Android app on Google Play

 

मध्यपुराणाश्मयुग

 

यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. 

मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.