Android app on Google Play

 

हत्यारे व आयुधे

 

आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला.

एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते.

दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला

निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. 

केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. 

पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. 

क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला.टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय.टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली

तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे.

धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले.  त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. 

हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी  उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.