३-पोरबंदर जामनगर
द्वारकेला दोन दिवस राहून नंतर आम्ही सकाळीच पोरबंदर जामनगरसाठी निघालो .सकाळी सकाळीच सुमारे आठ वाजता आम्ही नागेश्वर मंदिर येथे पोहोचलो.आमच्या ड्रायव्हरने बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग असे आम्हाला सांगितले .ड्रायव्हरने आम्हाला तिथे नेले नसते तर आम्ही दर्शनाला मुकलो असतो . सोमनाथ शिवाय येथे गुजरातमध्ये आणखी एखादे ज्योतिर्लिंग आहे हे आम्हाला माहीत नव्हते. ज्योतिर्लिंगा संबंधीच्या श्लोकांमध्ये "नागेशं दारुकावने" असा एक चरण आहे. मराठवाड्यातील ओंढ्या येथील नागनाथ, हे ते ज्योतिर्लिंग असे आम्ही समजत होतो व अजूनही समजतो.दारुकावने या उल्लेखावरून द्वारके जवळील वन ते द्वारकावन_ दारुकावन हे पटण्यासारखे आहे त्यामुळे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असावे असे वाटू लागते .दोन्ही ठिकाणी ज्योतिर्लिंग तळघरांमध्ये आहे.गोष्टही एकाच प्रकारची सांगितली जाते .औरंगजेबाने आक्रमण केले आक्रमणाची भीती त्यामुळे ज्योतिर्लिंग तळघरात लपवले गेले इत्यादी . द्वारकेजवळील नागेश्वर येथे एक व्यवस्थित जिना खाली उतरण्यासाठी होता.मंदिर स्वच्छ प्रसन्न नैसर्गिकरित्या प्रकाशमान व अत्यंत साधे वाटले. ज्योतिर्लिंगाचा जो रुबाब असतो तो तिथे दिसला नाही. मंदिराची प्रसन्नता व पावित्र्य मात्र जाणवले .मराठवाड्यातील ओंढ्या नागनाथ येथेही तळघरात ज्योतिर्लिंग आहे परंतु एका मोठ्या वर्तुळातून कसरत करीत खाली उतरताना त्रास होतो. मंदिराचा पुरातनपणा ठळकपणे लक्षात येतो.तसा तो द्वारके जवळील नागेश्वर येथे वाटला नाही.दोन्ही ठिकाणी तळघरांमध्ये ज्योतिलिंग व औरंगजेबाच्या भीतीने त्याचे केलेले स्थलांतर हे साम्य उल्लेखनीय वाटते .बारा ज्योतिर्लिंगा ऐवजी तेरा जोतिर्लिंग असली तरी काही बिघडत नाही . द्वारकेजवळचा नागेश्वर तर मराठवाड्यातील नागनाथ. मनोभावे दर्शन घेऊन अभिषेक करण्यास सांगून आम्ही पुढे पोरबंदरला जाण्यासाठी निघालो.
पोरबंदरला जातानाही रस्ता मधूनमधून समुद्रकिनार्याने गेलेला आहे.पोरबंदर हे त्या भागातील मोठे बंदर आहे .एकूण भारतातील बंदरांचा आढावा घेतला तरीसुद्धा ते मध्यम प्रतीचे बंदर निश्चित आहे .येथून शेंगदाणा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो .मोठ्या बोटी येथे धक्क्याला लागू शकतात .इतरही आयात निर्यात व रेल्वेने माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.पाकिस्तानची सागरी हद्द येथून जवळच असावी . पोरबंदरमधील मच्छीमार समुद्रात गेल्यावर पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे त्यांना पाकिस्तानने पकडले गेल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात .
