Android app on Google Play

 

केव्हा सांगायला सुरुवात करावी?

 

औद्योगिकरित्या प्रगत देशांत, उदाहरणार्थ, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि पश्‍चिम युरोपच्या काही भागांत मुलींना सर्वसामान्यपणे १२ व्या-१३व्या वर्षी पाळी सुरू होते. पण यापेक्षा लवकरच म्हणजे ८ व्या वर्षीही पाळी सुरू होऊ शकते तर कधीकधी १६ व्या-१७ व्या वर्षापर्यंतही पाळी सुरू झालेली नसते. आफ्रिका व आशियाच्या काही भागात पाळी सुरू होण्याचे सरासरी वय थोडे जास्त आहे. उदाहरणार्थ, नायजेरियात सरासरी वय १५ वर्षे आहे. यात अनुवांशिकता, आर्थिक स्थिती, आहार, शारीरीक श्रम, समुद्रसपाटीपासूनची उंची यांसारख्या निरनिराळ्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो.

तुमच्या मुलीला पहिल्यांदा पाळी येण्याच्या आधीच तिला याविषयी माहिती देण्यास सुरुवात करणे उत्तम ठरेल. तेव्हा, साधारणपणे मुलगी आठ वर्षांची झाल्यावर तुम्ही तिच्याशी वयात येताना शरीरात कोणकोणते बदल होतात याविषयी, तसेच पाळी सुरू होण्याविषयी बोलायला सुरुवात केली पाहिजे. इतक्या आधीपासून बोलायची काय गरज आहे, असे कदाचित तुम्हाला वाटू शकते, पण जर तुमची मुलगी ८-१० या वयोगटात असेल तर तिच्या शरीरात हार्मोन्सच्या वाढलेल्या कार्यामुळे, वयात येण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. आणि यामुळे पौगंडावस्थेशी संबंधित उपलक्षणेही दिसू लागलेली असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, स्तनांची वृद्धी आणि शरीरावर केसांची वाढ. बऱ्‍याच मुलींमध्ये पाळी सुरू होण्याआधी उंची व वजनात झपाट्याने वाढ होते.