सर्वज्ञ माधव 1
सर्वज्ञ माधव
तो गाव फार मोठा नव्हता. फार लहानही नव्हता. समुद्रकाठी होता तो; परंतु गावाची हवा बिघडली होती. जिकडे तिकडे दलदली झाल्या होत्या. त्यामुळे बेसुमार डास झाले होते. गावात हिवतापाच्या साथीचा कहर होता. घरोघर अंथरूणे पसरलेली होती. माणसांचे सापळे झाले होते; परंतु कोण नष्ट करणार हया दलदली? श्रीमंत लोक शहरांत राहू लागले. त्यांना हया लोकांची करुणा येईना. लोकांचे जीवन सुखी करणे म्हणजे धर्म असे कोणाला वाटेना. एका श्रीमंताने त्या गावात आणखी एक मोठे मंदिर बांधायचे ठरविले. लाख दोन लाख रुपये खर्च होणार होते. त्या श्रीमंताला एक विचारी तरुण म्हणाला, ‘मंदिर कशाला आणखी बांधता? मंदिरातील देव दूर राहातो व शेवटी ती विलासमंदिरे होतात. आपल्या गावात आरोग्य नाही. गटारे बांधायला हवीत. दलदली बुजवायला हव्यात. त्यासाठी करा ना हे दोन लाख रुपये खर्च. लोक निरोगी होतील. हे शरीर म्हणजे आत्मारामाचे मंदिरच. ही देवाची मंदिरे आज रोगांनी खिळखिळी झाली आहेत. ती चांगली होतील. हा खरा धर्म आहे.’ परंतु तो श्रीमंत त्या तरूणावर एकदम ओरडला, ‘मंदिरापेक्षा का गटारे थोर? नास्तिक आहात तुम्ही. निघा येथून.’
‘एक दिवस उजाडेल व माझा विचार जगाला पटेल,’ असे म्हणत तो निघून गेला.
असे ते रोगपिडीत गाव होते. त्या गावात एक भला मोठा वाडा होता. त्या वाडयात एके काळी शंभर माणसे वावरत होती; परंतु आज तेथे दोनच टकल्या होत्या. एक मालकाची व दुसरी भय्याची. त्या वाडयाची नीट झाडलोटसुध्दा करणे कठीण होते. मालक नेहमी दिवाणखान्यात बसलेला असे. तो फारसा कधी बाहेर पडत नसे. दिवाणखान्यात खिडक्या नेहमी बंद असत. दारे बंद असत. दिवसाही तेथे दिवे असत. त्या मालकाचे नाव माधव.