पोरबंदर म्हटले की आपल्याला प्रथम आठवतात ते महात्मा गांधी.महात्मा गांधी कुठून निघाले व कुठे पोचले (भौगोलिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक दृष्ट्या )तो प्रवास लक्षात घेतल्यावर थक्क व्हायला होते.त्यांची मते एखाद्याला पटतील एखाद्याला पटणार नाहीत.मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो शंभर टक्के मोठा असत नाही .प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्याची दुर्बल स्थाने असतातच.काही चुका किंवा दौर्बल्य असले तरी त्याने तो मनुष्य काही लहान होत नाही.कुणाही लहान किंवा मोठ्या, जवळच्या किंवा लांबच्या, व्यक्तीचे मूल्यमापन करणारे आपण कोण?महात्मा गांधी म्हटले की मुख्यत्वे आठवते ती त्यांची अहिंसा.आहिंसेचा अर्थ बरेच जण दुसऱ्याची हत्या न करणे एवढाच लावतात.मानसिक छळ,मानसिक क्लेश, मानसिक त्रास, यालाही हिंसा म्हणता येईल .एवढेच काय तर दुसऱ्याचा मानसिक छळ करण्याचे मनात येणे,दुसऱ्याबद्दल कलुषित मते असणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा म्हणता येईल. मनात काय यावे व काय येउ नये हे आपण ठरवू शकत नाही.विचार म्हणजेच "मी" होय.त्याशिवाय "मी"ला ओळखण्याचे दुसरे साधन नाहीं. विचारातून "मी"चे दर्शन "मी"ला होत असते. एखाद्याला अहिंसा हे तत्त्व पटले तरीही तो अहिंसक होणार नाही.जोपर्यंत अहिंसक होण्याची धडपड चालली आहे तोपर्यंत तो स्वाभाविकच हिंसक आहे. अापण निरनिराळ्या पातळ्यांवर कसे हिंसक आहोत याचा जर मनोभावे साक्षात्कार झाला ,जर त्याचा खरेच स्वीकार केला गेला, तर मात्र सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्त होण्याची शक्यता आहे.पोरबंदर म्हटले कि महात्मा गांधी व महात्मा गांधी म्हटले की अहिंसा आठवणे अपरिहार्य आहे. असो.
महात्मा गांधीचे घर पाहून त्यांच्या संबंधी वाचलेल्या ऐकलेल्या व पाहिलेल्या निरनिराळ्या गोष्टी मनात अपरिहार्यपणे उमटत असताना आम्ही मार्गस्थ झालो .धाब्यावर घी गुड रोटी मस्तपैकी दही छास वगेैरे घेऊन जामनगरच्या दिशेने पुढे निघालो. जामनगरला आम्हाला मुख्यत्वे स्मशान पाहावयाचे होते .जामनगरचे स्मशान अवश्य पाहावे असा सल्ला आम्हाला देण्यात आला होता.जन्म अहमदाबादला घ्यावा परंतु मृत्यू जामनगरला व्हावा अशा अर्थाची एक म्हण गुजराती मध्ये आहे.(एकदा मृत्यू झाल्यानंतर शवाचे कुठे काय व कसे होते त्याच्याशी मेलेल्याला काय देणे घेणे) स्मशान म्हटले की प्रेते जळत आहेत . सरण रचून दहनाची तयारी सुरू आहे.आदल्या दिवसाच्या दहनाचे राखेचे अवशेष आहेत .बांबू कापड वगेरे तिरडीचे सामान एका बाजूला पडलेले आहे .एका कोपऱ्यात लाकडाची वखार व तराजू वगैरे आहे.काही स्त्रिया ओक्साबोक्शी रडत आहेत तर काही पुरुष उदास चेहर्याने उभे आहेत.असे काहीसे उदास धुरकट वातावरण डोळ्यासमोर उभे राहते .या स्मशानामध्ये तसे काहीही नाही. एखाद्या बागेमध्ये किंवा म्युझियममध्ये तुम्ही आला आहात असे तुम्हाला वाटेल.
आमच्या ड्रायव्हरला तो नेहमी टुरिस्ट टॅक्सी वर जात असल्यामुळे जरी इतर रस्ते माहिती होते तरीही त्याला जामनगरच्या स्मशानाचा रस्ता मात्र माहिती नव्हता.आमचा ड्रायव्हर प्रत्येक ठिकाणी स्मशानाचा रस्ता विचारीत होता.जामनगरला बहुधा दोन तीन स्मशाने असावीत .आम्हाला ज्या स्मशानामध्ये जायचे होते त्याचा रस्ता बर्याच जणांना माहिती नव्हता असे आढळून आले.पिकते तिथे विकत नाही हेच खरे .अर्थात सर्व संभाषण गुजरातीत चाललेले असल्यामुळे व आम्ही मोटारीत मागच्या सीटवर असल्यामुळे नक्की वार्तालाप आम्हाला समजला नाही परंतु संभाषण अंदाजे वरीलप्रमाणे असावे. ड्रायव्हर वाट विचारीत होता आणि प्रत्येक जण आमच्याकडे सहानभूतीच्या भावनेने पाहात होता.आमच्या जवळच्या कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे आणि आम्ही त्यासाठी स्मशानात जात आहोत असे त्यांना साहजिकच वाटत होते .आम्ही एखादे प्रेक्षणीय स्थळ पाहायला जावे त्याप्रमाणे स्मशान पाहायला जात असू असे त्यांच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते . शेवटी आम्ही आम्हाला हव्या असलेल्या स्मशानामध्ये पोहोचलो .
