Android app on Google Play

 

समाज आणि कुटुंब व्यवस्था

 

अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक गोरिला, चिंपांझी इ. आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

भाषा  त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. 

शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत.पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे.