प्रास्ताविक
सेक्युलरिझमचे प्रयोग हा काही आजचा विषय नाही. हे प्रयोग स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे भारतीय जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी भारतीय समाजावर केले. नव्हे लादलेच! मग ते महात्मा गांधींचे तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचे प्रयत्न असतील, याच ऐक्यासाठी हिंदुस्थानाच्या जनतेवर लादलेली खिलाफत चळवळ असेल, जवाहरलाल नेहरूंची गंगा-जमूनी तहजीब असेल, भारतावर लादलेली फाळणी असेल, डाव्यांनी भारतीय इतिहासाचे केलेले विकृतीकरण असेल, की १९७६ मध्ये भारताच्या राज्यघटनेत टाकलेला 'सेक्युलर' हा शब्द असेल. असे किती प्रयोग मोजून दाखवावे? या विषयावर संशोधन करू तितके कमीच! त्यामुळे त्यात फारसे अडकून न पडता भविष्याचा विचार करून वर्तमानात काय करता येण्यासारखे आहे? याचे चिंतन महत्त्वाचे! आपल्या देशात या सर्व गोष्टी घडल्या आणि त्यांचे परिणाम आपल्या देशातील अर्ध्याधिक जनतेच्या जीवनावर झाले; या सत्याचा स्वीकार करायलाच हवा. या खेरीज ज्या सत्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, तो मार्ग सुस्पष्ट होणार नाही.
सेक्युलरिझम या संकल्पनेचा आजच्या हिंदू समाजावर इतका प्रभाव आहे की, या संकल्पनेमुळे हिंदू समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाचे, जगातील सर्वांत प्राचीन असलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीचे स्मरणच नसते. भौतिकतावादी जीवन पद्धतीत ते माहीत असण्याचे काही कारण नसल्याने, स्मरण करून देणारेही कोणी नसते! परिणाम स्वरूप, या सेक्युलरिझमच्या प्रयोगांमुळे हिंदू समाज अधिकाधिक आत्मविस्मृत होत चालला आहे. इतका की, आजच्या हिंदू समाजाला स्वतःच्या मूळ अस्तिवाचा बोधच होत नाही. बोध होतो तर तो फक्त सेक्युलर देशात, सेक्युलर होऊन जगण्याचा! हिंदूंना स्वतःला स्वतःच्या हिंदुत्वाचा बोध होऊ न देता त्याने स्वतःला फक्त आणि फक्त सेक्युलर समजावे यासाठी आपल्या देशात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. अर्थात आजच्या हिंदू समाजाची जी काही चांगली-वाईट वैचारिक जडणघडण झालेली आहे, हा समाजावर करण्यात आलेल्या सेक्युलरिझमच्या प्रयोगांचा परिणाम आहे.
वर-वर पहाता, १९७६ पासून आपल्या देशाला सेक्युलर देश बनवण्यात आले, असे दिसत असले तरी त्यासाठीची पार्श्वभूमी आणि देशाची तशी मानसिकता तयार करण्याचे कार्य स्वतंत्र भारतातील सत्ताधाऱ्यांनी १९४७ पासूनच आरंभिले होते. अर्थातच योजना त्याआधीच तयार केलेली होती! १९७६ मध्ये फक्त ती अधिकृतपणे अंमलात आणली गेली इतकेच...
या सेक्युलरिझमच्या प्रयोगांच्या प्रभावातून हिंदू समाजाला मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजावर करण्यात आलेले हे सेक्युलरिझमचे प्रयोग कशाप्रकारे अंमलात आणले गेले आणि त्यांचा हिंदू समाजावर काय परिणाम झाला? या गोष्टींच्या तात्विक चिंतनात न अडकून पडता केवळ या विषयाचे आकलन व्हावे यादृष्टीने अत्यंत सोप्या शब्दात हा विषय मांडण्याचा या पुस्तकातुन प्रयत्न करण्यात आलेला आहे. या प्रयत्नांतून माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींना समाजाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी आणि त्यादृष्टीने हिंदू हिताचा विचार करण्याची दिशा मिळावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.
- अॅड. प्रसाद शिर्के