Android app on Google Play

 

व्यवसाय

 

शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत.दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते.

फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल.


पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे. एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

 
उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते.

याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा.

उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

या काळात दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले.पुढे  नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले; वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत  वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते.