ती काळरात्र 3
बाहेर रात्र झाली. माधव तुरूंगाच्या त्या भीषण दरवाजाजवळ आला. दरवाजा आपोआप उघडला. पहारेकरी झोपी गेले. माधव आत शिरला. मधुरीचा शोध करीत निघाला. फाशी जाणारे कैदी कोठे ठेवतात? तो पाटया वाचीत निघाला. तो ‘फाशी - कोठा’ अशी पाटी दिसली. तो आत आला तो त्याला मधुरी दिसली.
दु:खी, कष्टी, निराश मधुरी. तिचे ते मधुर हास्य कोठे आहे? आज तोंडावर प्रेतकळा आहे. ती पेंढयावर पडली होती. मध्येच उठे, मध्येच निजे, तिचे केस पाठीवर मोकळे सुटले होते. तेथे एक दिवा मिणमिण करीत होता. पाण्याचे मडके होते.
माधवाला ते दृश्य बघवेना; परंतु तो जवळ गेला. दार मोकळे झाले. ‘मधुरी, चल. तुला न्यायला मी आलो आहे. चल ऊठ मधुरी!’ असे तो भराभर बोलू लागला. मधुरीने त्याच्याकडे दीनवाण्या दृष्टीने पाहिले. ती भ्रमात होती. जणू वातात होती.
‘आता न्यायला आलेत! आता रात्री देणार फाशी! सकाळी ना फाशी देणार आहात? मग लौकरसे आलेत? आणखी चार घटका जगू दे. आता नका रे नेऊ मांगांनो. दया करा. उद्या मी मरणार, इतक्या तरूणपणी मरणार. हे तारूण्य मातीत जाणार. हे सौंदर्य फुकट जाणार. हया सौंदर्याने तर सारा घात केला. हे सौंदर्य नसते तर कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. मग हया गोष्टी का झाल्या असत्या? कशाला मिळाले हे सौंदर्य. फाशी देणारे सौंदर्य. पाप. मला वाटत होते की, हे पाप आहे. तरी मी ते केले. किती सुंदर रूप धारण करून पाप समोर उभे राहाते! हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याच्या मोहात पडतो. मोहक सुंदर पाप. साप थंडगार वाटला तरी सापच तो. पाप सुंदर दिसले तरी मानेला शेवटी फास लावते. परंतु सकाळी लावा रे फास. आता रात्री देणार? अशा थंडीत? नका रे. जा माघारे. सकाळी या, सूर्याचे किरण पडतील. थोडी ऊब मिळेल. मरताना ऊब.’
मधुरी असे बडबडत होती, माधव अधीर होता.
‘अग मधुरी, मला ओळखले नाहीस का? मी माधव. तुझा मी. मांग नव्हे. तुझा प्रियकर माधव तो मी. चल. लौकर ऊठ. तुला न्यायला मी आलो आहे. धर माझा हात.’
‘तुम्ही मांग नाही?’
‘नाही नाही.’
‘मग कोण?’
‘मी तुझा प्रियकर.’
‘हो. हो.’
‘पाहू दे तुमचा हात?’