Android app on Google Play

 

धर्म

 

दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही.

पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. 

दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे विधी होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. 

तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म; आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या.जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. 

मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या

शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.

या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.