१-धर्मशाळा १९९९
आम्ही एकदा शिमला कुलू मनाली असे हिमाचलमध्ये फिरलो .धर्मशाला डलहौसी हीही शिमला कुलू मनाली प्रमाणेच उत्कृष्ट पर्यटन स्थळे आहेत असे ऐकण्यात आले होते .तिथेही फिरायला जाण्याची इच्छा होती .एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ती सफल झाली.एका टुरिस्ट कंपनीबरोबर अमृतसर वाघा बॉर्डर पटनी टॉप आणि वैष्णोदेवी असे आम्ही जाणार होतो .त्यांच्याबरोबर परत येण्या ऐवजी जम्मूला त्यांना बाय बाय करून , स्वतंत्रपणे धर्मशाळा डलहौसीचा जावे असा विचार मनात आला .आमच्याबरोबर आमचे स्नेही येण्याला तयार झाले.वैष्णोदेवी पाहिल्यानंतर जम्मूला त्या टूरिस्ट कंपनीला बाय बाय करून आम्ही स्वतंत्र टॅक्सीने धर्मशाळा डलहौसीकडे निघालो .
आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही दोन दिवस धर्मशाळा व तीन दिवस डलहौसी असे फिरण्याने ठरविले .
आमचा ड्रायव्हर अतिशय उत्साही होता.त्याने येताना व जाताना आम्हाला कित्येक मंदिरे दाखविली .त्यातील एक प्रसिद्ध लक्षात राहिलेले मंदिर "ज्वाला मंदिर" होय.एकावन्न शक्तिपीठातील हे एक शक्तीपीठ आहे .येथे कोणत्याही बाह्य ज्वलन साधनाशिवाय ज्वाला सतत तेवत असते .येथे माता सतीची जीभ पडली अशी अाख्यायिका आहे. तेल तूप किंवा किंवा अन्य साधनाशिवाय ज्वाला तेवत असते त्यासंबंधी एक अाख्यायिका आहे .
प्रसिद्ध नाथपंथीय साधू गोरखनाथ, मातेचे भक्त होते .मातेच्या चरणांजवळ बसून ते मातेचे ध्यान करीत असत.एक दिवस त्यांना भूक लागली आणि ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले.जाताना त्यांनी मातेला अग्नी प्रज्वलित करून पाणी गरम करून ठेवण्यास सांगितले .गोरखनाथ परत आलेच नाहीत .अग्नी प्रज्वलित करून तेव्हापासून माता तिच्या भक्ताची , सतत वाट पाहात आहे.कलियुग संपून जेव्हा सत्य युगाला सुरुवात होईल तेव्हा गोरखनाथ मातेच्या चरणाजवळ येतील अशी श्रद्धा आहे .
धर्मशाळा म्हटले की दलाई लामा यांचा येथील निवास स्वाभाविकपणे आठवतो .तिबेटमधील दलाई लामा व त्यांचे निर्वासित झालेले शासन यांचे हे ठाणे आहे .हिमालयाच्या पायथ्याला सिडार वृक्षराजींनी चहूबाजूंनी हे शहर नटलेले आहे.
येथील बौद्ध धर्मियांचे दलाई लामा मंदिर व लायब्ररी प्रसिद्ध आहे .या बौद्ध मंदिरात तिबेटमधील बुद्ध धर्माचे अध्यात्मिक केंद्र आहे .त्यांचे हजारो मूल्यवान धार्मिक ग्रंथही या लायब्ररीमध्ये आहेत .आम्ही या मंदिराला भेट दिली तेव्हा तिबेट, त्यावरील चिनी आक्रमण,त्या अगोदर हिंदी भाई चिनी चिनी म्हणून आपण गळ्यात घातलेले गळे,तिबेटवरील चिनी आक्रमणाला संमती देवून,तिबेट चीनचा एक भाग आहे हे मान्य करून केलेली मोठी घोडचूक, इत्यादी सर्व इतिहास आठवणे अपरिहार्य होते.
आम्ही दलाई लामा मंदिर, दलाई लामांचा निवास, पाहण्यासाठी गेलो त्यावेळी दलाई लामा तेथे नव्हते त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग आला नाही .आम्ही धर्म चक्र फिरवून तेथे जप करण्याचा आनंद घेतला .तेथील स्तूपही पाहण्यासारखा आहे .
धरमशाला येथे दाट झाडी असल्यामुळे पहाटेच्या वेळी येणारे विविध पक्ष्यांचे आवाज व मंजुळ निनाद करणाऱ्या घंटा आपल्याला हळूवारपणे जाग आणतात.
हिमालयात कुठेही गेले तरी ज्याच्या त्याच्या वयानुसार प्रवृत्तीनुसार मनोरंजनाची पर्यटनाची असंख्य ठिकाणे असतात. त्याचप्रमाणे ती येथेही आहेत .
ट्रेकिंग करण्याचे आमचे वयही नव्हते आणि आमच्याजवळ वेळही नव्हता.चालत जावून धबधबे ,उंचावरील सरोवर, इत्यादी पाहणे आम्हाला प्रकृतीमुळे शक्य नव्हते.जिथे मोटार जावू शकेल तिथेच आम्ही जाणार होतो .
आशियातील बहुधा जगातील सर्वात उंचीवर असलेले क्रिकेट मैदान धर्मशाळा येथे आहे.तिथेअाम्ही अर्थातच गेलो.
धर्मशाळेच्या उपनगरासारखे मॅक्लॉडगंज आहे. मॅक्लॉडगंज जवळील भगुसनाथ हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे .तेथील धबधब्याला त्याच नावाने ओळखले जाते .मॅक्लॉडगंज येथे हस्त व्यवसाय निर्मित अनेक वस्तू खरेदी करता येतात .गंज याचा मूळचा अर्थ जरी मूल्यवान खजिना असा असला तरी हा शब्द बाजारपेठ अशा अर्थानेही वापरला जातो.
मॅकलॉडगंज येथे तिबेटमधील निर्वासित फार मोठ्या प्रमाणात राहतात .त्यामुळे याला छोटा ल्हासा(धासा) असेही म्हटले जाते.तिबेटमधील निर्वासित सरकारचे हे ठाणे आहे .दलाईलामाचे निवासस्थानही येथे आहे .
मॅकलॉड गंजपासून जवळच धर्मकोटी हिलस्टेशन आहे येथे बऱ्याच परदेशी नागरिकांनी वस्ती केली आहे .
कांग्रा खोऱ्यांमध्ये दल नावाचे सरोवर आहे (.या नावाचे सरोवर काश्मीरमध्येही आहे .)या सरोवराच्या काठी पिकनिकला जाण्यास व फोटो काढण्यास परवानगी आहे .
पुरातन कांग्रा किल्ला हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे .हनुमानका तिब्बा हे एक ट्रेकिंगसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. आम्ही ते दुरूनच पाहिले. या प्रदेशात चहाचे मळे पुष्कळ आहेत .या प्रदेशात बौद्ध धर्मीयांची अनेक मंदिरे प्रार्थनास्थळे बौद्ध भिख्खूना शिकविण्याची केंद्रे आहेत .
आम्ही तिसऱ्या दिवशी डलहौसी येथे जाण्यासाठी निघालो.
२३/९/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com