स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांवर लादलेली मानसिक गुलामगिरी!
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या आमच्या सारख्या बहुसंख्य भारतीयांना ऐकायला बोलायला बरं वाटतं. उर भरून येतो अभिमानाने! भारताचे स्वातंत्र्य हा आपल्या सारख्या स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या भारतीयांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा व गौरवाचा विषय व्हावा याकरिता या देशाच्या परम पवित्र भूमीत जन्माला आलेल्या आणि कदाचित हेच ऋण फेडण्यासाठी मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरिता सुरू झालेल्या राष्ट्रयज्ञात सर्वस्वार्पण करण्याच्या भावनेतून केलेल्या त्याग, तपस्या व कित्येक नररत्नांच्या प्राणांच्या अखंडीतपणे वाहिलेल्या आहुत्यांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत, १५० वर्षांच्या गुलामगिरीतुन देश मुक्त झाला; हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु खरोखरंच हा विषय इतकाच आहे? अर्थातच नाही! भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच भारताचे भविष्य सुनिश्चित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तथाकथित स्वातंत्र्याचे भारतीयांच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक व राजकीय जीवनावर, सुनियोजित केलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्हायचे ते परिणामही झाले. फक्त त्याच्याकडे डोळसपणे पहाण्याची दृष्टी देशातील छोट्याशा जागरुक वर्गालाच होती. म्हणूनच स्वातंत्र्याचा व ते मिळवल्यावर स्वातंत्र्योत्तर काळात देशात निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचा देशातील बहुसंख्य असलेल्या समाजाकडून सारासार विचार होऊ शकला नाही किंवा तसा विचारच जाणीवपूर्वक दाबून टाकण्यात आला; हे आपल्याला कधीतरी मान्य करावे लागणार आहे. हे एकदा मान्य केले की, आपल्याला आपल्यापुढे असलेल्या आव्हानांची कल्पना करता येते.
खरंतर भारताचे स्वातंत्र्य हा विषय भारतीयांसाठी काही नवीन नाही! आजवर अगणित अभ्यासकांनी, विचारवंतांनी तो हाताळला, अभ्यासला, त्याचे विश्लेषण केले आणि त्यावर आपापली मतेही मांडली. स्वातंत्र्य कसे मिळाले की मिळवले गेले, त्यात कोणा-कोणाचे योगदान होते इथपासून ते स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल, कसा असायला हवा इथपर्यंत चर्चा झाल्या, वाद-विवादाही झाले. परंतु चाकोरीबद्ध पध्दतीने! हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज स्वातंत्र्य प्राप्तीला इतकी वर्षे उलटून गेल्या नंतरही काय...भारत फक्त १५० वर्षेच गुलामगिरीत होता? हा प्रश्न भारतीयांना संभ्रमित करतो. भारतीयांच्या मन-मस्तिष्कात स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट नसल्याने या प्रश्नाचे योग्य उत्तर बहुसंख्य भारतीयांकडे आजही नाही. कारण आजही आपल्या देशातील बहुसंख्य जनता ही मानसिक पारतंत्र्यात अडकून पडलेली आहे; याचा बोध भारतीयांना अद्यापही पूर्णपणे झालेला नाही.
मानसिक पारतंत्र्य म्हणजे स्वतः ची मूळ ओळख विसरून, नकळतपणे पश्चिमात्त्यांचा आपल्या मन-मस्तिष्कवर झालेला प्रभाव असे ढोबळमानाने म्हणता येईल. म्हणजेच दुसऱ्या शब्दात पाश्चिमात्यांची मानसिक गुलामगिरी! ही गुलामगिरी देशातून पूर्णपणे हद्दपार करायची झाल्यास देशातील नागरिकांना सर्वप्रथम आपल्या 'स्व' त्वाची ओळख करून देणे आवश्यक आहे. 'स्व' त्वाच्या जाणिवेअभावी स्वाभिमानाची कल्पना केली जाऊच शकत नाही व तसेच स्वाभिमानाशिवाय राष्ट्राभिमानाची कल्पना व्यर्थ! जिथे राष्ट्राभिमान नाही तिथे परराष्ट्रीयांचे-पाश्चिमात्यांचे अंधानुकरण म्हणजे मानसिक गुलामगिरी ओघाने आलीच. या मानसिक गुलामगिरीतून देशवासियांना बाहेर काढून, नव्या पिढीवर भारतीय संस्कार करायचे असल्यास या मानसिक गुलामगिरीची सुरुवात होण्यापूर्वीच्या भारतातील समाजजीवन, शिक्षणपद्धती, कला, साहित्य, विज्ञान व तत्वज्ञान इत्यादी ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचे..
