मधुरीची भेट 4
जेवणे खाणे झाली. ती मुलगी पुन्हा गळयात तो हार घालून बसली. ‘किती ग सुंदर हार, कसा शोभतो माझ्या गळयाला! त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. खरेच का प्रेम असेल? प्रेम एकदम जडते म्हणतात. मी त्यांच्यावर रागावले; परंतु पुन्हा मीच त्यांच्याकडे वळून पाहिले. त्यांच्याजवळ हार असतील हे का मला माहीत होते? परंतु पाहिले खरे. माझे का त्यांच्यावर प्रेम आहे? गोड बोलतात, गोड दिसतात आणि श्रीमंत का आहेत ते? परंतु श्रीमंती काय करायची? प्रेमाची श्रीमंती आधी हवी. मला एक दोन दागिने आवडतात; परंतु ते न मिळाले म्हणून काय झाले? दागिन्यांशिवायही मी सुंदर दिसते. सौंदर्याचा दागिना देवाने मला दिला आहे! तेवढा पुरे, केव्हा होईल संध्याकाळ? अजून सावल्या तिथेच आहेत. सूर्य का आज आळसावला आहे ? जा रे सूर्या झपझप खाली.’
असे ती मनात म्हणत होती. कल्पनेच्या राज्यात, प्रेमाच्या राज्यात गेली होती. इतक्यात आईने दळायला हाक मारली. ती गेली. मायलेकी दळीत होत्या. पायली दीड पायली दळण होते. केव्हा संपणार दळण? हे हात का धुणी धुण्यासाठी, दळणकांडण करण्यासाठीच जन्मले आहेत?’ असे ती मुलगी मनात म्हणत होती.
‘कंटाळलीस तर जा उठून. फुरंगटायला काय झाले? तिन्ही त्रिकाळ खायला मात्र हवं. जा हो. मी एकटी दळीन.’आई म्हणाली.
‘पण मी जाते ओढीत का नाही? आई, तू बोलतेस. भाऊ घरी आला म्हणजे तो बोलतो. मी तुम्हाला नकोशी का झाले आहे? का सारी मला बोलता? ती स्फुंदत म्हणाली. ‘नीट वागले म्हणजे कोणी बोलणार नाही. आता लहान नाहीस तू. दोन लेकरांची आई शोभशील. तरी पोरकटपणा जात नाही. असल्या खुळसंतानाला कोण करून घेईल बायको?’
‘नाही कोणी पत्करले तर नाही. मी अशीच राहीन.
‘म्हणे अशीच राहीन. लाज नाही वाटत? थोबाड फोडायला हवं.
संपले एकदाचे दळण. सायंकाळ होत आली. ती मुलगी बाहेर पडली. ती त्या बागेत गेली. तिने इकडे तिकडे पाहिले. तो दूर गुलाबांच्या ताटव्याजवळ तो उभा होता. तिचा श्रीमंत प्रियकर तेथे होता. ती तिकडे निघाली. ती लाजत होती, भीत होती. ती उत्सुक होती, अधीर होती. मन धावत होते; परंतु पावले हळूहळू पडत होती.
सैतान दूर होता. माधव तेथे एकटाच होता. ती तेथे गेली. खाली बसली कोणी बोलेना. क्षणभर एकमेक एकमेकांकडे बघत. पुन्हा सारे शांत.
‘मी तुझी वाट बघत होतो.’
‘मी घरी तुमची आठवण करीत होत्ये.’
‘तुझ्यावर खरेच माझे प्रेम आहे.’