हरवलेली हिंदू चेतना!
"मी हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. परंतु मी सेक्युलरिझम वर विश्वास ठेवणारा हिंदू आहे. इतर धर्मियांविषयी देखील माझ्या मनात आदराची भावना आहे. कारण जगातील सर्वच धर्म समान आहेत. ते मानवतेचीच शिकवण देतात! म्हणूनच तर मला मशिदीसमोर, चर्चमध्ये मस्तक झुकवून प्रार्थना करणाऱ्यांविषयी किंवा करण्यात काही वावगे वाटत नाही. मी माझ्या मुस्लिम मित्र-मैत्रिणींना ईदच्या, रमजानच्या शुभेच्छा देतो. मी माझ्या ख्रिस्ती मित्र-मैत्रिणींबरोबर ख्रिसमस साजरा करतो. मी वेलेन्टाइन डे, फ्रेंडशिप डे, ३१ डिसेंबरही मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे आतंकवादाला धर्म नसतो यावर माझा अजूनही विश्वास आहे. त्यामुळे मी सेक्युलर हिंदू आहे." अशी जर आपल्या मनाची धारणा झालेली असेल व आपल्याला असे असण्याचा सार्थ अभिमान असेल तर आपल्याला आपल्या धर्माचा पूर्णपणे बोध झालेला नसून आपण इतर धर्मांविषयी भ्रामक कल्पना डोक्यात ठेऊन, केवळ सेक्युलरिझम नावाची भ्रामक संकल्पना अंगीकरून जगणारे हिंदू आहात. अशाप्रकारच्या हिंदूंना भविष्यात फक्त आणि फक्त सहानुभूतीच मिळू शकते. कारण तथाकथित सेक्युलरिझम या भ्रामक संकल्पनेच्या आहारी जाऊन आपण नकळतपणे स्वतःचीच फसवणूक करून, स्वतः वरच अन्याय करत आहोत; याचे आपल्याला भान नाही. यात आपली काही चूक आहे का? एक हिंदू म्हणून आपण कशाप्रकारे आचरण करावे? असे केल्याने हिंदुत्व धोक्यात येईल का? हे विषय गौण असून, आपल्या मनाची धारणा व त्याअनुषंगाने आपली कृती अशी का? याचा जरी विचार केला, तरी आपल्या मनातील याविषयीचे भ्रम दूर होतील.
तथाकथित सेक्युलर असणाऱ्या हिंदूंनी खरोखरच सर्व धर्म समान आहेत का? इतर धर्म त्यांच्या अनुयायांना त्यांच्या ईश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्यांविषयी सद्भावना, सहिष्णुता बाळगण्याची शिकवण देतात का? आणि जर इतर धर्मीय त्यांचा धर्म सोडून अन्य धर्मियांप्रति सद्भावना ठेवत नसतील, तर त्यांचे अनुयायी कधी सेक्युलर होऊ शकतील का? या प्रश्नांची उत्तरे शोधल्या खेरीज सेक्युलरिझम ही हिंदूंना त्यांच्या धर्मापासून परावृत्त करून त्यांच्यासाठी आत्मघातकी असलेली भ्रामक संकल्पना आहे; हे सहजासहजी लक्षात येणार नाही. आज बऱ्याचशा तथाकथित हिंदूंना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा सेक्युलर म्हणवून घेण्यातच जास्त अभिमान वाटतो. खरंतर सेक्युलरिझम ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. तरी या संकल्पनेला अभिप्रेत असे आचरण हिंदू सनातन काळापासून करत आलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा सेक्युलर हिंदू म्हणवून घेण्यात जास्त अभिमान वाटत असेल तर आपण हिंदूत्व समजूनच घेतलेले नाही. सहिष्णुता किंवा इतरांप्रति समभाव ही हिंदुत्वाच्या संकल्पनेतील अंगभूत तत्वे असल्याने ते हिंदुत्वाचे जोड उत्पादन (बाय प्रॉडक्ट) आहेत असे म्हणता येईल. त्यामुळे हिंदू असणे म्हणजेच उदात्त विचार ठेऊन, सर्वांप्रति समभाव ठेऊन मानवतेच्या कल्याणासाठी तत्पर असणे होय; ही गोष्ट संपूर्ण जगानेही मान्य केलेली आहे. १८९३ मध्ये स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर दिलेल्या पहिल्या भाषणामुळे जगाला नव्याने भारताची आणि त्याच्या सनातन संस्कृतीची ओळख झाली. या भाषणात स्वामी विवेकानंद सनातन हिंदू धर्मविषयी बोलताना म्हणाले...
"मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीने आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो-करोडो हिंदूंच्या वतीने आपल्याला मनःपूर्वक धान्यवाद देतो. पूर्वेकडे देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला, असे या मंचावरून जगाला सांगणाऱ्या काही वक्त्यांचेही आभार मानायला मला आवडेल.
जगाला सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्मात जन्माला आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवर विश्वास ठेवतो असे नाही, जगातील प्रत्येक धर्माचा आम्ही सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित, रंजल्या-गांजलेल्यांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनी देखील दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आजही आम्ही आमच्या हृदयात कोरून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या आणि आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे...
स्वामी विवेकानंदांच्या या भाषणानंतर, पुढील काळात सनातन हिंदू धर्माचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांतील लाखो विद्वानांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. स्वामीजींना भाषणासाठी निमंत्रणे येऊ लागली. लोकं स्वामीजींच्या भाषणांनी भारावून जाऊ लागले, इतके की त्या देशातील ख्रिस्ती धर्मप्रमुखांना, ख्रिस्ती धर्मीय हिंदू धर्म तर स्विकारणार नाही ना? अशी भीती वाटू लागली. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारावून त्यांच्या शिष्या बनलेल्या 'मार्गरेट एलिजाबेथ नोबुल' ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो त्यांनी देखील स्वामी विवेकानंदांपुढे ख्रिस्ती धर्म त्यागून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा प्रकट केली होती. परंतु स्वामीजींनी त्यांना तसे करू दिले नाही. कारण सनातन धर्माचे आचरण करण्यासाठी परधार्मियांना देखील धर्मांतरण करण्याची गरज नाही; सनातन धर्म सकल मानवजातीसाठी कल्याणकारी असल्याने त्याच्याकडे आपण आदर्श जीवनपद्धती म्हणूनच बघतो, तसे आचरण करण्यासाठी धर्मांतरण करण्याची आवश्यकता नाही हाच संदेश स्वामीजींनी दिला. तोच सनातन धर्माचा, आपल्या राष्ट्राचा स्वभाव आहे. इतके उदात्त विचार असलेल्या सनातन हिंदू धर्माच्या अनुयायांना, पाश्चिमात्य विचारांनी भारावून जाऊन आज स्वतःला सेक्युलर हिंदू म्हणवून घेण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांच्या मनाचा भ्रम दूर करून त्यांना सत्याचा साक्षात्कार करून देणे हे समस्त जागृत हिंदूंचे कर्तव्य आहे. अर्थात सर्वकाही समजून-उमजून एखाद्याला एखादी गोष्ट करायचीच असेल, तर त्यासाठी तो स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य हिंदू संस्कृतीने नेहमीच दिलेले आहे. परंतु अज्ञानामुळे हिंदूंचे पतन होणार असेल, तर ते रोखण्यासाठी, समाजहितासाठी जागृत हिंदूंनी समाजात किमान जागरूकता निर्माण करण्यासाठी कर्तव्य भावनेने प्रयत्न करायला हवेत.