भारतीय नागरिक आपला गौरवशाली इतिहास, सनातन हिंदू संस्कृती विसरून जातील याची खबरदारी इंग्रजांनी भारतात नवीन शिक्षणपद्धती राबवताना अत्यंत कुशलतापूर्वक घेतली होती. दुर्दैवाने या गोष्टीची जाणीव देशातील मोजक्याच मंडळींना होती. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांनी भारतात राबवलेल्या शिक्षणपद्धतीचा काही जागरूक मंडळींकडून सातत्याने विरोधही झाला. परंतु तरीही संघटन शक्तीच्या पाठबळा अभावी, इंग्रजांनी धुर्तपणे राबवलेली ही व्यवस्था उलथून पडण्यास देशातील जागरूक-जाणकार मंडळी कुठेतरी कमी पडल्याने इंग्रजांनी भारतीयांना गुलामगिरीत खितपत ठेवण्यासाठी आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकल्या.
ज्या शिक्षणपद्धतीत व्यक्तीच्या भौतिक विकासाबरोबरच नैतिक, आध्यात्मिक सामाजिक म्हणजेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व त्याचबरोबर राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव वृद्धिंगत होत नाही ती शिक्षण पद्धती म्हणजे केवळ पैसा कमावणारी मानवरुपी यंत्रे तयार करण्याच्या कारखान्याव्यतिरिक्त काहीही नाही. हे चिंतन आपल्या देशातील कित्येक महापुरुषांनी वारंवार विविध पद्धतीने विविध माध्यमातून व्यक्त केलेले आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण क्षेत्रात आवश्यक ते अपेक्षित बदल करण्याचा दृष्टीने १९८६ मध्ये 'राष्ट्रीय शिक्षा नीती' अंतर्गत काही प्रयत्न करण्यात आले होते. शिक्षणाचा अर्थ, त्यामागची मूळ भूमिका स्पष्ट करून, भौतिक व आध्यात्मिक विकास, सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी नैतिक जीवन मूल्यांचा विकास, शिक्षणाची गुणवत्ता वाढवून भारताचा विकास करणे व भारतीयांमध्ये राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मतेची भावना सुदृढ करणे ही या शिक्षा नीतीची प्रमुख उद्दिष्टे होती. परंतु व्यवस्थेअभावी कागदोपत्री खूप मोठी आशादायी वाटणारी ही योजना देशभरात व्यवस्थित राबवली गेली नाही.
देशाच्या स्वातंत्र्याबद्धल बोलताना, आज आपण जसे आहोत, जसे आपले विचार आहेत ते का आहेत? याचा विचार करणे जागृकतेचे लक्षण मानावे लागेल. आज आपल्या डोक्यात जे काही विचार चालतात ते चालावेत व त्या अनुषंगाने आपले आजचे जीवन म्हणजेच पर्यायाने तसे समाजजीवन असावे यामागे कोणत्या शक्ती कार्यरत होत्या? का होत्या आणि आजही त्या तितक्याच सक्रिय आहेत का? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. कारण तुमच्या मनातील आजचे विचार व तुमचे आजचे जीवन अमुक असे असण्यासाठी ज्या-ज्या परिस्थिती कारणीभूत आहेत त्या घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत; ही गोष्ट जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितके आपण 'स्वातंत्र्य' नावाच्या संकल्पनेच्या अधिक जवळ जाऊ व खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवू शकू.
भारताचे स्वातंत्र्य व स्वातंत्र्य लढ्याचा विषय समोर येताच, जर आपल्या मन:चक्षूंसमोर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग इत्यादी क्रांतिकारक येत नसतील, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचे सहज स्मरण होत नसेल, तर वर उल्लेख केल्याप्रमाणे आपली अमुक अशी मानसिकता तयार करण्यासाठी ज्या शक्तींनी प्रयत्न केले, ते प्रयत्न यशस्वी झाले; असे मानण्यास हरकत नाही. भारताचे स्वातंत्र्य हा विषय निघताच फक्त अमुक व्यक्ती, अमुक पक्ष वा अमुक समूह भारतीय जनतेच्या मन:चक्षूंपुढे उभा रहावा यासाठी आपल्या देशात गेली सत्तर वर्षे प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
१९४७ पूर्वी देखील या देशात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी युद्धे झालेली आहेत. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी चंद्रगुप्त मौर्य, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, गुरू गोविंद सिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, यांसारख्या कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आक्रमणकारी परकीय सत्तेविरुद्ध लढा दिलेला आहे. मातृभूमीच्या रक्षणार्थ या वीर महापुरुषांनी दिलेल्या लढ्यात, यातील कित्येकांना वीरगती प्राप्त झाली. परंतु या थोर महापुरुषांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा, बलिदानाचा इतिहास या देशात इतकी वर्षे जाणीवपूर्वक कधी शिकवला गेलाच नाही. याउलट सिकंदर, बाबर ते औरंगजेब, टिपू सुलतान यांसारख्या आक्रमणकारी शत्रूंचा निवडक इतिहास आपल्यासमोर ठेऊन अशा परकीय शासकांना महान बनवण्याचे सातत्याने प्रयत्न करण्यात आले. आपले राजकीय मनसुबे यशस्वी करण्यासाठी, देशातील राजकीय सत्ताधारी नेते मंडळींद्वारे भारताचा गौरवशाली इतिहास, सनातन काळापासून चालत आलेली पुरातन व तितकीच महान असलेली संस्कृती नेहमीच लपवण्यात आली किंवा चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेला नेहमीच तिच्यापासून लांब ठेवण्यात आले. जाणीव पूर्वक १९४७ पूर्वीचा इतिहास दुर्लक्षित रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले व फक्त आणि फक्त त्यानंतरचा, रचलेला निवडक इतिहास जनतेसमोर ठेवण्यात आला. त्यामुळेच आज भारतात राहणाऱ्या भारतवासीयांना आपल्या प्राचीन भारताची ओळख नाही. आपण कोण आहोत? आपले पूर्वज कोण होते? आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगत आहोत, आज आपली भारतीय वा हिंदू म्हणून जी काही ओळख आहे त्यामागे कोणता इतिहास दडलेला आहे याची किंचितशी देखील कल्पना आजच्या पिढीला नाही; यामागचे कारण म्हणजे वर वर्णन केल्याप्रमाणे, सत्तेत असलेल्या विशिष्ट विचारधारेच्या व्यक्ती समूहाद्वारे जाणीवपूर्वक करण्यात आलेले प्रयत्न!
खरंतर धर्माच्या आधारावर निर्माण करण्यात आलेल्या पाकिस्तान या राष्ट्राच्या निर्मिती नंतर नव्याने निर्माण झालेल्या, नव्हे तुकडा पाडून उरलेल्या खंडित भारताचा कोणताही धर्म नसेल हा आत्मघातकी विचार कृतीत आणण्यासाठी निर्माण करण्यात आलेली 'सर्वधर्मसमभाव' नावाची हिंदुधर्मद्रोही संकल्पना, भारतात बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंवर जाणीवपूर्वक लादली गेली. म्हणजेच धर्माच्या आधारावर हिंदुस्थानाचे दोन तुकडे करून, त्यातील एक भाग मुसलमानांना देऊन ते मुस्लिम राष्ट्र घोषित करण्यात आले आणि दुसरा भाग म्हणजेच आजचा खंडित भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र कसे बनवता येईल यासाठी षड्यंत्र रचून प्रयत्न करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर येथील मुसलमानांना अल्पसंख्याक म्हणून विशेष अधिकार देऊन भारतातील हिंदूंवर नेहमीच अन्याय करण्यात आला. 'सर्वधर्मसमभाव नावाची' हिंदूंच्या सर्वनाशाकरिता निर्माण करण्यात आलेली भ्रामक संकल्पना जनमानसात खोलवर रुजवण्यात आल्यामुळे, आज स्वातंत्र्य प्राप्तीच्या सत्तर वर्षांनंतरही, १९४७ पूर्वी हा देश अस्तित्वात होता, या देशाची एक विशिष्ट अशी ओळख होती या गोष्टींचे इथल्या आत्मविस्मृत हिंदूंना भानच उरलेले नाही. म्हणूनच ते आज सर्वधर्मसमभाव सारख्या आत्मघातकी संकल्पनांचा उदो-उदो करून, आपल्याच संस्कृतीच्या मुळावर घाव घालण्यात धन्यता मानू लागले आहेत. याचाच अर्थ स्वतंत्र भारतातील बहुतांश जनता आजही मानसिक पारतंत्र्यात अडकून पडलेली आहे.
थोडक्यात आपल्या देशात दोन गोष्टी घडल्या; एक म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातील इतिहास म्हणून बाबर, अकबर, टिपू सुलतान अशा परकीय आक्रमकांना- शासकांना महान बनवून गुलामगिरीचा इतिहास शिकवला गेला व स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या कित्येक स्वातंत्र्य वीरांना डावलून केवळ नेहरू-गांधी यांच्या पुरता मर्यादित असलेला व्यक्तिकेंद्रीत इतिहास भारतीय जनतेच्या मनावर सतत बिंबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या सर्व गोष्टी जाणून घेऊन आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून किमान छत्रपती शिवाजी महाराजांची 'हिंदवी स्वराज्याची' संकल्पना समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असे म्हणता येईल. नाहीतर आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ न समजून घेता वर्षानुवर्षे फक्त कृती पुरताच मर्यादित अर्थहीन स्वातंत्र्य दिन साजरा करत राहू.