हे जामनगरचे स्मशान आदर्श स्मशान म्हणून ओळखले जाते .एक पवित्र व प्रेरणा देणारे स्थान म्हणूनही याचा जागतिक स्तरावर उल्लेख होतो . "माणेकभाई सुखधाम"म्हणूनही याला ओळखले जाते. हे स्मशान खाजगी आहे ."समाजसेवक महावीर दलातर्फे" त्याची व्यवस्था पाहिली जाते .अद्यावत सोयी व आकर्षक पद्धतीने अंतर्गत रचना असेल,अश्या प्रकारे स्मशान व्यवस्थापन केले जावे, यासाठी हे दल प्रतिज्ञाबद्ध आहे .स्मशान खाजगी आहे आणि म्हणूनच ते आदर्श राखले गेले आहे असे म्हणता येइल . लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून ते चालविले जाते. जवळजवळ एक शतकाचा त्याला इतिहास आहे .चार एकर परिसरात ते पसरलेले आहे. अंतिम यात्रा बस ,पुष्पांजलीद्वार ,पारंपारिक अंतिम संस्कार स्थान,विद्युत दाहिनी,अद्यावत स्नान ग्रह, प्रार्थना कक्ष,बाग इ.(ही नावे प्रत्येक गोष्टीचे कार्य लक्षात येण्यास पुरेशी आहेत )
१९४०मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले असे मला वाटते .हल्ली विद्युत् दाहिनी किंवा डिझेल दाहिनी जरी अनेक ठिकाणी असल्या तरी त्या जुन्या काळामध्ये अशा प्रकारची दाहिनी ही एक सर्वस्वी नवीन गोष्ट होती .विद्युत् दाहिनी मध्ये शव दिल्यानंतर दोन तासात तुम्हाला अस्थि दिल्या जातात असे आम्हाला सांगण्यात आलेले आठवते .ज्याना पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करावयाचे असतील त्यांच्यासाठी तशी सोय आहेच.आत प्रवेश केल्याबरोबर एक आकर्षक बाग आहे.बागे मध्ये फुलझाडे, फुलांचे ताटवे,कापीव रेखीव हिरवळ, वृक्ष ,इत्यादी नेहमी आढळणाऱ्या गोष्टी तर आहेतच ;परंतु कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंतच्या भारतातील निरनिराळया प्रदेशातील प्रसिद्ध संतांचे पुतळे आहेत .पुतळे आकर्षक पद्धतीने रंगविलेले आहेत .पुतळ्याखाली त्या त्या संतांची नावे दिलेली आहेत .मला बरोबर आठवत असेल तर त्या त्या संताची महत्त्वाची थोडीशी माहितीही तिथे लिहिलेली आहे.बागेत शिरल्यानंतर मानवी जीवनाची क्षणभंगुरता जशी लक्षात येते ,त्याप्रमाणेच त्याची महानता व त्याचे सौंदर्यही लक्षात येते .तुमच्या मनावरील ताण सहजरीत्या दूर व्हावा अशी रचना आहे .प्रार्थना कक्षामध्ये मंद भक्तिसंगीत चालू असते.गांभीर्य व प्रसन्नता दोन्ही एकाचवेळी टिकून रहावी, त्याच बरोबर तुमच्या मनावरील ताण दूर व्हावा, अशी एकूण रचना आढळून आली .सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही तिथे गेलो होतो त्या वेळची परिस्थिती अशी होती. हल्ली त्यामध्ये आणखी बऱ्याच सुधारणा झालेल्या असतील.
अशा प्रकारे जामनगर(स्मशान ) दर्शन घेऊन आम्ही अहमदाबादला रवाना झालो .
२३/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com