मुलगी वयात आल्यावर मुलींमध्ये कोणकोणते शारीरिक बदल दिसून येतात?
मुली ११ – १२ वर्षाच्या झाल्या की, शरीरातील विशिष्ट भागात चरबी वाढू लागते. विशेष करून कंबरेभोवती व छातीवरती ही वाढ आपल्या नजरेस येण्याइतकी असते. कंबरेच्या हाडांच्या रचनेतही बदल होऊ लागतो. त्यामुळे कंबर गोलाकार दिसू लागते. स्तन वाढू लागतात. काखेत व जांघेत केस येतात व त्यानंतर मासिक पाळी सुरु होते. प्रत्येक मुलीची मासिक पाळी सुरु होण्याचे वय वेगवेगळे असले तरी साधारणतः अकरा ते पंधरा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु होते. मुलीला मिळणाऱ्या पोषणावर मासिकपाळी सुरु होण्याचे वय काही प्रमाणात अवलंबून असते. काही अशक्त मुलींची पाळी उशिरा सुरु होते. आपल्याकडे मुलींची मासिक पाळी सुरु होण्याचे वय साडेबारा ते साडेसतरा वर्षे इतके आहे. त्यामुळे पंधरा-सोळा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु झाली नाही तर घाबरून जाऊ नये त्यानंतर मात्र डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.