Android app on Google Play

 

आहार

 

मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. 

अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. 

तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.
 
आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.
 
याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.
 
शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.
 
अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते. इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.
 
शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.