Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना

शेती करण्याआधी शेतकरी जमीन नीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरु होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणे, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणे हे मुख्यतः मुलीच्या आईचे किंवा आई नसल्यास मोठ्या बहिणीचे आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचेही काम असते.

मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना याबद्दल सांगणारे पुष्कळजण असतात. भाऊ असतात, मित्र असतात असल्या विषयांवर ते अगदी खुल्या मानाने बोलू शकतात.

शंभर वर्षापूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न होत असे, बालविवाहाची प्रथा जेव्हा रूढ होती त्या काळात पहिल्यांदा नहाण आलेल्या छोटयाशा सौभ्याग्यवातीचं खूप कोडकौतुक केले जात असे, त्या काळातल्या न्हाणुली ला मखरात बसवत असत. तिच्या सासर माहेरचे किंवा अन्य जवळचे नातलग तिच्यासाठी चार दिवस चांगली चांगली स्वादिष्ट पक्वान्न घेऊन येत असत. चार दिवस ती अस्पृश्य असली तरी या कोडकौतुकाच्या बरसातीने ती सुखावत असे. मग पाचव्या दिवशी ती स्वच्छ झाल्यानंतर मुहूर्त वगैरे पाहून तिचा गर्भाधान विधी केला जात असे. त्याकाळी न्हाणुलीचे असे कौतुक होत असे कारण पहील्यांदा नहाण म्हणजे तिच्या पतीच्या शेजेसाठी सिद्ध होत असे. पण पुढे बालविवाहाची प्रथा बंद पडून मुलींची लग्न उशिरा व्हायला लागली म्हणजे लग्नाच्या आधीच मुलगी वयात येऊ लागली. पण तेव्हापासून न्हाणुलीचे कौतुक मागे पडून मुलगी वयात आलेली पाहिली की तिची आई मोठ्या काळजीत पडलेली दिसू लागे. मुलगी न्हातीधुती झाली आता एकदा वेळेवर तिचे लग्न झाले तर बरे, नाहीतर मग चुकून वाटणाऱ्या या काळजीतूनच पहिली पाली या घटनेकडे पाहायची स्त्रीची नजर बदलली. लहानपणी तर बहुतेक मुलींना पाळीबद्दल काहीच नीटशी माहिती नसे. विचित्र, अर्धवट कुतुहल मात्र खूप असे. दर महिन्याला घरातल्या पांघरूण वेगळे, कुणी त्यांना शिवायचे नाही. त्यांची आंघोळीची मोरी पण वेगळीच. असे दृश्य सर्रास प्रत्येक घरात दिसून येत असे. अश बाईला किंवा मुलीला विटाळशी म्हटले जाई. तो शब्दच इतका घाणेरडा होता की विटाळशी म्हणजे कुणीतरी घाणेरडी बाई असे वाटे. बायकांना आणि मोठया मुलींना दार महिन्याला नेमका कावळा कसा आणि का शिवतो याचे घरातल्या लहान मुलींना नेहमीच मोठे नवल वाटे. कधीतरी मोठ्या बहिणीचे रक्ताने भरलेले कपडेही नजरेला पडत. मनातून अतिशय भीती वाटे. पण कुणी नीट समजावून सांगेल तर शपथ. मग अचानक एखादे दिवशी शाळेत किंवा घराबाहेर असतांना परकरावर डाग पडला की बिचाऱ्या मुलीच्या फटफजितीला पारावर उरत नसे. तिला अगदी मेल्याहून मेल्यासारखे होत असे. आपल्याला पाली आली आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच अशा विचाराने मुलगी कानकोंडी होऊन जात असे. एकदम रक्त पाहून ती भिऊन जात असे. विटाळ हा शब्द ऐकला की कोणती कोवळी मुलगी शहारणार नाही ?

आता अर्थातच समाज बदललाय, मुलींच्या वागण्यात खूप आत्मविश्वास आला आहे. घरातल्या वातावरणात सुद्धा प्रसन्न मोकळेपणा आला आहे. सनीटरी नापकीन च्या जाहिराती सिनेमागृहात आणि टि. व्ही. वर सुद्धा दाखवल्या जातात.

बहुतेक शाळेतून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराची आणि  शरीरधर्माची ओळख मुलीना करून दिली जाते. पण पुष्कळदा पाली येऊन गेल्यावर हे शिक्षण शाळेत दिले जाते. थोडया मोठ्या आणि जबाबदार मुलींना हे शिक्षण देण्यापेक्षा मुलींच्या दहाव्या अकराव्या वर्षीच तिच्या शरीरधर्माची ओळख तिला करून दिली पाहिजे. सरळ आणि सोप्या पण शास्त्रीय भाषेत अशी चांगली पूर्ण कल्पना दिली गेली तर ती केव्हाही जास्त चांगली.

पण शाळेपेक्षाही मुलीचे मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे. मेला बायकांचा जन्मच वाईट म्हणूनच देवाने तिच्यामागे पाळीचा हा त्रास लावला आहे. पूर्वीचे लोक तर अशा बाईला चार दिवस अगदी अस्पर्श मानत. पण हल्ली मेला सगळाच अनाचार माजलाय असे आईच जर बोलू लागली तर मुलीलाही पाली हे संकट वाटणारच. यापेक्षा आईनेच तिला चांगल्या शब्दात ऋतुमती होणे हे निसर्गाचे वरदान आहे सांगून मुलीला आपल्या पहिल्या पाळीचे स्वागत करायला पाहिजे.