Android app on Google Play

 

नवाश्मयुग

 

ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे.

या वेळी गाय, बैल, डुक्कर,  मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन  हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत.

मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत.  पूर्व आशिया मध्ये  काही भागांत भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.