Android app on Google Play

 

आंतराश्मयुग

 

ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो.

इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, अ‍ॅस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन रोप; नाटुफियन उत्तर ईजिप्त हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.