Get it on Google Play
Download on the App Store

वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी

मुलगी वयात येत असल्यामुळे तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्याने तिच्या आईने समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागले पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईने स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. हे लक्षात घेऊन आईने मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.

प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही  एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावून दिले पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणे हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्राव होणे ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असते. हे मुलींना सांगितले पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईने मुलीला शिकवायला हवे. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखते, काहींना फार दुखत नाही. हे दु:ख तसं इतके तीव्र नसते. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.

पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असे नसते. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असे काहीच नसते. पण ही वस्तुस्थिती आईने मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दार महिना आली नाही तर मुली घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरे म्हणजे पाळी कधीच आली नसतानासुद्धा गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणे फारच कमी असतात.

मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल जाणून घेऊन तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचे मन तयार करणे, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणे हे प्रत्येक मुलीच्या आईचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्या वेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंब पद्धती होती. घरात खूप माणसे असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भधारणा, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणीकडून ते सगळे शिकत असत. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहान असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढेच आपले कुटुंब हे माहित असते. आपल्या चुलत, मानस भावंडाबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलींची जबाबदारी प्रामुख्याने आईवरच येवून पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनेच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे आणि योग्य रीतीने पार पाडणे आवश्यक असते. मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या काळात आईने तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्याने वागून, विश्वासात घेऊन मुलीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी झटले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि सर्वार्थाने परिपूर्ण अशी उदयाची स्त्री, म्हणून मुलीचे व्यक्तिमत्व विकसित करायला पुढे सरसावले पाहिजे.