Get it on Google Play
Download on the App Store

अपेक्षा फक्त हिंदूकडूनच?

वर-वर पहाता, भारतीयांनी सेक्युलर असणे ही सर्व भारतीयांकडून केलेली अपेक्षा आहे असे वाटत असले, भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात ते शक्य आहे का? या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय समाजाच्या दृष्टीने सेक्युलर या शब्दाचा हिंदी अनुवाद पंथनिरपेक्ष हा करण्यात आलेला आहे. परंतु हिंदू हा मुळातच पंथ निरपेक्ष असल्यामुळे हेतुपूर्वक त्याचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा सांगितला जातो. १९७६ मध्ये सेक्युलर हा शब्द राज्यघटनेत टाकल्यापासून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. धर्मनिरपेक्ष म्हणजे राष्ट्राला कुठलाही धर्म नसणे आणि राष्ट्राने धर्मा-धर्मांत पक्षपात न करता सर्व धर्मांना समान मानणे. सेक्युलर या शब्दाचा पर्यायी शब्द पंथ निरपेक्ष असूनही तत्कालीन सत्ताधाऱ्यांपासून ते सर्व पुरोगामी मंडळींपर्यंत आजतागायत हेतुपूर्वक त्याचा उल्लेख धर्मनिरपेक्ष असा केला जातो. त्याचबरोबर तो भारतीय समाजात रुढ व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात.

समजा देशातील हिंदूंनी सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा लावून, 'धर्मनिरपेक्षता' ही संकल्पना स्वीकारली तरी ती देशातील इतर धर्मियांकडून स्विकारली जाणार आहे का? उदा. मुसलमानांसाठी त्यांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणानुसार गैर इस्लामिक व्यक्ती हा काफिर मानला जातो. काफिर म्हणजे अल्लाहला न मानणारा, इस्लामवर श्रद्धा नसलेला. अशा गैर इस्लामिक व्यक्तींबरोबर कशाप्रकारे वागावे याचे कुराणात वर्णन सापडते. सध्या इस्लामला न मानणारा आणि इस्लामला सर्वोच्च मानणारा यात कुराणनुसार स्पष्ट शब्दांत भेदभाव केलेला आहे; इतके समजून घेतले तरी पुरेसे आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मियांचा धर्मग्रंथ असलेल्या बायबल मध्येही त्यांच्यासाठी परमेश्वर असलेल्या येशूला न मानणाऱ्या लोकांमध्ये भेदभाव केलेला दिसतो. याचाच अर्थ इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मियांचे धर्मग्रंथच माणसा-माणसात धर्माच्या आधारावर भेदभाव करण्याची शिकवण देतात. याउलट 'वसुधैव कुटुंबकम' मानणारी उदारतावादी हिंदू संस्कृती माणसा-माणसांमध्ये भेदभाव न करता समस्त विश्वच आपले कुटुंब आहे; ही शिकवण देते. असे असतांना भारतात सेक्युलर या भ्रामक शब्दाचा आधार घेऊन सर्व धर्मांना समान मानण्याची अपेक्षा केली जाते. आश्चर्य म्हणजे सुरुवातीपासूनच ती फक्त हिंदूंकडूनच केली जाते.

हिंदू म्हणजे सिंधुनदीपासुन ते सिंधु सागरापर्यंत पसरलेल्या भूमीला आपली पितृभूमी, पुण्यभूमी मानणारा व्यक्ती. मग तो कुठल्याही जाती, पंथाचा, भाषा बोलणारा, उपासना पध्दती मानणारा असो. ही हिंदुत्वाची सर्वसमावेशक व्याख्या आहे. अर्थात त्यामध्ये भारतात निर्माण झालेले बौद्ध, शिख, जैन हे सर्वच पंथ येतात. त्याचबरोबर भारत भूमिला आपली पितृभूमी मानून भारतीय संस्कृतीला आपले मानणारे, भारतातील महापुरुषांना आपले मानणारे भारताबाहेरून आलेले नि भारतात राहत असलेले इतर धर्मीय देखील येऊ शकतात. येऊ शकतात यासाठी म्हटले आहे... कारण आपल्या धर्माला सर्वोच्च मानणारे परराष्ट्रतून आलेले परधर्मीय या उदात्त विचारांना स्वीकारण्यास सहसा तयार होत नाहीत. अर्थातच त्यांचा धर्म भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृतीच्या या उदात्त विचारांच्या आड येतो. म्हणूनच केवळ हिंदूंनी परराष्ट्रातून आलेल्या परधर्मियांना त्यांच्या धर्माला आपल्या सनातन धर्माशी समान मानून धर्मनिरपेक्ष व्हावे अशी अपेक्षा केली जाते. जी अत्यंत अन्यायकारक असून राष्ट्रवादाच्या विरोधी देखील आहे. कारण हिंदूंसाठी भारतीय भूमी पुण्यभूमी असून इथल्या मातीत जन्माला आलेले सर्वच महापुरुष त्यांच्यासाठी आपले आहेत. याउलट  इस्लाम, ख्रिस्ती वा अन्य कुठल्याही धर्मासाठी पवित्र असलेले एक धार्मिक स्थान असते. उदा. मुस्लिमांसाठी मक्का हे पवित्र स्थान आहे. जे भारताबाहेरील दुसऱ्या देशात आहे. अर्थात त्यांना ते स्वाभाविकपणे सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे या भूमीला पुण्यभूमी मानून इथल्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांना आपले मानून, या भूमीला सर्वश्रेष्ठ मानणे हे इस्लामला मानणाऱ्या मुसलमानांना कठीण वाटते. ख्रिस्त्यांच्या बाबतीतही असेच आहे. परराष्ट्रतून आलेल्या धर्मांचे अनुयायी असलेल्यांची त्यांच्या धर्माचे उगमस्थान असलेल्या भूमीच्या प्रति श्रद्धा असते. तेथील संस्कृती त्यांना अधिक प्रिय असते. म्हणूनच अशा परधर्मियांच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यांची एकनिष्ठता कुठल्या भूमीप्रती असावी? यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे.

सेक्युलरिझमचे प्रयोग

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
प्रास्ताविक हरवलेली हिंदू चेतना! स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांवर लादलेली मानसिक गुलामगिरी! राष्ट्रीयत्वाचा आधार हिंदुत्व! १९७६ नंतरचे सेक्युलर राष्ट्र भारत! अपेक्षा फक्त हिंदूकडूनच? इस्लाम विरोधी सर्वधर्मसमभाव ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध सर्वधर्म समभाव! ख्रिस्ती मिशनऱ्यांचे मिशन! हिंदूंविरोधी धर्मांतरणाचे षड्यंत्र धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर विशेष सुविधा! कट्टरांचे कट्टरपण, सहिष्णूंचा मानव धर्म अल्पसंख्याकांच्या नावाखाली मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण! विश्वधर्म हिंदुधर्म संदर्भ सूची- लिंक्स