एकदाच सांगून गप्प राहू नका
मासिकस्रावासंबंधी माहिती देण्याची प्रक्रिया एकदाच चर्चा करून संपत नाही. ही एक दीर्घ, सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे या दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे. एकदाच बसून सगळी माहिती देण्याची गरज नाही. कारण एकाच वेळी सर्व माहिती दिल्यास अद्याप वयाने लहान असलेल्या मुलीवर दडपण येऊ शकते. मुले सहसा टप्प्याटप्प्याने शिकतात. तसेच काही गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागेल. काही गोष्टी, मुली आणखी थोड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतील.
आणखी एक गोष्ट म्हणजे, पौगंडावस्थेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर पाळी येण्याबद्दल मुलींचा दृष्टिकोन बदलत राहतो. सुरुवातीची भीती जाऊन, पाळीची सवय झाल्यावर कदाचित तुमच्या मुलीच्या मनात काही नवे प्रश्न व शंकाकुशंका येतील. तेव्हा तुम्ही आवश्यकतेनुसार तिला हवी असलेली माहिती व तिच्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे. तिच्या वयानुसार व समजशक्तीनुसार कोणती माहिती अर्थपूर्ण व योग्य ठरेल ते ठरवा व त्यावर भर द्या.