Get it on Google Play
Download on the App Store

मुलगी वयात येताना. . .

वयात येताना मानवशरीरात बरेच बदल घडतात. मुलींच्या बाबतीत पाहिल्यास, वयात येण्याच्या या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिकस्त्राव सुरू होणे, अर्थात “पाळी सुरू होणे.”

वयाने तशा अजून लहानच असलेल्या मुलींसाठी, पाळी सुरू होण्याचा काळ बराच तणावपूर्ण ठरू शकतो. कारण त्यांच्या मनात याविषयी बऱ्‍याच संमिश्र भावना असतात. वयात येताना होणाऱ्‍या इतर बदलांसारखाच हा प्रकारही काहीसा गोंधळात टाकणारा असतो. पहिल्यांदा मासिकस्त्राव होतो तेव्हा बऱ्‍याच जणी घाबरतात, आपल्याला काहीतरी भयंकर रोग झाला आहे असे काहींना वाटते. पाळीबद्दल उलटसुलट माहिती ऐकलेली असल्यामुळे आणि सहसा योग्य माहिती कोणीही दिलेली नसल्यामुळे असे घडते.

तुलनेत, ज्यांना आधीपासूनच माहिती देण्यात आलेली असते त्या मुली पहिल्या पाळीच्या वेळी इतक्या गोंधळून जात नाहीत. पण संशोधनावरून असे आढळले की बऱ्‍याच मुलींना पाळी सुरू होण्याआधी पुरेशी माहिती देण्यात आलेली नसते. एका सर्वेक्षणात, २३ वेगवेगळ्या देशांतल्या स्त्रियांनी भाग घेतला. यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश स्त्रियांनी असे सांगितले की पाळी सुरू होण्याआधी त्यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा मासिकस्त्राव झाला तेव्हा या मुलींना काय करावे हेच कळत नव्हते.

सर्वात नकारात्मक अनुभव सांगणाऱ्‍या स्त्रियांना मासिकस्त्रावाविषयी किंवा पाळीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. एका अभ्यासात, पहिल्यांदा मासिकस्त्राव झाला तेव्हा कसे वाटले याचा अनुभव सांगताना, या स्त्रियांनी “खूप भीती वाटली,” आणि “लाज वाटली” अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

रक्‍त पाहून सहसा कोणालाही भीती वाटते. काहीतरी दुखापत झाली किंवा जखम झाली तरच रक्‍त येते असा आपला ग्रह. म्हणूनच, जर योग्य स्पष्टीकरण दिले नाही किंवा पाळी येण्याआधीच मुलींच्या मनाची तयारी केली नाही तर, रूढ कल्पनांच्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर तसेच माहितीच्या अभावामुळे मुलींची अशी चुकीची समजूत होऊ शकते की, मासिकस्त्राव म्हणजे एकप्रकारचा आजार आहे, जखम आहे किंवा लाज वाटण्यासारखे काहीतरी आहे.

पाळी येणे ही एक सामान्य शरीर प्रक्रिया असून सुदृढ आरोग्य असलेल्या सर्व मुलींना ती येते हे तुमच्या मुलीला तुम्ही सांगितले पाहिजे. या संदर्भात तिच्या मनात असलेली भीती किंवा चिंता दूर करण्यास तुम्ही पालक या नात्याने बराच हातभार लावू शकता. तो कसा?