वयात येताना मुलींच्या स्वभावात, वागण्यातही बदल होत असतात, ते कोणते ?
ज्याप्रमाणे मुलींच्या शरीररचनेत बदल होतो त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावातही बदल होऊ लागतात. मुलांबद्दल अनामिक आकर्षण वाटणे, वेशभूषेवर व सुंदर दिसण्याकडे जास्त लक्ष केंद्रित होणे. पालकांपासून एक प्रकारचे तुटलेपण येणे तर मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी वाटणे असेही बदल मुलींमध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव झाल्यामुळे मुलींच्या वागण्यात एक प्रकारचा संकोच, लाजरेपणाही निर्माण होतो. ज्या घरातील वातावरण मनमोकळे असते, आई-वडिलांची मुला-मुलींबरोबरचे वागणे अति धाकाचे नसते, त्या घरातील मुलींमध्ये असे बदल प्रकर्षाने जाणवत नाहीत. परंतु स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमाचे निरसन होण्यासाठी पोषक असे वातावारण घरात नसले तर मात्र मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. याच वयात मुलामुलींना पालकांच्या जवळीकतेची मार्गदर्शनाची जास्त गरज असते. आपुलकीचा साधा स्पर्शही एक भावनिक गरज असते. नेमक्या याच काळात पालक, विशेषतः वडील आपल्या मुलीपासून दूर दूर राहू लागतात. मोठी झाली या शब्दाचा भडिमार वाढत्या वयातील मुलींवर वारंवार होऊ लागतो. अचानकपणे बदललेल्या या वातावरणाचा अर्थ मात्र वाढत्यावयातील मुलीला लागत नसतो. त्यामुळे मनावरचा ताण वाढत जातो. लैंगिकतेबद्दल नव्याने निर्माण होणारे कुतूहल समाजाला मान्य नसल्या कारणाने अनेकदा आई-वडिलांपासून लपून छपून लैंगिक प्रयोग केलेले आपल्याला आढळतात.याचे घातक परिणाम बहुतांशी मुलींनाच भोगावे लागतात. अनेकदा या वयात मुला-मुलींकडून न झेपणारी पावले केवळ उत्सुकतेपोटी अथवा एकटेपणाच्या भावनेतून उचलली जातात. आजुबाजूला वावरणारे विश्वासार्ह वाटणारे पुरुष विकृत मनोवृत्तीतून अजाण मुलींचा वापर कामपूर्तीसाठी करतात. उदा. शेजारी, घरगडी, नातेवाईक, शिक्षक इत्यादी. याबद्दल पालकांनी तर जागरूक रहावेच पण मुलींनाही याबद्दल चर्चेतून माहिती दयावी. या नाजूक वयात आई-वडिलांशी मैत्रीपूर्ण संवादाची किती आवश्यकता आहे हे आता आपल्या लक्षात आलेच असेल.