Android app on Google Play

 

कशा पद्धतीने सांगावे?

 

वयात येऊ लागलेल्या मुलींना सहसा पाळीबद्दल कुतूहल असते. शाळेत इतर मुलींकडून या विषयावर त्यांनी थोडेफार ऐकलेले असते. मनात बऱ्‍याच शंका-कुशंका असतात. पण विचारायचे कसे? हा प्रश्‍न असतो. या विषयाचा उल्लेख करायला त्यांना लाज वाटते.

पालकांचीही तीच स्थिती असते. पाळीबद्दल माहिती देणारी मुख्य व्यक्‍ती सहसा आईच असते, पण बरेचदा तिलाही या विषयावर आपल्या मुलींशी नेमके काय बोलावे असा प्रश्‍न असतो. तिलाही संकोच वाटतो. कदाचित तुम्हीपण याच परिस्थितीत असाल. तर मग पाळी सुरू होण्याविषयी आणि पाळी का येते याविषयी आपल्या मुलीला माहिती देण्याकरता तुम्ही हा विषय कसा छेडू शकता?

पाळी सुरू होण्याच्या वयात असलेल्या मुली साध्या, स्पष्ट पद्धतीने सांगितलेली माहिती समजू शकतात. पाळी किती वेळा येते, किती दिवस राहते किंवा किती रक्‍त शरीरातून जाते ही माहिती त्यांना देता येईल. तेव्हा सुरुवातीला, पाळी येते तेव्हा काय करायचे याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करावा. शिवाय, पाळी येते तेव्हा नेमकं कसं वाटतं? दुखतं का? यांसारख्या प्रश्‍नांचीही तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील.

नंतर, हळूहळू तुम्ही पाळी येण्याच्या शास्त्रीय कारणांविषयी सविस्तर माहिती देऊ शकता. याबद्दल माहिती देणारी पुस्तके तुम्हाला आरोग्य कार्यकर्त्यांकडून किंवा एखाद्या लायब्ररीतून किंवा पुस्तकालयातून मिळवता येतील. काही गोष्टी स्पष्ट करून सांगण्यास ही पुस्तके अतिशय उपयोगी पडू शकतात. काही मुली स्वतःहूनच पुस्तक वाचायचे पसंत करतील. तर इतरांना तुमच्यासोबत बसून वाचायला हरकत नसेल.

एखादे शांत ठिकाण निवडून तुम्ही संभाषण सुरू करू शकता. प्रौढावस्थेत जाताना शरीराची कशी हळूहळू वाढ होत असते याबद्दल साध्या भाषेत तुम्ही वर्णन करू शकता. कदाचित तुम्ही असे म्हणू शकता: “लवकरच, तुझ्या वयातल्या सगळ्याच मुलींना होत असतं असं काहीतरी तुलाही होणार आहे. माहितेय का तुला त्याविषयी?” किंवा आई आपला स्वतःचा अनुभव सांगून सुरुवात करू शकते: “मी तुझ्याएवढी होते, तेव्हा पाळी येणं म्हणजे नेमकं काय असतं असं मला वाटायचं. आम्ही मैत्रिणीही शाळेत त्याविषयी बोलायचो. तुझ्या मैत्रिणींमध्ये कधी झालीय का चर्चा पाळी येण्याबद्दल?” तिला आधीपासूनच काय काय माहीत आहे हे जाणून घ्या आणि काही गैरसमज असल्यास ते दूर करा. सुरुवातीच्या चर्चांमध्ये तुम्हालाच जास्त बोलावे लागेल, कदाचित तुमची मुलगी फारसे काही बोलणार नाही हे आठवणीत असू द्या.

या विषयावर चर्चा करताना, एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःचा अनुभव आठवू शकता. तुम्हालाही पाळी सुरू होण्याआधी निश्‍चितच काही चिंता, शंका मनात आल्या असतील. कोणती माहिती तुम्हाला असायला हवी होती? तुम्हाला काय जाणून घ्यावेसे वाटत होते? कोणती माहिती तुम्हाला उपयोगी पडली? पाळी येण्यासंबंधीच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्‍न विचारण्याचे प्रोत्साहन द्या.