळी दहाला अलाहाबाद स्टेशनला काशी एक्सप्रेसने पोहोचलो होतो .रात्री दहाला पाटण्याला जाणारी गाडी होती .आमच्याजवळ भरपूर वेळ होता.
शेवटी विचार करता आपण बरोबर कपडे घेऊन ठेवावेत. जर आयत्या वेळी स्नान करावे असे वाटले तर कपडे नाहीत असे होऊ नये.असा सूज्ञ विचार करून आम्ही एक्स्ट्रा कपडे घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो .त्याकाळी अर्थातच रिक्षा नव्हत्या .टॅक्सींतूनही फिरण्याची पद्धत नव्हती .गावात फिरण्यासाठी टॅक्सी फक्त मोठ्या मुंबईसारख्या शहरात उपलब्ध असत .
आम्ही एक टांगा ठरविला.संगमावर जाऊन संगमावर स्नान, शिवाय संपूर्ण अलाहाबाद दाखविणे,व रात्री आठच्या सुमारास स्टेशनवर आणून सोडणे.एवढ्या संपूर्ण काळासाठी पूर्ण प्रवासासाठी टांगेवाल्याने चौदा रुपये सांगितले.आम्ही परत अलाहाबाद स्टेशनवर आल्यावर टांगेवाल्याला दोन रुपये बक्षिसी म्हणून दिले. तो प्रचंड खूष झाला.त्याच्या चेहऱ्यावरील ती खुषी आजही मला दिसत आहे. त्या काळातील नाशिकचे दर पाहता निदान तीस ते चाळीस रुपये तरी एवढ्या काळासाठी व प्रवासासाठी पडले असते.उत्तर प्रदेश बिहारमधील त्या काळातील दारिद्र्य व स्वस्ताई यावरून लक्षात येते.तेथून कामासाठी लोक महाराष्ट्रात का येतात त्याचेही कारण लक्षात येते.संपूर्ण दिवसासाठी टांगा बुक केला याचे इतर टांगेवाल्यांना वैषम्य वाटत होते असे वाटले .आमच्या टांगेवाल्याचा चेहरा लॉटरी लागल्यासारखा होता. सबंध दिवसात त्यांना किती कमी भाडे मिळत असावे व त्यांमध्ये टांगेवाला, घोडा व टांग्याचा इतर खर्च भागत असावा.तेथील एकूणच दारिद्र्य व स्वस्ताई लक्षात येते .सायकल रिक्षाही मोठ्या प्रमाणात होत्या .परंतू आम्हाला त्यावेळी सायकल रिक्षाने जावे असे अनेक कारणामुळे वाटत नव्हते .
अलाहाबाद बघत बघत आम्ही प्रयागच्या सुप्रसिद्ध संगमावर गेलो. टांगेवाल्याचे एका पंड्याजवळ म्हणजे गुरुजींजवळ अर्थातच कनेक्शन होते.आम्हाला तो प्रथम गुरुजींकडे घेऊन गेला .आम्हीही गुरुजी काय म्हणतात किती घेतात वगैरे जाणण्यास उत्सुक होतो.आम्ही त्यांना काहीही धर्मकृत्य करायचे नाही म्हणून सांगितले .तरीही ते आमच्या बरोबर गंगामाईपर्यंत आले होते.संगमावरून परत आल्यावर त्यांच्याकडे जेवून आणि त्यांना दक्षिणा देवून आम्ही निघालो.धर्मकृत्य अर्थातच आम्ही काही केले नाही .संगमावरून आम्ही येईपर्यंत ते वाट बघत उभे होते.आम्ही होडीतून संगमावर गेलो .संगमावर होडय़ा एकमेकांना जोडून एक प्लॅटफॉर्म तयार केलेला होता .त्याला चारी बाजूनी धरण्यासाठी दोर्या होत्या .पाणी साधारण गळ्यापर्यंतच होते.ज्यांना डुबकी मारायची असेल त्यांनी ती मारावी,नाही तर गडूने पाणी घेऊन स्नान करावे .अशी सर्वसामान्य पद्धत होती .ज्याना संगमावर शास्त्रोक्त स्नान व दान करायचे असेल त्यांच्या बरोबर गुरुजी असत.
आमचा उद्देश प्रथम फक्त संगम बघण्याचा होता .नाशिकचे सिंहस्थ आम्हाला माहित होते.प्रयागला मोठा कुंभमेळा भरतो त्याची वर्णने आम्ही पेपरमधून वाचली होती.लक्षावधी लोक स्नान करतात. हजारोंनी साधू येतात.वगैरे वगैरे .
आम्ही पाहिलेल्या नद्या उगमाजवळच्या असल्यामुळे किंवा कोकणातील असल्यामुळे त्या छोट्या होत्या.गंगा व यमुना यांची वर्णने ऐकलेली वाचलेली होती .संगमावर नद्यांचे पात्र बघून आम्ही स्तिमित झालो . गंगा व यमुना संगमावर एकमेकांना भेटतात .त्या एकमेकांत संपूर्णपणे मिसळून जातात .गंगेचा प्रवाह धवल शुभ्र आहे.यमुना तुलनात्मक काळी भोर आहे .कित्येक किलोमीटरपर्यंत दोन्ही प्रवाह वेगळे दिसत असतात .हळूहळू ते परस्परांत मिसळतात.आणि नंतर एकच प्रवाह गंगामाई या नावाने पुढे बंगालच्या उपसागराला गंगासागर येथे मिळतो .
संगमावर गर्दी विशेष नव्हती.प्रत्येक जण अत्यंत भाविकतेने गहिवरून गंगास्नान करीत होता/ होती.डिसेंबरचा महिना थंडी चांगलीच होती .पाणी अत्यंत स्वच्छ होते .आपल्या रक्तात लहानपणापासूनचे व पिढ्यान् पिढ्यांचे संस्कार किती घट्ट रुजलेले असतात त्याचा प्रत्यय आला .स्नान करणार नाही असा विचार असलेले आम्ही तिथे स्नान करण्याला केव्हा अनुकूल झालो ते आमचे आम्हालाच कळले नाही.स्नान करणाऱ्यांचे एकमेकांकडे लक्ष नव्हते.जो तो कपडे बदलण्यात स्नान करण्यात आणि पुन्हा कपडे बदलण्यात मग्न होता.
आम्हीही त्या स्नान प्रवाहात मिसळून गेलो .सौभाग्यवतीला चारचौघांमध्ये स्नान करण्याचा, कपडे बदलण्याचा, जो संकोच वाटत होता, तो केव्हा नाहीसा झाला ते तिचे तिलाच कळले नाही .आम्ही विनम्र होऊन संगमावर स्नान केले .कपडे बरोबर घेण्याचे सुचले म्हणूनच स्नान झाले . अन्यथा स्नान करावे असे वाटूनही स्नान करता आले नसते .व कदाचित जन्मभर त्याची चुटपूट राहुल गेली असती .
*शेवटी जे जसे व्हायचे असते तेव्हा ते तसे होते हेच खरे*
*नंतर पुढील काळामध्ये गंगा व यमुना यांचे दर्शन उगमापासून संगमापर्यंत, संगमापासून सागराला भेटेपर्यंत,अनेकदा झाले.*
* अनेकदा स्नानही झाले.*
*समोर अलाहाबादचा सुप्रसिद्ध किल्ला दिसत असताना मारलेली ती संगमावरील डुबकी अजूनही जशीच्या तशी स्मरते.*
*म्हणूनच मी संगमावरील संस्मरणीय डुबकी असे म्हणतो.*
२४/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com