Android app on Google Play

 

पूर्वपुराणाश्मयुग

 

याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते.

वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच.

  • ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus)
  • पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus)
  • निअँडरथल (Neanderthal)

सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे 

  • व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात
  • अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात
  • क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत
  • अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात
  • लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे

तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय; आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते; आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.